ताज्या घडामोडी

डॉ.व्ही.एन.इंगोले: मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक – लेखक: डॉ.अजय गव्हाणे

पीपल्स महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.व्ही.एन. यांचे संपूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राची अखंडीत सेवा करण्यात व्यतीत होत आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी देखील विद्यमान प्रश्नांकडे वास्तववादी, लोकशाहीमय, धर्मनिरपेक्ष, पुरोगामी आणि आधुनिक दृष्टिने पाहण्याचा अट्टहास, प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी आणि सामाजिक व राजकीय चळवळीत सक्रीय असणार्‍यांसाठी प्रमाण आहे. वाचन, लेखन, चिंतन, मनन, संशोधन आणि या सर्वांना अनुरूप वर्तन; हे डॉ.व्ही.एन. इंगोले यांच्या बहुमुखी व बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा आधार आहे. आधुनिक काळात असे व्यक्तिमत्त्व दुर्मिळच
डॉ. इंगोले प्रभावीपणे बजावत असलेल्या या विविधांगी भूमिकांच्या मुळाशी त्यांची विशिष्ठ वातावरणात झालेली जडण-घडण हीच आहे, असे वाटते. तसे ते स्वत:बद्दल फारसे बोलत नाहीत, पण मान्यवरांच्या जडण घडणीवर प्रकाश टाकणार्‍या ‘आम्ही असे घडलो’ अशा आशयाच्या एका अंकात त्यांनी आपल्या जडण-घडणीचा पट उलघडला होता. हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांगाच्या पठारावरील पर्जन्यछायेतील कायम दुष्काळी भागात असलेल्या एका लहानशा खेड्यातील शेतकरी कुटुंबापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय मार्गे पीपल्स कॉलेज असा होत असताना प्रत्येक टप्प्यावरील अनुभवांनी त्यांचे आयुष्य समृध्द होत गेले. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच १९७२ च्या दुष्काळाने त्यांच्या हातात पेन आणि पुस्तकाबरोबरच कुदळ आणि फावडे दिले. तेलाच्या गिरणीतील रात्र पाळीचे काम, कमवा शिका योजनेत तलावाचे काम व अंबाजोगाई ते गिता रस्त्याचे खोदकाम इथपासून ते मुलांच्या मेसमध्ये भांडी घासणे, वाढपी म्हणून काम करणे, सायकलवरून भाजिपाला आणि किराणा आणणे आणि मेसचा व्यवस्थापक म्हणून सक्षमपणे जबाबदारी सांभाळणे, इथपर्यांतची कामे करत रात्रपाळीचे एम. ए. चे वर्ग करून विद्यापीठात सर्व द्वितीय येणारा हा अवलिया आगळाच म्हणावा लागेल. विपरीत परिस्थितीत सदैव संघर्ष करीत शिक्षणाचा सतत ध्यास घेणार्‍या डॉ.व्ही.एन.इंगोले यांनी आपले संपूर्ण शिक्षण कष्टाने, जिद्दीने आणि आत्मविश्वासाने पूर्ण केले, मात्र त्या परिस्थितीचे कधी भांडवल केले नाही; उलट या परिस्थितीला त्यांनी शिडी बनविले. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व उत्तुंग बनले.
