ताज्या घडामोडी

नांदेड भूलतज्ञ संघटनेतर्फे ‘इथर डे’, दिवाळी उत्सव आणि पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन

नांदेड, दि. १८ ऑक्टोबर २०२५ – नांदेड शहरातील भूलतज्ञांची संघटना सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्टस्, नांदेड (SAN) तर्फे वार्षिक ‘इथर डे’, दिवाळी उत्सव आणि नवीन कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याचे भव्य आयोजन रविवार, दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सहा ते रात्री अकरा वाजेपर्यंत हॉटेल सिटी सिम्फनी, नांदेड येथे करण्यात आले आहे. या सोहळ्यात वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, भूलतज्ञ सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांचा मोठ्या उत्साहाने सहभाग अपेक्षित आहे.

कार्यक्रमाची सुरुवात रंगतदार सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून त्यानंतर भूलतज्ञांच्या गुणवंत पाल्यांचा त्यांच्या शैक्षणिक व इतर क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सत्कार केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या मुख्य सत्रात नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ पार पडेल. यामध्ये डॉ. संगीता अग्रवाल अध्यक्ष, डॉ. अविनाश घोडके मानद सचिव, डॉ. आवार्डे रामकिशन कोषाध्यक्ष आणि डॉ. धनंजय मसलगेकर जी.सी. सदस्य म्हणून पदभार स्वीकारतील. यावेळी मावळते अध्यक्ष डॉ. शशी गायकवाड, मानद सचिव डॉ. सतीश राठोड आणि कोषाध्यक्ष डॉ. जयंत शिंदे यांच्या कार्याचा विशेष गौरव करण्यात येईल.

‘इथर डे’ हा दिवस भूलशास्त्राच्या इतिहासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे. सन १८४६ मध्ये १६ ऑक्टोबर रोजी प्रथमच शस्त्रक्रियेसाठी इथरचा वापर करून यशस्वी भूल देण्यात आली होती, ज्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात नवा युगारंभ झाला. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस ‘इथर डे’ म्हणून साजरा केला जातो.

या सोहळ्याला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) चे अध्यक्ष डॉ. प्रल्हाद कोटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सोसायटी ऑफ ऍनेस्थेसियोलॉजिस्टस्, महाराष्ट्र राज्य (SAMS) चे भावी अध्यक्ष डॉ. राजेश तागडपल्ले, मानद सचिव डॉ. शितल दलाल व कोषाध्यक्ष डॉ. सचिन चांदोळकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहतील. वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्त्वांच्या उपस्थितीमुळे हा सोहळा अधिक आकर्षक ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून शहरातील सर्व भूलतज्ञ सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय व्यावसायिक सन्मान, सांस्कृतिक आनंद आणि सणासुदीचा उत्साह यांचा संगम अनुभवणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर होणारा हा सोहळा वैद्यकीय समाजासाठी आनंद, एकात्मता आणि प्रेरणेचा क्षण ठरणार आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.