यशवंत ‘ मध्ये वाचन प्रेरणा दिवस निमित्त ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन

नांदेड :(दि.११ ऑक्टोबर २०२५)
यशवंत महाविद्यालय ग्रंथालयात सभागृहात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व नागरिकांकरिता ग्रंथालयाकडून मा. डॉ. राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचे जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस व अभिजात मराठी भाषा सप्ताह निमित्ताने, दि.१० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ०५ पर्यंत ग्रंथालय सभागृहामध्ये “मराठी भाषा व साहित्याचा ग्रंथसंग्रह” या विषयावर राज्य पातळीवरील एक दिवसीय ग्रंथ प्रदर्शन ग्रंथालयात उपलब्ध उपयुक्त मराठी ग्रंथांची माहिती व्हावी, याकरिता ग्रंथालय विभागाच्या वतीने ग्रंथालय सभागृहामध्ये ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी व उद्घाटक प्राचार्य तथा माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते.
उद्घाटनप्रसंगी डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी सांगितले कि, महाविद्यालय ग्रंथालयामार्फत हे सर्व ग्रंथसंग्रह व वाचनसाहित्य याची सोयीसुविधा विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध आहेत. त्याचा त्यांनी शैक्षणिक विकास व स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळविण्यासाठी पुरेपूर उपयोग करून फायदा घ्यावा. याच बरोबरीने ग्रंथालय वाचन कक्ष व ई-संसाधने (ई-रिसोर्सेस) याचाही जास्तीत जास्त उपयोग करून स्पर्धात्मक परीक्षेत यश मिळवावे.
सुरुवातीस समन्वयक ग्रंथपाल डॉ. कैलास ना. वडजे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश विषद केला. याप्रसंगी समाजशास्त्र विभागप्रमुख व ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. भरत कांबळे यांची उपस्थिती होती.
ग्रंथ प्रदर्शनात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना शैक्षणिक व विविध स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारा ग्रंथसंग्रह, ई-वाचनसाहित्य, नियतकालिके, संशोधन पत्रिका व अहवाल इ. मांडण्यात आले होते तसेच मराठी भाषा व साहित्यातील जुन्या व आधुनिक उपयुक्त ग्रंथसंग्रहाची मांडणी या प्रदर्शनात करण्यात आली होती. ज्यामध्ये मराठी विश्वकोश, शब्दकोश, सूची, व्याकरण, मराठी भाषेचा इतिहास व आढावा, समीक्षात्मक ग्रंथ व नामवंत लेखकांचे कथा, कादंबरी, कवितासंग्रह इत्यादिंचा समावेश होता.
सदरील प्रदर्शनात ग्रंथ मांडणीसाठी सहायक ग्रंथपाल संजय भोळे, श्रीमती पिंपळपल्ले, श्री.देशमुख, श्री.मोरे तसेच सर्व ग्रंथालय कर्मचारी वृंद श्री. संतोष धात्रक, तोगरे, गोरटकर, सिराज, साखरे, अलुरवाड, श्रीमती विटाळकर व श्रीमती कुकुटला यांनी परिश्रम घेतले.
या ग्रंथ प्रदर्शनास महाविद्यालय व परिसरातील बहुसंख्य विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक व नागरिकांनी भेट देऊन ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला. ग्रंथ प्रदर्शनाची सांगता संजय भोळे यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.