ताज्या घडामोडी

“ओल्या दुष्काळातही अनाठायी खर्च टाळत विद्यार्थ्यांसाठी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठाचा युवक महोत्सव”

*ज्ञानतीर्थ युवक महोत्सव १२ ते १५ ऑक्टोबर दरम्या

नांदेड: (डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सव ‘ज्ञानतीर्थ’ २०२५ येत्या १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस, विष्णुपुरी येथे संपन्न होणार आहे. या युवक महोत्सवामध्ये चार जिल्ह्यातील ८५ महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला असून सुमारे दीड हजार युवक-युवती यात आपली कला सादर करणार आहेत.
१२ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. ध्वजारोहणानंतर माननीय कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन समारंभ साध्या पद्धतीने पार पडेल. १५ ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजता पारितोषिक वितरण व समारोप सोहळा मा. कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल.
सहभागी विद्यार्थी कलावंतांना सादरीकरणासाठी पाच मंच तयार करण्यात येत असून, युवक महोत्सव परिसराला शिवरामजी पवार नगरी असे नाव देण्यात आले आहे. मंच क्रमांक एकला क्रांतिवीर बिरसा मुंडा, मंच क्रमांक दोनला डॉ. श्रीराम लागू , मंच क्रमांक तीनला पद्मश्री मोहम्मद रफी, मंच क्रमांक चारला साहित्यिक भास्कर चंदनशिव आणि मंच क्रमांक पाचला चित्रकार वासुदेव गायतोंडे अशी नावे देण्यात आली आहेत.
‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव अतिवृष्टी, पुरपरिस्थिती या सारख्या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर महोत्सवाच्या ऐवजी केवळ कलेची स्पर्धा म्हणून साधेपणाने आणि काटकसरीने घ्यावा, असे निर्देश माननीय कुलगुरू महोदयांनी दिले आहेत. त्यामुळे उद्घाटन सत्रापुर्वी घेण्यात येणारी शोभायात्रा रद्द करण्यात आली आहे. तसेच स्वागत-सत्काराला फाटा देऊन साधेपणाने आणि काटकसरीने हा युवक महोत्सव घेण्याचे निश्चित झाले आहे.
सदरील युवक महोत्सवात ३० कला प्रकारांचा समावेश असून संगीत विभागात शास्त्रीय गायन, शास्त्रीय तालवाद्य, शास्त्रीय सुरवाद्य, सुगम गायन भारतीय, सुगम गायन पाश्चात्य, समूह गायन भारतीय, समूह गायन पाश्चात्य, कव्वाली, इत्यादींचा समावेश आहे. नृत्य विभागात शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, आदिवासी नृत्य इत्यादींचा समावेश आहे. नाट्य विभागात एकांकिका मराठी किंवा हिंदी, विडंबन, मूक अभिनय, नक्कल या कलाप्रकारांचा समावेश आहे. साहित्य विभागामध्ये वाद-विवाद, वक्तृत्व, कथाकथन इत्यादींचा समावेश आहे. ललित कला विभागात चित्रकला, कोलाज, पोस्टर मेकिंग, मूर्तीकला, मेहंदी, व्यंगचित्रकला, रांगोळी, स्थळ छायाचित्रण, कलात्मक जुळवणी इत्यादींचा समावेश आहे. तर लोककला विभागामध्ये पोवाडा, लावणी, लोकसंगीत, प्रबोधनात्मक जलसा इत्यादींचा समावेश करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० रोजगारभिमुख आहे /नाही या विषयावर वादविवाद स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे. आणि वक्तृत्व स्पर्धेसाठी १) राष्ट्र जडणघडणीत युवकांची भूमिका, २) जनआंदोलने आणि भारतीय लोकशाही, ३) कृत्रिम बुद्धिमता : संधी आणि आव्हाने, ४) वृक्षसंवर्धन काळाची गरज हे चार विषय ठेवण्यात आली आहेत.
या पत्रकार परिषदेस कुलगुरु डॉ. मनोहर चासकर यांनी संबोधीत केले. त्यांच्या समवेत व्यासपीठावर प्र-कुलगुरु डॉ. अशोक महाजन, ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसचे प्राचार्य डॉ. विजय पवार, विद्यार्थी विकास विभागाचे प्र.संचालक डॉ. राजेश्वर दुडूकनाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.