ताज्या घडामोडी

एक स्थितप्रज्ञ व संयमी राजकारणी :श्री अशोकरावजी चव्हाण

महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण यांचा आज दिनांक 28 ऑक्टोबर रोजी वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांच्याबद्दल लिहिण्याचा हा प्रयत्न.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा भारत देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री एक चारित्र्यसंपन्न असे निष्कलंक व्यक्तिमत्व कै डॉ शंकररावजी चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या पोटी श्री अशोक चव्हाण यांचा जन्म झाला. जन्मापासूनच राजकीय वारसा मिळाल्यामुळे अशोकरावांना लहानपणापासूनच समाजकारण व राजकारण याची चांगली ओळख झाली. मुंबई येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शिक्षणानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला.

अशोक चव्हाण यांना त्यांच्या वडिलांकडून राजकारणाचा वारसा जरी मिळालेला असला तरी, त्यांनी स्वतःच एक वेगळ अस्तित्व निर्माण केलं आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन वेळेस मुख्यमंत्री होऊन शिखर गाठलं आहे. मागील चार दशकापासून ते डॉ शंकरराव चव्हाण यांचा राजकीय वारसा अतिशय यशस्वीपणे चालवत आहेत. नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात मागील जवळपास सहा दशकापासून चव्हाण घराण्याचे वर्चस्व आहे. नांदेड जिल्ह्याचा आजपर्यंत जो काही विकास झालेला आहे त्यामध्ये सर्वच क्षेत्रात चव्हाण कुटुंब यांचे सर्वात मोठे योगदान आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.महाराष्ट्रातील नव्हे तर बहुदा देशातील राजकारणात पिता-पुत्र दोन वेळेस मुख्यमंत्री होण्याचा मान हा चव्हाण कुटुंबाकडेच आहे. देशातील चारही सभागृहांमध्ये काम करण्याचा ज्या काही मोजक्याच नेत्यांना अनुभव मिळालेला आहे, त्यामध्ये अशोक चव्हाण हे आहेत. त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवातच लोकसभा निवडणूक जिंकुन केली.त्यानंतर विधान परिषद तसेच विधानसभा व सध्या ते राज्यसभेचे खासदार आहेत.

अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे अशी विकास कामे झालेली आहेत. केंद्र शासनाच्या कर्जमाफीचा लाभ न झालेल्या चाळीस लाख शेतकऱ्यांना सहा हजार दोनशे कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला.मागास भागाच्या विकासासाठी विशेष पॅकेज त्यांनी जाहीर केले. त्यांच्याच काळात मराठवाडा, विदर्भ पाणलोट विकास मिशनची स्थापना झाली. तसेच त्याच काळात खूप मोठ्या प्रमाणात नोकर भरती सुद्धा करण्यात आली.सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रारंभ करून मजूरीच्या दरात त्यांनी वाढ केली. त्याच बरोबर अल्पसंख्यांकाच्या विकासाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. अनेक तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यासाठी त्यांनी विशेष निधी दिला. अशोक चव्हाण यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात शासकीय कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला होता. त्यांनी औद्योगिक क्षेत्र आणि गुंतवणूक क्षेत्रात राज्याला प्रथम क्रमांक मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. त्यांच्या कार्यकाळात पोलिसांना अत्याधुनिक शस्त्र त्यांनी मिळवून दिली.राज्यातील पायाभूत सुविधा, ग्रामीण विकास, शेतकरी कल्याण आणि शिक्षण क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम राबवले.
अशोक चव्हाण हे उत्तम प्रशासक आहेत.मुख्यमंत्री असताना श्री अशोक चव्हाण यांनी अठरा अठरा तास अविरतपणे काम केलेल आहे, हे सर्व राज्याला माहित आहे. परंतु वैयक्तिक आकसापोटी व द्वेष भावनेने सिद्ध न झालेल्या एका शुल्लक कारणामुळे त्यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. ही गोष्ट पूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय वेदनादायक होती.

श्री अशोक चव्हाण यांनी केवळ सत्तेच्या माध्यमातून नाही तर नेहमीच समाजसेवेच्या भावनेने काम केलेलं आहे. नांदेड जिल्हा परिषद, महानगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा बँक आदी सर्वच प्राधिकरणावर त्यांनी नेहमीच पकड ठेवली आहे. नांदेड जिल्ह्याला सर्व सुखसुविधा निर्माण करून व विकास करून राज्यातील नंबर एकचा जिल्हा करण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे. नांदेड जिल्ह्यातील ऐतिहासिक गुरुद्वाराच्या तीनशे वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने गुरुतागद्दीचा जो कार्यक्रम नांदेडमध्ये यशस्वीपणे पार पडला, त्यासाठी जो दोन हजार कोटीचा निधी मिळाला आणि तो कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला या मध्ये अशोक चव्हाण यांचे खूप मोठे योगदान आहे. नांदेड जिल्ह्यातील विमानतळ, अतिशय सुसज्ज असे रेल्वे स्टेशन,अतिशय सोयी सुविधा युक्त असे डॉ शंकररावजी चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सुसज्ज स्टेडियम, नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान निर्मिती, नांदेड जिल्ह्यातील लोकांची सांस्कृतिक व वैचारिक भुक भागवण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, नाटक, व्याख्यानमाला इत्यादी कार्यक्रमासाठी कुसुम सभागृह, शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह, जिल्हा परिषद सभागृह, नियोजन भवन सभागृह निर्मिती तसेच कृषी महाविद्यालय त्याचबरोबर महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर,राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा निर्मिती चे श्रेय अशोकराव चव्हाण यांना जाते.राजकारणातील सौजन्यपूर्ण वर्तन आणि शांत स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य मानले जाते. विरोधकांशीही सन्मानपूर्वक वागणे, सर्व घटकांना एकत्र घेऊन निर्णय घेणे, आणि प्रत्येक समस्येकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे या त्यांच्या शैलीमुळे त्यांना सर्वत्र आदर मिळतो. नांदेड जिल्ह्यातील आणि मराठवाड्यातील जनतेशी त्यांचा प्रत्यक्ष स्नेहाचा,आत्मियतेचा संबंध आहे. त्यामुळेच ते आज जनतेचे नेते म्हणून ओळखले जातात.