शिक्षणाच्या काळात, पुरोगामी युवक संघटना, राष्ट्र सेवादल, युक्रांद, या संघटनांच्या कामात सहभाग घेत मराठवाडा विकास आंदोलन, शिष्यवृत्ती वाढ आंदोलन, एक गाव एक पाणवटा, अशा सामाजिक चळवळी व आंदोलनात क्रियाशील कार्यकर्ता म्हणून काम करताना आलेले सामाजिक भान आयुष्यभर एक बांधिलकी म्हणून जपले. त्याचाच एक भाग म्हणून समाजासमोर असणार्‍या सर्व प्रश्नांची जाण ठेवून त्यातून मार्ग काढण्यासाठी शिक्षण क्षेत्रात सतत नानाविध उपक्रम राबविले. अगदी निरक्षर कुटुंबाची पार्श्वभूमी असलेला हा माणूस भारत ज्ञान विज्ञान जथ्था आणि राष्ट्रीय प्रौढ शिक्षण योजनेच्या माध्यामातून साक्षरता प्रसाराच्या कामात भान हरपून काम करता करता ताराबाई परांजपे, गौरीशंकर गंगा, श्रीमती लक्ष्मी मेनन, श्रीमती शोभना रानडे, अशा महान लोकांचा सारथी बनला. भाई वैद्य यांच्या सोबत अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या शैक्षणिक चळवळीत त्यांनी अगदी झपाटून काम काम केले. त्यांच्या या कामाची सभेने दखल घेऊन त्यांना ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान केला. त्यावेळी पुरस्काराची प्राप्त झालेली रक्कम पीपल्स कॉलेजच्या ‘कमवा व शिका’ या योजनेला दिला आणि त्यातून कॉलेजमध्ये या योजनेत मोठा निधी उभा केला. एक मोठा निधी पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ यांच्या मराठवाडा जनता विकास परिषदेचे काम करता करता, त्या चळवळीला अभ्यासाचा पाया असावा म्हणून त्यांनी एम.फिल.साठी प्रादेशिक हितसंबंधी गट: मराठवाडा जनता विकास परिषद, असा विषय घेऊन संशोधन केले. त्या प्रबंधाची दखल कॅनडातील क्विन्स विद्यापीठातील प्रोफेसर डॉ. जयंत लेले यांनी घेऊन पत्राद्वारे त्यांचे कौतुक तर केलेच, पण त्याचबरोबर भारतातील प्रादेशिक वाद वाढण्यास कारणीभूत असलेल्या ‘प्रादेषिक असमतोल’ या विषयावर सखोल संशोधन करण्याचा सल्ला दिला. त्यातूच ‘प्रादेषिकवाद आणि महाराष्ट्रातील राजकारण’ हा पीच.डी.चा प्रबंध जन्माला आला.
शिक्षक, प्राध्यापक हा नवीन पिढीला, देशाला घडविणारा शिल्पकार आहे. कोणताही देश हा शाळा, महाविद्यालयाच्या वर्गामधूनच घडत असतो, हा त्यांचा विचार व्यापकता, सर्वसमावेशकता आणि दूरदृष्टी दर्शविते. डॉ.व्ही.एन.इंगोले यांचा पदवी स्तरावरील अध्यापनाचा अनुभव जवळपास ३५ वर्षे आणि पदव्युत्तर स्तरावरील अनुभव तीस वर्षे आहे. पीपल्स कॉलेजचे प्राचार्यपद त्यांनी दीड दशक भूषविले. प्राचार्य पदाची भूमिका वठवत असताना विविध क्षेत्रात विद्यार्थी आणि प्राध्यापकांना त्यांनी प्रयोगशील बनविले. त्यांच्या काळात पीपल्स कॉलेजने विविध क्षेत्रात अतिशय प्रभावी कामगीरी केली. त्यांच्या कामाची दखल घेत स्वामी रामांनंद तीर्थ विद्यापीठाने ‘उत्कृष्ट कॉलेज’ असा पुरस्कार देऊन, तर विद्यार्थिनीच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी राबविलेल्या विषेश योजनांची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने महिला सक्षमिकरणाचा खास पुरस्कार देऊन महाविद्यालयाचा विशेष गौरव केला. त्यांच्या काळात महाविद्यालयाने गुणवत्तेच्या क्षेत्रात उत्तुंग अशी भरारी घेतली. त्यामुळे पीपल्स कॉलेजला नॅकचा ‘अ’ दर्जा मिळाला, तर विद्यापीठ अनुदान आयोगाने कॉलेजची ‘कॉलेज विथ पोटेंशियल एकलंस’ म्हणून निवड करून दोन कोटी रुपयाचे विशेष अनुदान दिले. बदलत्या काळाची पाऊले उचलत आपले कॉलेज ‘डिजिटल डिव्हाईड’चे बळी ठरू नये म्हणून महाविद्यालयात अध्यापन, प्रशासन, ग्रंथालय, इत्त्यादी सर्वच विभागात संगणक आणि सॉफ्ट्वेअरचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि त्याचबरोबर महाविद्यालायात दूरस्त व निरंतन शिक्षण प्रणाली रुजविली. नरहर कुरुंदकर सभागृहाचे अध्यावतीकरण करून ते मुक्त संवादाचे केंद्र बनविले, महात्मा गांधी वसतिगृह व मुलांचे वसतीगृह अध्यावत बनविले आणि शंभर मुलिंना राहता येईल असे वसतिगृह बांधून सज्ज केले. पीपल्स कॉलेजचा परिसर तर चित्रपटाचे शुटींग व्हावे इतका सुंदर बनविला. व्यवसाय मार्ग दर्शन, कौशल्य विकास, संत गाडगे बाबा स्वच्छता पथक, जलसंधारण, सौर उर्जा, मॉर्निंग वाक ट्रॅक, रनिंग ट्रॅक, अशा अनेक योजना राबवून कॉलेजचा परिसर व्हायब्रंट केला. त्यांच्या कामाची उचित दखल घेत एका नामांकित वर्तमान पत्राने ‘कार्पोरेट प्राचार्य’ म्हणून विषेश संपादकीय लिहून त्यांचा गौरव केला होता.
