ध्यानधारणेने मानवी जीवनात आमुलाग्र रूपांतरण (लेखक:डॉ.अजय गव्हाणे)

*
आधुनिक युग महत्वकांक्षा, गळाकापू स्पर्धा व प्रचंड मानसिक आणि भावनिक ताण-तणावाचे आहे. ताणतनाव व्यवस्थापन नावाची संकल्पना सध्याच्या काळात खूप जोर धरत आहे. प्रश्न असा आहे की, ताणतणाव निर्मूलन किंवा समूळ नायनाट ही संकल्पना का निर्माण होऊ शकली नाही? म्हणजे मानवाने हे गृहीत धरलेले आहे की, ताणतणाव हा राहणारच; आपण फक्त त्याचे व्यवस्थापन करू शकतो; निर्मूलन नाही.
माणसावर ही वेळ का आलेली आहे? ताणतणाव हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनलेला आहे काय? मानवी जीवन जगत असताना ताणतणाव विरहित, आनंदी, सुखी, समाधानी, जीवन तो जगू शकणार नाही का? असे प्रश्न माणसाला सतावणे साहजिक आहे.
मानवी जीवनातील सर्व प्रश्नांचे एकच उत्तर आहे; ते म्हणजे योग व ध्यान. याचा अर्थ योग आणि ध्यान केल्याने सर्व काही आलबेल होईल. सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक इ. परिस्थिती बदलेल का? निश्चितच याचे उत्तर नाही; असे आहे.
मग सर्व प्रश्नांचे रामबाण औषध योग आणि ध्यान; हे विधान वास्तविकतेवर आधारित आहे का आभास आहे, या प्रश्नांचा शोध घेणे गरजेचे आहे.
*योग आणि ध्यानधारणेचा अर्थ:*
भारताच्या आध्यात्मिक इतिहासात योगासनांना विशेष अर्थ आहे. बऱ्याच तत्वचिंतकांनी शरीर आणि मनाला वेगळे मानले आहे. त्या संदर्भातील सविस्तर विश्लेषण देखील केले आहे. मात्र शरीर आणि मन एकच आहे,हा विचारप्रवाह जवळजवळ सर्वमान्य होताना दिसतो. इंग्रजीमध्ये सायकोसोमेटिक हा शब्द वापरला जातो. शरीरमन किंवा मनशरीर असा उल्लेख केला जातो.
योगाला मोक्षासाठीचा सर्वोत्तम उपाय मानले जाते. पुन्हा प्रश्न असा आहे की, भौतिकवादी विचारसरणी मोक्ष संकल्पना मानतील का, कुंडलिनी, ऊर्जा समाधी अवस्था याला मान्यता देतील क? योग आणि ध्यानधारणा व्यक्तीच्या समस्येवर उपाय आहे, हे नाकारणे शक्य नसल्याचे आढळून येते. वेद आणि उपनिषदांपेक्षाही योगाची परंपरा प्राचीन आहे. योगविज्ञान शास्त्रीयदृष्ट्या सूत्रबद्ध करण्याचे कार्य आचार्य पतंजलीने केले. म्हणून पतंजली हे योगशास्त्राचे परमाचार्य ठरतात. योगाचा अर्थच आहे; एकत्रित होणे. योग म्हणजे मनातील बदलांना नियंत्रित करणे होय. योगाच्या प्रत्येक शैलीची मध्यवर्ती कल्पना मनावर नियंत्रण ठेवणारी आहे.
योगविज्ञानामध्ये ध्यानधारणेचेही महत्त्व आहे. ध्यानधारणा ही सरळसरळ मन व भावनेशी संबंधित आहे. तथागत भगवान बुद्धांनी जी ध्यान साधना स्पष्ट केली; ती आनापानसतीयोग आहे. हा पाली भाषेतील शब्द आहे. त्याचा अर्थ आहे नासिकेद्वारे येणारा श्वास आणि जाणाऱ्या श्वासाची स्मृति ठेवणे.
