सद्यकालीन प्रश्नांवर पारदर्शक संशोधन व्हावे -माजी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे
यशवंत 'मधील प्राणीशास्त्र राष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन

नांदेड: (दि.१२ ऑक्टोबर २०२५)
विविध विषयाच्या एकत्रिकरणानंतर वास्तविक प्रगती होत असते. आपल्या क्षेत्राबरोबरच दूरवरील विचार करण्याची देखील गरज आहे. सध्या वातावरण बदल व जागतिक आरोग्य वाईट परिस्थितीतून जात आहे. अशा सध्याच्या काळातील प्रश्नांवर पारदर्शक संशोधन व्हावे, असे विचार माजी कुलगुरू आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ.देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.
यशवंत महाविद्यालयात दि.११ ऑक्टोबर रोजी डॉ.शंकरराव चव्हाण मेमोरियलमध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटकीय सोहळ्यात ते बोलत होते.
या प्रसंगी विचारमंचावर सोहळ्याचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री व श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा.श्री.डी. पी. सावंत, प्रमुख वक्ते डॉ.एम. माधवी, हैदराबाद, डॉ. माया गुप्ता, मुंबई, डॉ. चंद्रशेखर हिवरे व डॉ.गुलाब खेडकर, छत्रपती संभाजीनगर, मुख्य आयोजक व निमंत्रक माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, संयोजक सचिव प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ.संजय ननवरे यांची उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात मा.श्री.डी. पी. सावंत यांनी, आज विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे विविध प्रकाराच्या आजारांनी माणूस त्रस्त आहे. भविष्यात २०२७ मध्ये वॉटरबुल डीसीजचा धोका आहे. या प्रश्नाचे निराकरण कसे करावे, याचा अभ्यासकांनी विचार करावा.अनेक शतकांपासून प्रचलित आयुर्वेदिक औषधी आज प्रभावी ठरत आहे. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानापेक्षा प्रयोगशाळेतील प्रयोगांवरही भर द्यावा.आज युवकांना रक्तदाब, हृदयविकार होत आहेत. युवकांचे आरोग्य व सुरक्षेची दक्षता न घेतल्यास देशाची सुरक्षा धोक्यात येईल, असे विचार व्यक्त केले.
प्रारंभी प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे यांनी, माजी मुख्यमंत्री व संस्थेचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांचे सहकार्य व प्रेरणेमुळे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषदांच्या आयोजनासाठी प्रोत्साहन भेटत आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान पीएम उषा योजनेअंतर्गत अभ्यासकांना बहुविद्याशाखीय विचारपीठ उपलब्ध करून दिल्या जात आहे. यशवंत महाविद्यालयाने परामर्श व परिसरस्पर्श योजना यशस्वीरित्या राबवली. विद्यापीठ परिसरातील दहा महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनासाठी सर्वतोपरी सहकार्य केलेले आहे, असे मनोगत व्यक्त केले.
प्रारंभी इशिता रत्नपारखे या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. सोहळ्याचे इंग्रजीमध्ये उत्कृष्ट सूत्रसंचालन डॉ. एल.व्ही.पदमाराणी राव यांनी केले तर डॉ. संजय ननवरे यांनी आभार मानले.
परिषदेच्या यशस्वीतेसाठी डॉ.हनुमंतलू तमलुरकर, डॉ.धनराज भुरे, डॉ.मंगल कदम, डॉ.नीता जयस्वाल, डॉ.बी. बालाजीराव, डॉ.दीप्ती तोटावार, प्रा. नारायण गव्हाणे, प्रा.साहेब माने यांनी परिश्रम घेतले तसेच उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.
कार्यक्रमास माजी प्राचार्य डॉ.पी. बी. डावळे, के.के.एम. कॉलेज, मानवत येथील माजी प्राचार्य डॉ. चिंदुरवार, माजी प्राचार्य डॉ.गोपाळराव कदम, डॉ.एल.एम. मुदखेड, डॉ. अंबोरे यांच्यासह संपूर्ण देशातील एकूण दहा घटक राज्यातील अभ्यासक, संशोधक, प्राध्यापक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.