अशोक चव्हाण यांना त्यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढउतार येऊन गेले पण त्यांनी प्रत्येक वेळेस शांतपणे परिस्थितीचा सामना केला. सत्ता असो वा नसो त्यांनी कधीही आपला संयम सोडला नाही. त्यांच्या या वर्तनामुळे राजकारणातील सर्व पक्षांतील लोक त्यांचा आदर करतात.
सामाजिक कार्यातही त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे. नांदेड मधील शिक्षण संस्थांच्या उभारणीत त्यांनी मोठे काम केले आहे. श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष असून आजच्या अतिशय भ्रष्ट झालेल्या काळातही कुठल्याही प्रकारचे डोनेशन न घेता ते शिक्षक,प्राध्यापकांची भरती करतात. दुरीतांचे तिमिर जावो हे या संस्थेचे ब्रीद वाक्य असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे हाच या संस्थेचा उद्देश आहे.

राजकारणासोबतच अशोक चव्हाण हे कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या पत्नी आणि भोकर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार सौ अमिताभाभी चव्हाण या देखील नेहमीच त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यात सक्रिय असतात. कै शंकररावजी चव्हाण व कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ मागील एकवीस वर्षापासून नांदेडमध्ये अविरतपणे होत असलेल्या अतिशय दर्जेदार अशा संगीत शंकर दरबार या कार्यक्रमाचे नियोजन आदरणीय सौ अमिता भाभी व श्री अशोक चव्हाण यांचे जवळचे मित्र व शारदा भवन शिक्षण संस्थेचे सचिव माजी मंत्री श्री डी पी सावंत हे अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय यशस्वीपणे आयोजित करतात व नांदेड क्रांती सांस्कृतिक भूक भागवतात. त्याचबरोबर मागील काही वर्षांपासून कुसुम महोत्सवाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील महिलांना वेगवेगळ्या स्वरूपात प्रोत्साहित करून नांदेड जिल्ह्यातील जनतेशी नाळ जोडून असतात. श्री अशोक चव्हाण व सौ अमिता भाभी चव्हाण यांच्या दोन्ही कन्या भोकरच्या आमदार श्रीजया ताई चव्हाण व सुजया ताई चव्हाण ह्या दोघीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत अतिशय समाज उपयोगी काम करताना दिसतात. त्या दोघीही अतिशय कार्य कुशल असून श्रीजया ताई चव्हाण एक अभ्यासु व उपक्रमशील आमदार म्हणून सर्वांना सुपरीचित झाल्या आहेत तर सुजयाताई चव्हाण या जबाबदारीने आपल्या वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहेत.

आजच्या काळात जेव्हा राजकारणात आरोप-प्रत्यारोप याची कुठलीच पातळी राहिलेली नसताना , द्वेष आणि संघर्ष प्रचंड वाढलेला असताना अशोक चव्हाण यांची संयमी आणि सौजन्यशील भूमिका राजकारणामध्ये व समाजकारणामध्ये एक वेगळी छाप निर्माण करते. त्यांच्या भाषणात नेहमीच सकारात्मक विचार व नांदेड जिल्ह्याच्या विकास दिसतो. राजकारण म्हणजे फक्त सत्तेचा खेळ नाही, तर लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचं माध्यम आहे हा त्यांचा विचार त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते.
श्री अशोक चव्हाण हे नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांशी संवाद साधतात. स्थानिक नेते आणि नागरिक यांच्याशी चर्चा करतात. त्यामुळे त्यांच्या विचारांना नेहमी लोकांचा पाठिंबा मिळतो. ते नेहमीच राजकारणात तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न करतात तसेच महिलांना सन्मान देतात आणि समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात.

श्री अशोक चव्हाण यांच्या आयुष्याकडे पाहिलं तर एक गोष्ट स्पष्ट दिसते,ती म्हणजे स्थितप्रज्ञता . मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी असो, खासदार किंवा आमदार म्हणून केलेले काम असो, किंवा पक्षातील वरिष्ठ पदाची भूमिका असो त्यांनी नेहमी नांदेडच्या जनतेचा विश्वास जपला आहे. त्यांच्या नेतृत्व गुणांमुळे आणि संयमी स्वभावामुळे ते आजही राजकारणात यशस्वी नेते म्हणून ओळखले जातात. अशा या अतिशय संयमी, सहनशील, अभ्यासू व स्थितप्रज्ञ राजकारण्यास पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद मिळो व त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच त्या जगतविधात्या पांडुरंग चरणी प्रार्थना.

प्रा डॉ विजय नागोराव भोसले, रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड .
मोबाईल नं 9403067252

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.