माणूस हा जवळजवळ अजागृत बेशुद्ध अवस्थेत जगत असतो; म्हणजे मन, विचार, कृती, शारीरिक हालचाली याबद्दल परिपूर्ण जागरूकता नाही. मानवी व्यक्तिमत्व खंडित व्यक्तिमत्व आहे. जवळपास सर्वजण कमी अधिक प्रमाणात खंडित व्यक्तिमत्त्वाचे भाग असतात. याचे प्रमाण जास्त झाल्यास मानसोपचार तज्ज्ञाकडे जावे लागते. मानसिक आजारामध्ये आजार झाल्याचे निकष याबद्दल बऱ्याच प्रमाणात ठोसपणा नसला तरी व्यवहार, भाषा, सवयी, प्रतिसाद, चेहऱ्यावरील हावभाव, आचरण, जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन इ. निकष लावून मानसिक आजार आहे की नाही, हे निश्चित करता येते. अति चिंताग्रस्तता, फोबिया म्हणजे अवास्तव भीती, तीव्र छंदीपणा, हिस्टेरिया, स्क्रीझोफ्रेनिया, उदासीनता, आत्महत्येचा वारंवार विचार, व्यसनाधीनता, लैंगिक विकृती, अतिनिद्रानाश, अतिविचार अशा या लक्षणांच्या आधारे मानसिक आजारांचे मोजमाप करता येते.
या सर्व विकारांना नियंत्रित व नष्ट करण्याचे आयुध म्हणजे योग आणि ध्यान होय.
तथागत भगवान बुद्धांनी दुसरे ध्यान दिले आहे; ते म्हणजे चंक्रमण ध्यान. या ध्यानाचा अर्थ म्हणजे आठ ते दहा फुटापर्यंत नजर जाणे आणि सावधानता, दक्षतेने जागरूकपणे चालावे. मानवी जीवनातील बऱ्याच शारीरिक आणि मानसिक व्याधी मानवी मनाच्या अति करण्याच्या प्रवृत्तीमुळे निर्माण झाल्याचे आढळून येते. अनेक प्रश्न, समस्या, अपघात अति घाईमुळे निर्माण होतात. ट्रॅफिक स्लोगनमधील एक स्लोगन आहे. अति घाई संकटात नेई. वाहनांच्या केवळ अपघातापुरते हे वाक्य नाही; तर मानवी जीवनातील अपघातही अति घाईमुळे होऊ शकतात. एक महत्त्वपूर्ण म्हण आपल्याकडे प्रचलित आहे की, वेळ व काळ सर्व समस्यांवरील औषध आहे.
ओशो रजनीश यांनी हिंदू, बौद्ध, जैन, शिख, ख्रिश्चन, मुस्लिम या धर्मातील ध्यान विधींना आधुनिक रूप आणि स्वरूप दिले. जवळपास एकूण ११२ ध्यानविधी संगीतमय स्वरूपात रचनाबद्ध केले आहेत. या विविध ध्यानविधींना संगीतमय व नृत्यमय स्वरूप दिले आहे.
सर्वच धर्मातील उपासना पद्धती, प्रार्थना स्थळांची रचना व नावे कितीही विभिन्न असली तरीही ध्यानधारणेबाबत सर्व धर्मांचे एकमत आहे. ओशो रजनीश यांनी स्वतः एका नवीन ध्यान प्रयोगाची आधुनिक मानवी जीवन पाहता रचना केली आहे. तो ध्यान प्रकार आहे सक्रिय ध्यान. मानवी मन, वृत्ती, भावना दमित आहेत. माणूस मनमोकळेपणे बोलणे, हसणे, रडणे आणि आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही. त्या दमित भावनांचा निचरा करण्याचे काम या ध्यानविधीत केले जाते व व्यक्ती हलकेफुलके, मोकळे, रिक्त अनुभवाला प्राप्त होतो. योग आणि ध्यानाद्वारे प्राप्त होणारी अनुभूती व्यक्तिगत आहे. प्रत्येकाला होणाऱ्या अनुभूतीमध्ये अंतर आहे.
*योग आणि ध्यानधारण्याची अनुभूती व रूपांतरण:*
कोणत्याही गोष्टीची आनंद ही कसोटी असते. तुम्ही आनंदी होत असाल तोच तुमचा मार्ग आहे. मानवी स्वभाव, वृत्ती व प्रवृत्तीमध्ये कमालीची भिन्नता आहे. एकाचा मार्ग हा दुसऱ्याला चपखल बसू शकत नाही. जे मार्ग आहेत; ते म्हणजे कर्म मार्ग, भक्ती मार्ग, ध्यान मार्ग, प्रार्थना मार्ग. प्रत्येकाने व्यक्तिशः ध्यानधारणेतील विविध प्रकारांपैकी काही प्रकारांची चाचणी करावी व स्वतःसाठी कोणता मार्ग उपयुक्त, योग्य, सहज आहे; हे शोधावे व स्वीकारावे. त्यासाठी आनंद हीच एकमेव कसोटी आहे.
