ताज्या घडामोडी

PM-USHA अंतर्गत यशवंत महाविद्यालयामध्ये सामाजिक विकास आणि स्पर्धा परीक्षा तयारीवर उपयुक्त मार्गदर्शन

नांदेड, २३ ऑगस्ट: यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे गेल्या शनिवारी दोन महत्त्वाच्या शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक हे उपस्थित होते. यांनी या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक विकासाच्या संकल्पनांपासून ते स्पर्धा परीक्षांच्या तयारीपर्यंत सर्वंकष मार्गदर्शन केले.


पहिल्या व्याख्यानात, डॉ. वासनिक यांनी ‘सामाजिक विकास आणि लोकप्रशासन’ या विषयावर चर्चा करताना सामाजिक विकासाचे मूलभूत तत्त्वे स्पष्ट केली. त्यांनी जागतिक स्तरावरील संसाधनांच्या विषम वाटपावर टीका करताना म्हटले, “जगातील २५% लोकसंख्या ८०% संसाधनांचा वापर करते, तर उर्वरित ७५% लोकांना केवळ २०% संसाधने उपलब्ध आहेत. ही विषमता सामाजिक विकासातील मोठी अडचण आहे.” भारतातील गरिबी, शैक्षणिक अंतर, आरोग्यसेवेचा अभाव, लिंगभेद यासारख्या समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. सामाजिक विकासासाठी लोकप्रशासनाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, धोरणनिर्मिती, योजनांची अंमलबजावणी, निधी वाटप, सामाजिक न्याय, समन्वय आणि देखरेख यामध्ये प्रशासनाचे योगदान अपरिहार्य आहे, असे ते म्हणाले.
सामाजिक विकासाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकताना डॉ. वासनिक यांनी म्हटले, “खरा विकास म्हणजे केवळ आर्थिक वाढ नसून, लोकांचे शिक्षण, आरोग्य, कृषी यासारख्या क्षेत्रातील प्रगती होय. यासाठी चांगले प्रशासन आणि शासन हे अत्यावश्यक आहे.” भारतातील सामाजिक समस्यांवर त्यांनी टीका केली. भारतातील मोठ्या सामाजिक समस्या, सामाजिक बदलाचे घटक आणि सामाजिक विकासाची मूलभूत मूल्ये यावर त्यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली. सामाजिक विकासासाठी लोकप्रशासनाची भूमिका हा या व्याख्यानाचा केंद्रबिंदू होता. धोरणनिर्मिती, योजनांची अंमलबजावणी, निधी वाटप, समन्वय आणि देखरेख यासारख्या प्रशासकीय कार्यांमुळेच समाजाचा सर्वांगीण विकास शक्य आहे, असे ते म्हणाले. त्यांनी यावर भर दिला की, “केवळ कागदोपत्री धोरणे नव्हे, तर त्यांची गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी ही खरी कसोटी आहे. भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि लालफीतशाही ही मोठी आव्हाने असली, तरी प्रभावी आणि जबाबदार लोकप्रशासन हेच भारताच्या सामाजिक प्रगतीचे इंजिन आहे.” सामाजिक न्याय, समता, बंधुता आणि मानवी प्रतिष्ठा या तत्त्वांवर आधारित ‘सामाजिक मानवतावाद’ यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन करून त्यांनी व्याख्यानाचा समारोप केला.
दुसऱ्या व्याख्यानात, डॉ. वासनिक यांनी UPSC/MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीविषयी तपशीलवार माहिती दिली. त्यांनी परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम, लोकप्रशासन विषयाची निवड, वेळेचे व्यवस्थापन, उत्तरलेखन तंत्र आणि चालू घडामोडींशी संबंध जोडण्यावर भर दिला. “यशासाठी सातत्य, चिकाटी आणि प्रचंड मेहनत आवश्यक आहे. लक्ष्याकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सातत्याने अभ्यास करणे गरजेचे आहे. स्वतःच्या हस्ताक्षरावर देखील लक्ष द्यावे, कारण सुंदर हस्ताक्षर हे व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे,” असे त्यांनी सुचवले. विद्यार्थ्यांनी दैनंदिन वृत्तपत्रे वाचणे, चालू घडामोडीचे नियोजन करणे आणि नियमित सराव करणे यावर देखील भर दिला.
या कार्यक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना सामाजिक विकासाच्या महत्त्वाच्या संकल्पनांपासून ते स्पर्धा परीक्षांच्या यशस्वी तयारीच्या तंत्रांपर्यंत उपयुक्त माहिती मिळाली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले गेले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे सर उपस्थित होते. महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात सांगितले की, असे कार्यक्रम विद्यार्थ्यांना समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देतात आणि त्यांच्यातील सामाजिक जाणीवा व कारीयरकडे बघण्याचा दृष्टीकोन अधिक व्यापक व सकारात्मक करतात. डॉ. वासनिक यांचे हे मार्गदर्शन विद्यार्थ्यांसाठी उद्बोधक आणि प्रेरणादायी ठरले आहे. असे त्यांनी प्रतिपादन केले .या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाद्वारे करण्यात आले होते. या कार्याक्रामचे प्रास्ताविक व भूमिका लोकप्रशासन विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मीरा फड यांनी मांडली व कार्यक्रमाचे सुव्यवस्थित नियोजन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ. आर.पी.गावंडे सर डॉ.पी.आर.मिरकुटे सर डॉ.अजय टेंगसे सर ,डॉ. पदमाराणी राव मॅडम डॉ.अजय गव्हाणे सर, डॉ.विरभद्र स्वामी सर, डॉ साईनाथ बिंदगे सर,गजानन पाटील, राजू अडबलवार यांचे बहुमोल सहकार्य लाभले. कार्याक्रामला विद्यार्थ्यांचा भरघोष प्रतिसाद लाभला होता.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.