ताज्या घडामोडी

शिक्षणक्षेत्रात तत्व, दर्जा व गुणवत्तेचे आग्रही: डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

लेखक:प्रा.डॉ.अजय गव्हाणे

शिक्षण क्षेत्रात कार्यरत व्यक्ती अध्ययन, अध्यापन, संशोधन, प्रशासक, निर्णय निर्धारक इ.विविध भूमिका बजावीत असतात. शक्यतो व्यक्ती यापैकी एक भूमिका स्वीकारतो व कार्यरत असतो. मात्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू तथा श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे हे व्यक्तिमत्व शिक्षण क्षेत्रातील एक विरळ व्यक्तिमत्व म्हणून उल्लेख करावा लागेल. वरील सर्व भूमिका एकाच वेळी बजावीत असतांना’ मी प्रथमतः शिक्षक आहे’ याचा सदैव उच्चार व आचार ते करीत असल्याचे आढळून येते.
डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांना आजवर तीन पेटंट प्राप्त झाले असून त्यांना नुकतीच इलेक्ट्रॉनिक्स या विषयात दुसऱ्या पेटंटची प्राप्ती झाली आहे. इलेक्ट्रॉनिक्स या विषयात मराठवाड्यात सर्वप्रथम हे दोन्हीही पेटंट प्राप्त झालेले आहेत.
पेटंट कार्यालय, नवी दिल्ली, भारत सरकार यांनी डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या इलेक्ट्रॉनिक्स विषयातील अथक संशोधन व परिश्रमाला पेटंटची मान्यता रीतसर पेटंटपत्र व प्रशस्तीपत्र पाठवून दिलेली आहे. उत्कृष्ट प्रशासक म्हणून कार्य करीत असतांना देखील अध्ययन, अध्यापन आणि संशोधनाचा ध्यास न सोडलेले डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांचे हे संशोधकीय योगदान व प्राप्ती; ते हाडाचे शिक्षक आहेत व समाजाप्रती त्यांची बांधिलकी निर्विवाद आहे; हे स्पष्ट करते.
डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार प्राप्त असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार देखील त्यांनी प्रशासकीय आणि शैक्षणिक कौशल्यावर प्राप्त केलेला आहे. जगातील अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स, चीन, ब्रिटन, न्यूझीलंड,सिंगापूर आदी विविध १७ देशांना शैक्षणिक भेट दिलेल्या डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी शिक्षण हे ‘विद्यार्थी केंद्रित’ असावे;हे ध्येय उराशी बाळगून विद्यापीठाच्या विज्ञान शाखेचे अधिष्ठाता म्हणूनही कुशल सेवा पार पाडलेली आहे. आजवर दोन महाविद्यालये इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको आणि यशवंत महाविद्यालयास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार त्यांच्या नियोजन आणि व्यवस्थापनामुळे प्राप्त झालेला आहे तसेच भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून नुकताच जिल्हा ग्रीन चॅम्पियन आवार्ड त्यांनी’ यशवंत ‘ ला प्राप्त करून दिलेला आहे. सिडको येथील इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाला सुयोग्य शैक्षणिक आकार देण्यासाठी त्यांनी केलेली धडपड आणि तळमळ सर्वविदित आहे. २०१९ पासून त्यांनी यशवंत महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. शिक्षण आणि तंत्रज्ञान हातात हात घालून चालले पाहिजेत, तंत्रज्ञानाचा शिक्षण क्षेत्रातील सर्व उपक्रमासाठी यथायोग्य वापर केला पाहिजे; या त्यांच्या अट्टाहासामुळे कोरोना काळाच्या दोन वर्ष कालावधीतही यशवंत महाविद्यालय क्षणभरही थांबले नाही. यशवंत महाविद्यालय यावर्षी चौथ्या नॅक मूल्यांकनाला प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार सामोरे गेले. या मूल्यांकनात सरांचे नियोजन, मार्गदर्शन व उपक्रमांमुळे महाविद्यालयाला ए प्लस ग्रेड प्राप्त झाला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उपक्रमांची जणूही पावतीच आहे. संपूर्ण देशात ए प्लस ग्रेड असलेले मोजकी महाविद्यालये आहेत. त्यापैकी यशवंत महाविद्यालयाच्या ए प्लस ग्रेडचे मानकरी, शिल्पकार म्हणून डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी १०० हून अधिक शोधनिबंध सादर केलेले आहेत. त्यांचा नावलौकिकही झालेला आहे. सरांची आत्तापर्यंत कुलगुरू पदाच्या निवड चाचणीत पहिल्या पाच उमेदवारांमध्ये एकूण चार वेळेस निवड झालेली आहे. त्यांनी दोन वर्ष आणि दहा महिने प्र-कुलगुरू पदाचा कार्यकाल सांभाळलेला आहे. एकवीस संशोधक विद्यार्थ्यांना पीएच.डी.साठी मार्गदर्शन केले असून त्यापैकी चार विद्यार्थी परदेशी आहेत तसेच चार संशोधन प्रकल्पही त्यांनी पूर्ण केलेले आहेत.
शिक्षक, संशोधक, प्रशासक अशा वेगवेगळ्या भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणाऱ्या डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांना वाढदिवसानिमित्त मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!
—-

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.