विद्यापीठ कॅम्पस ’आविष्कार संशोधन महोत्सव १० ऑक्टोबर रोजी पार पडणार

विद्यापीठ कॅम्पसवर स्वतंत्र “आविष्कार”
नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना व प्रयोगांचे दर्शन घडवणारा कॅम्पस ‘आविष्कार’ संशोधन महोत्सव १० ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या महोत्सवात १६५ संशोधक विद्यार्थी सहभागी होणार असून, उद्घाटन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते होईल. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक महाजन उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्र-कुलसचिव प्रा. डी. डी. पवार यांनी दिली.
राजभवनतर्फे दरवर्षी राज्यस्तरीय ‘आविष्कार’ स्पर्धा घेतली जाते. यंदा पहिल्यांदाच नांदेड कॅम्पस तसेच लातूर व परभणी सब-कॅम्पससाठी स्वतंत्र संशोधन स्पर्धेचे आयोजन नांदेड कॅम्पसवर करण्यात आले आहे. पदवी, पदव्युत्तर व संशोधन या तीन गटातील विद्यार्थी यात भाग घेणार असून, नाविन्यपूर्ण कल्पनांना मंच देण्याची ही महत्त्वाची संधी ठरणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन विद्यापीठाच्या भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाच्या वतीने करण्यात आले आहे. स्पर्धेच्या संयोजक डॉ. नीना गोगटे असून, विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक व नागरिकांना संशोधनातील भित्तीपत्रक प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन संकुलाचे संचालक प्रा. दिलीप चव्हाण यांनी केले आहे.