एखाद्या ध्यान प्रयोगाची साधना करीत असताना क्रोध, द्वेष, घृणा, मत्सर इत्यादी विकार कमी होत असतील; तर तो स्वतःचा मार्ग असल्याचे निश्चित करावे. मात्र क्रोध जास्त येत असेल तर विपरीत मार्गाने आपण जात आहोत, हे उमजून इतर ध्यान प्रयोगांची चाचणी करावी.
मानसिक रूपांतरण:
सध्याचे जग हे माहिती, विज्ञान, तंत्रज्ञानाचे जग आहे. माहितीचे असंख्य स्रोत माणसाकडे उपलब्ध आहेत. वर्तमानपत्रे, भ्रमणध्वनी, सोशल मीडिया, इंटरनेट, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी असंख्य स्रोत आहेत. या माहितीचा संचय आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्यामुळे ताणतणाव व वैज्ञानिक उपकरणांच्या अतिवापराने शरीर व मनावर परिणाम होत असल्यास विविध मानसिक आजारांची लागण होऊ शकते. सर्वांनाच यामुळे मानसिक आजार होतील;असे नाही. यामध्ये प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी असते.
जीवन जगत असताना निरहंकार, उत्साह, सकारात्मक दृष्टी, मैत्री भावना, करुणा, संवेदनशीलता या बाबी योग आणि ध्यान धारणेद्वारे निर्माण होतात. योग आणि ध्यानधारणेमध्ये प्रवेशाकरिता अव्यस्तता, निसर्ग सानिध्य, सामूहिकता ही तत्व आवश्यक आहेत. व्यस्त माणूस ध्यान करत असेल तर तो पुन्हा पुन्हा घड्याळावर नजर टाकेल. शरीर ध्यान करेल; मात्र मन चंचल असल्यामुळे हजारो इतर काम करत असेल. ज्या ठिकाणी शरीर आहे त्या ठिकाणी मन आणि विचार असणे म्हणजे ध्यान. शारीरिक कृती आणि मन यामधील अंतर म्हणजे तणाव.
ओशो रजनीश यांनी कीर्तन, नटराज, कुंडलिनी, सक्रिय ध्यान, सुफी दरवेश नृत्य, तथाता, विपश्यना, आनापानसतियोग अशा असंख्य ध्यान प्रयोगाद्वारे मानवी जीवनातील प्रश्नांवर उपाय दर्शविले आहेत आणि मानसिक रूपांतरणासाठी एक राजमार्ग निर्माण केला आहे. आपल्या प्रवचनात त्यांनी, ध्यान हे समृद्ध आणि उत्कृष्ट मानवी जीवन जगण्याचा अंतिम टप्पा आहे,या असे म्हटले आहे.
*सारांश:*
योग आणि ध्यानधारणा मानवी जीवनाच्या कल्याणाकरिता आहे. युद्धमुक्त जगाच्या स्थापनेसाठी आहेत. सध्या इजराइल- पॅलेस्टाईन- इराण, रशिया-युक्रेन या युद्धाची धग जगातील सर्व माणसांना होरपळत आहे. अणुयुद्धाचे संकट मानवी अस्तित्व धोक्यात टाकण्याच्या उंबरठ्यावर आहे. जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे; हे विधान युद्धखोरांनी स्वीकारल्यास पृथ्वी या ग्रहावरील मानव वाचू शकेल. आणखीन एक बाब म्हणजे विज्ञान-तंत्रज्ञान माणसांसाठी आहे; माणूस विज्ञान तंत्रज्ञानासाठी नाही. विज्ञान आणि तंत्रज्ञानाला मानवी चेहरा असेल तरच ते उपकारक, हितकारक व कल्याणकारक ठरू शकेल. माणसाचा बळी देऊन शेवटी कितीही प्रगती साधली तरी ते व्यर्थ आहे माणूस जगला व टिकला पाहिजे. त्याचे मन अहंकार, युद्ध, द्वेष, घृणा, व्यक्तिगत स्वार्थ व इतरांना तुच्छ लेखण्याच्या प्रवृत्तीपासून दूर ठेवण्यासाठी योग आणि ध्यानधारणेशिवाय इतर कोणताही पर्याय नाही, असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही.
*-डॉ.अजय गव्हाणे,*
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.



