देश विदेश
वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीने राष्ट्रपतीना निवेदन
गडचिरोली,प्रतिनिधी :-
रोजी वनवासी कल्याण आश्रम जिल्हा गडचिरोली तर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती जींना निवेदन देण्यात आले.
नवीन जातींना अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट करताना कायद्याने विहित केलेले निकष आणि कार्यपद्धती काटेकोरपणे पाळली पाहिजे, असा प्रस्ताव अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाच्या केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या उज्जैन येथे पार पडलेल्या बैठकीत पारित करण्यात आला.
केवळ विशिष्ट प्रथा किंवा भिन्न बोली भाषेमुळे अनुसूचित जमातीच्या यादीत कोणत्याही जातीचा किंवा गटाचा समावेश करू नये, तर लोकूर समितीच्या सर्व पाचही मापदंडांची पूर्तता करणे आवश्यक आहे. अन्यथा, ज्या उद्देशाने भारतीय राज्यघटनेत अनुसूचित जमातींची अनुसूची, अनुसूचित जाती, भटक्या जमाती आणि इतर मागास जाती यापेक्षा वेगळी बनविण्यात आली, त्याला काही अर्थ उरणार नाही, असेही केंद्रीय कार्यकारी मंडळाच्या ठरावात नमूद करण्यात आले.
आदिम लक्षणांची चिन्हे, विशिष्ट संस्कृती, भौगोलिक वेगळेपण, व्यापक इतर समुदायांशी संपर्क साधण्यात संकोच आणि सामाजिक व आर्थिक मागासलेपण असे लोकुर समितीचे पाच निर्धारित मापदंड आहेत. मात्र, तात्कालिक राजकीय फायद्यामुळे आणि प्रबळ समाजाच्या दबावाखाली, अनेक विकसित, संपन्न अशा जातींना विहित निकषांना बगल देऊन अनुसूचित जमातीच्या यादीत समाविष्ट केले जात असल्याचे लक्षात येते, याकडे अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाने लक्ष वेधले आहे.