वाईट परिस्थितीत शिक्षण घेणार्‍यांची मनोवस्था त्यांना चांगल्या पद्धतीने अजूनही ज्ञात आहे. त्यांच्या मते, आजच्या विद्यार्थ्यांनी परिस्थितीवर दूषणे देण्यापेक्षा परिवर्तन करण्यासाठी सतत संघर्ष देत रहावा. यशस्वी जीवन हे आपोआप आणि रेडिमेड मिळत नाही. त्यासाठी कोणताही शॉर्टकटचा मार्ग नाही. मिळेल त्या परिस्थितीशी, अनुभवाशी, घटनांशी संघर्ष करीत निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी कार्यरत राहिले पाहिजे; तरच प्राप्त झालेल्या यशाचा आनंद अद्वितीय, अतुलनीय असतो. आजच्या विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या महासागरात नि:संकोच झेप घ्यावी. ज्ञानच माणसाला वाचवू शकते. दुसरी कोणतीही गोष्ट नाही, ही खूणगाठ मनाशी पक्की बांधावी. यश हे ध्येय नसून तो प्रवास आहे, हा त्यांचा संदेश अनमोल आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सामाजिक शास्त्राचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्यापरिषद, अशा विविध पदावर काम करताना आणि नॅकच्या पिअर टिममध्ये त्यांनी हीच भूमिका मनात ठेऊन काम केले. त्यांच्या कार्याची उचित दखल घेत विद्यापिठाने ‘उत्कृष्ट प्राचार्य’ असा विद्यापीठ स्तरीय पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षक’ हा राज्यस्त्रीय पुरस्कार त्यांचा गौरव केला. नाविन्यपूर्ण शैक्षणिक आणि शिक्षणेतर उपक्रम राबविण्यासाठी सतत झटणारे डॉ.व्ही एन इंगोले सर्वांसाठी दीपस्तंभ ठरतात. महाविद्यालय, विद्यापीठ, प्राध्यापक संघटना तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विविध पदावर सरांनी कार्य केले, मात्र हे कार्य करत असताना त्यांच्यातील शिक्षक मनोवृत्ती, संशोधक आणि प्राध्यापक अधिकाधिक प्रबळ आणि प्रभावी बनलेला आहे. त्यामुळे डॉ.व्ही.एन. इंगोले हे नाव शिक्षणक्षेत्रात आदराने घेतले जाते; कारण ज्ञानाच्या प्रवाहात ते सिद्धहस्त ठरले आहे.
शिक्षणक्षेत्र हा केवळ व्यवसाय नाही; तर तो समाजाच्या पाठीचा कणा आहे, हे ध्येय त्यांनी प्रमाणभूत मानले आणि आपले संपूर्ण जीवन शिक्षण क्षेत्रासाठी समर्पित केले. खऱ्या अर्थाने आधुनिक शिक्षण व्यवस्थेतील ते तपस्वी आहेत. इतर कोणत्याही क्षेत्रातील नोकरी किंवा सेवेपेक्षा शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य ही एकदम भिन्न भूमिका आहे आणि ही भूमिका वठवितांना वेळेची मर्यादा नसते. शिक्षक, प्राध्यापक आणि प्राचार्य २४ तास १२ महिने कर्तव्यरत असणे आवश्यक आहे. शाळा महाविद्यालयाचा परिसर सोडल्यानंतरही समाज, कुटुंब आणि नगरामध्ये वावरत असताना तो शिक्षकच असतो. त्याने या भूमिकेला अनुसरूनच आपली संपूर्ण दिनचर्या, विचार आणि जीवन व्यतीत करावे; कारण तो सोशल इंजिनियर आहे. या सोशल इंजिनियरकडून एखादी चूक झाली तर संपूर्ण पिढीच्या पिढी गारद होण्याची भीती असते, हे त्यांचे विचार शिक्षण क्षेत्रातील कर्तव्य आणि भूमिकेविषयी गांभीर्य व्यक्त करतात.
