ताज्या घडामोडी

शासकीय तंत्रनिकेतनमध्ये लोकसभा निवडणूक मतमोजणीची अद्ययावत तयारी

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी घेतली आढावा बैठक

नांदेड दि. 28 :- 16- नांदेड लोकसभा मतदार संघासाठी 26 एप्रिल 2024 रोजी मतदान पार पडले. या मतदान प्रक्रियेची मतमोजणी 4 जून 2024 रोजी शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे होणार असून यासाठी अद्ययावत तयारी प्रशासनाने सुरू केली असून आज वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्यवस्थेसंदर्भात बैठक घेण्यात आली.

16 नांदेड लोकसभा मतदारसंघांमध्ये येणाऱ्या सहा विधानसभा अनुसार स्ट्रॉंगरूम मध्ये सध्या मतपेट्या कुलुपबंद आहेत. ज्या ठिकाणी स्ट्रॉंगरूममध्ये मतपेट्या बंद आहेत.त्याच ठिकाणी मतमोजणीची वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे. ही मतमोजणीची व्यवस्था करताना निवडणूक प्रक्रियेत महत्त्वाचे असणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी ,तसेच जनतेला माहिती देणारी माध्यमे यांच्या महत्त्वाच्या भूमिका व जबाबदाऱ्या असतात. त्यांच्या संदर्भातील व्यवस्थेचा आज आढावा घेण्यात आला.

सध्या शासकीय तंत्रनिकेतन, बाबानगर, नांदेड येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सहा स्ट्रॉंग रूम मधील सीसीटीव्ही कॅमेरे 24 तास सुरू असतात. मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवस पासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच 24 तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.

चार जूनला सकाळी सात वाजता पासून मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समक्ष केली जाते. माध्यमांना याबाबत माहिती दिल्या जाते. माध्यमामार्फत वृत्तपत्र व वाहिन्यांद्वारे या संदर्भातील वृत्त संकलन केले जाते.

आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व उपाययोजनांचा आढावा घेतला. मतमोजणी ज्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणच्या व्यवस्थेची पाहणी केली.आज झालेल्या या बैठकीला व पाहणी दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त जिल्हाधिकारी पी.एस.बोरगांवकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी राजकुमार माने, उपविभागीय अधिकारी विजय माने यांच्यासह विविध विभाग प्रमुख व सुरक्षा यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.