प्राध्यापकांच्या रजा व पदोन्नती बाबतीत अधिसभेचे महत्वपूर्ण ठराव मंजूर : डॉ. विजय भोपाळे
नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक १२ मार्च रोजी संपन्न झाली यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या देय रजेच्या बाबतीत प्रलंबित प्रश्नाच्या अनुषंगाने महत्वपूर्ण ठराव संमत करण्यात आले.
ज्यामध्ये महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या अर्धवेतनी रजा खात्यात जमा असलेल्या रजेतून खाजगी कामासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय म.ना.सेवा (रजा) नियम १९८१ मधील कलम ६० अन्वये रजा मंजूर करणेबाबतचा ठराव संमत करण्यात आला. ज्यानुसार प्राध्यापकांना खाजगी कामासाठी उदा. कौटुंबिक लग्न समारंभ, घरातील जवळच्या व्यक्तीचे आजारपण/अपघात/निधन, खाजगी कामासाठी देशांतर्गत/विदेश प्रवास आदि कारणांसाठी त्यांना रजा घेण्याची निकड भासल्यास त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम १९८१ मधील कलम ६० (१) (ए) नुसार त्यांनी सेवेच्या पुर्ण केलेल्या प्रत्येक वर्षासाठी २० दिवसांची अर्धवेतनी रजा मिळण्याचा हक्क असेल व ६० (१) (बी) नुसार वैद्यकीय प्रमाणपत्रावर अथवा खाजगी कामासाठी रजा देण्याची तरतूद उपलब्ध आहे. त्यामुळे प्राध्यापकांना खाजगी कामासाठी वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय त्यांच्या अर्धवेतनी रजा खात्यात जमा असलेल्या रजेतून स्वतंत्र रजा देय राहणार आहेत. त्याकरिता प्राध्यापकांना अर्धवेतनी रजा मंजूर करतेवेळी त्यांना वैद्यकीय प्रमाणपत्राची सक्ती करण्यात येऊ नये याबाबतचे स्वयंस्पष्ट परिपत्रक विद्यापीठ स्तरावरून सर्व संबधित महाविद्यालयांना निर्गमित करण्यात येणार आहे.
यासोबतच महाविद्यालयीन अध्यापकांची सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) व प्राध्यापक (Professor) पदासाठीची पदोन्नती (CAS) प्रक्रिया हि जिल्हा निहाय शिबिरातून घेण्याबाबत संस्थेकडून प्रस्ताव आल्यास कार्यवाही करण्याबाबतचा ठराव संमत करण्यात आला आहे. ज्यानुसार प्राध्यापकांना महाविद्यालय पातळीवर पदोन्नती प्रक्रिया पार पाडायची कि जिल्हा निहाय शिबारासाठी अर्ज करावा हि मुभा मिळेल.
महाविद्यालयीन प्राध्यापकांच्या रजा व पदोन्नती बाबतीत प्रलंबित प्रश्नांच्या संदर्भात अधिसभा सदस्य तथा स्वामुक्टा प्राध्यापक संघटनेचे सचिव डॉ. विजय भोपाळे यांनी प्रस्ताव सादर करून सातत्याने पाठपुरावा केला होता ह्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद देत मा.कुलगुरूंनी प्रस्तावास मान्याता दिली. तसेच अधिसभा सदस्य डॉ. सुर्यकांत जोगदंड, डॉ. दिलीप पाईकराव, डॉ.करूणा देखमुख, डॉ. विष्णू पवार यांच्यासह सर्व सदस्यांनी पाठींबा देऊन ठराव संमत केला आहे. या निर्णयामुळे प्राध्यापकांच्या रजे बाबतीत निर्माण होणाऱ्या अडचणी दूर होण्यास मदत होणार असून आगामी काळात देखील प्राध्यापकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविणासाठी स्वामुक्टा संघटनेचे अधिसभा सदस्य कटीबद्ध असल्याचे डॉ. विजय. भोपाळे यांनी कळविले आहे.