डॉ. व्ही.एन.इंगोले यांनी भारताचे परराष्ट्र धोरण, भारतीय शासन व राजकारण, साने गुरुजींचे विचारधन आदी अनेक पुस्तके प्रकाशित केली असून दर्जेदार संशोधन लेख देखील त्यांचे प्रकाशित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनानुसार १५ विद्यार्थ्यांनी एम.फिल. आणि १२ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण केलेले आहे. या संशोधक विद्यार्थी व प्राध्यापकांना आजही दर्जेदार वाचन आणि लेखनाविषयी त्यांचे मार्गदर्शन अखंडित झर्‍यातील प्रवाहाप्रमाणे लाभत असते. विविध पुरोगामी आणि परिवर्तनवादी संस्था व चळवळीच्या माध्यमातून त्यांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिवर्तनाचे कार्य अखंड चालू आहे. संशोधन करणार्‍यांविषयी डॉ.व्ही.एन.इंगोले म्हणतात, केवळ पदवी किंवा काही आर्थिक व शैक्षणिक लाभ मिळविण्यासाठी संशोधन केल्या जाऊ नये. संशोधनाची स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उपयोगिता सिद्ध झाली पाहिजे. संशोधन हे समाजोपयोगी असावे. पीएच.डी. पदवी प्राप्त होणे म्हणजे संशोधन पूर्ण होणे नव्हे, तर पीएच.डी. ही संशोधन करण्यासाठी पात्र झाल्याची पदवी आहे. ही संशोधनविषयक दृष्टी त्यांचा व्यासंग स्पष्ट करते.
शिक्षण क्षेत्रातील कोणत्याही उपक्रमाविषयी ‘नाही ‘ हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाही. डॉ.व्ही.एन.इंगोले यांची इतरांशी संवाद साधण्याची भाषा, विचार, दृष्टी, तळमळ समरूपात असते. हे एका मनाने, वृत्तीने, स्वभावाने, कार्याने, चिंतनाने शिक्षक असलेल्या व्यक्तीलाच शक्य होऊ शकते. डॉ.व्ही.एन.इंगोले हे बोलके कर्ते परिवर्तनवादी आहेत. त्यांच्या दोन्ही सुपुत्रांनी केलेला आंतरजातीय विवाह सामूहिक सोहळा ठेवून आनंदाने त्यांनी साजरा केला. त्यामुळे कृतिशील परिवर्तनवादी म्हणून त्यांना मान्यता प्रदान होते.
सामाजिक कार्यात वेळेबरोबच आर्थिक मदतीचे महात्त्व त्यांनी जाणले होते. त्यामुळेच त्यांनी राष्ट्र सेवा दल, रयत आरोग्य मंडळ, सामाजिक कृतज्ञता निधी समिती, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रतिष्ठाण, नरहर कुरुंदकर प्रगत अध्ययन व संशोधन केंद्र, महात्मा गांधी वसतिगृह, कमवा शिका योजना, सुरेंद्र खेडगीकर अंध विद्यालय, सुरेंद्र खेडगीकर अपंग स्पोर्ट्स अजादमी, इत्त्यादींना सढळ हाताने आर्थिक मदत दिली असून सेवा निवृत्तीनंतरही हा दान यज्ञ चालूच आहे. नुकतीच त्यांनी नांदेड एजुकेशन संस्था, योगेश्वरी शिक्षण संस्था, सायन्स कॉलेज मुलांचे वसतीगृह, यांना देणग्या देऊन आपली सामाजिक व शैक्षणिक बांधिलकी जपली आहे.
डॉ.व्ही.एन.इंगोले यांचे व्यक्तिमत्व, विचार, कार्य पाहिल्यानंतर मनःपूर्वक अंतकरणातून म्हणावेसे वाटते, ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती, तेथे कर माझे जुळती!
डॉ. व्ही. एन.इंगोले यांच्या ७४ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना समाधानी, आनंदी, आरोग्यदायी दीर्घायु लाभो, ही सदिच्छा!
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय नांदेड.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.