प्रा कुंभारखाने आणि रामतीर्थे यांची विद्यापीठातून सेवानिवृत्ती

नांदेड: (प्रविणकुमार सेलुकर)स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ अशोक कुंभारखाणे आणि आस्थापना विभागातील उपकुलसचिव व्यंकट रामतीर्थे यांची ३१ ऑक्टोबर रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्ती झाली आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ मनोहर चासकर यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांच्या शाल, सन्मानचिन्ह, ग्रंथ, सन्मानपत्र आणि साडी देऊन सपत्नीक सत्कार केला. यावेळी व्यासपीठावर त्यांच्या समवेत व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ डी एन मोरे, डॉ संतराम मुंडे, प्रभारी कुलसचिव डॉ एम के पाटील, ग्रंथपाल डॉ जगदीश कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
विद्यापीठामधील भौतिकशास्त्र संकुलामध्ये डॉक्टर अशोक कुंभारखाणे हे १९९७ ला अधिव्याख्याते पदावर रुजू झाले होते त्यानंतर प्रपाठक, प्राध्यापक व शेवटी वरिष्ठ प्राध्यापक पदावर त्यांनी काम पाहिले आहे. त्यानंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले आहेत.
व्यंकट प्रभू रामतीर्थे हे विद्यापीठाच्या स्थापनेपासून विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत. ते १९९४ मध्ये लघुलेखक म्हणून रुजू झाले होते. त्यानंतर स्वीय सहाय्यक, सहाय्यक कुलसचिव आणि शेवटी उपकुलसचिव पदावर त्यांनी काम पाहिलेले आहे. आज रोजी नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त होत आहेत. विद्यापीठातील त्यांच्या ३१ वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी मा कुलगुरू महोदय यांचे कार्यालय, शैक्षणिक विभाग, पदव्युत्तर विभाग, आस्थापना विभाग इत्यादी विभागांमध्ये काम पाहिलेले आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील संचालक, अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे नातेवाईक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



