माजी मुख्यमंत्री खा.श्री.अशोकरावजी चव्हाण: गौरवास्पद नेतृत्व (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

महाराष्ट्रातील विकासाभिमुख नेतृत्व म्हणून माजी मुख्यमंत्री खा. अशोकरावजी चव्हाण यांचे नाव अग्रस्थानी आहे. आपला स्वभाव आणि कार्यशैलीने जनमानसात स्वतंत्र प्रतिमा निर्माण करण्यात ते यशस्वी ठरलेले आहेत, हे कोणासही नाकबूल करता येणार नाही. जनतेच्या गळ्यातील ताईत म्हणून त्यांना संबोधने उचित ठरेल. जनतेने त्यांचे कार्य, विकासाची दृष्टी आणि संतुलित व संयमी नेतृत्व स्वीकारले, ही वस्तुस्थिती आहे.
खा. अशोकरावजी चव्हाण यांनी आपल्या कर्तृत्वाच्या दिशा उजळ केल्या. आपल्यातील स्वत्वाला पारजूनच समाजकारण, राजकारण करताना दृष्टी निकोप, व्यापक आणि समाजहितदक्ष असावी, याचा वस्तुपाठ त्यांनी भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री आधुनिक भगीरथ कै. डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्याकडून घेतला.
आपण संपूर्ण महाराष्ट्राचे राजकीय चित्र डोळ्यासमोर आणले तर खा. अशोकराव चव्हाण हे सुसंस्कृत राजकारणी असल्याचे सिद्ध होते. अनावश्यक भडक विधाने करून स्वस्त प्रसिद्धी मिळविणाऱ्या राजकारण्यांची संख्या वाढत असताना संयम आणि संतुलनाचे भान ठेवून वक्तव्य करणारे व त्याप्रमाणे कृती करणारे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण हे सुसंस्कृत राजकारण्यांच्या क्रमामध्ये येतात. चुकीची वक्तव्य करून स्वतःकडे लक्ष वेधून घेणाऱ्यांची संख्या वाढत असताना सम्यक विचार व आचार असणारे खा. अशोकरावजी राजकारणरुपी वाळवंटातील शीतमय व आल्हाददायक सरोवर आहेत.
जनतेशी कायम संपर्क, विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक विषयांवरील अभ्यास, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये तज्ञता, प्रत्येक मुद्दा व विषयाचे चांगले व प्रभावी सादरीकरण त्यांच्या व्यक्तिमत्वास असीम उंची प्रदान करते.
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सर्व जाती, धर्म, भाषेच्या लोकांना सोबत घेऊन जाणारे नेतृत्व म्हणून त्यांचे नाव प्रथम क्रमांकावर लिहावे लागेल. मानवता, समता, धर्मनिरपेक्षता हे त्यांच्या विचारांचे स्तंभ त्यांची व्यापकता सिद्ध करतात.
स्वभाव काही शांत आणि समंजस असल्यामुळे एक वेगळे गांभीर्य त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला लाभले आहे. संघटन कौशल्य उत्तम असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते, स्नेही, मित्रपरिवारही दांडगा आहे; ही खा.अशोकरावजींच्या आयुष्यातील फार मोठी उपलब्धी मानली पाहिजे.
नियोजन, व्यवस्थापन आणि सूत्रबद्धता ही त्यांच्या कार्याची त्रिसूत्री असल्यामुळे तरुण कार्यकर्त्यांचे संघटन त्यांना सहजगत्या शक्य झाले. जनाधार असलेले नेतृत्व म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना ओळखले जाते.
जनकल्याणाची निकोप आस्था आणि तळमळ यामुळे खा.श्री.अशोकराव चव्हाण यांना जनतेचा भक्कम पाठिंबा मिळाला. त्यांनी केलेली सार्वजनिक हिताची कार्य त्यांच्या दूरदृष्टीची द्योतक आहेत. नांदेड हा विभाग संपूर्ण देशाशी रेल्वे सेवा, विमानसेवेने जलद गतीने जोडल्या गेला, ही अधिक जमेची बाजू म्हणून सांगता येईल. नांदेडच्या विकासाचा एक फार मोठा टप्पा त्यांच्या नेतृत्वामुळे गाठता आला. विधायक सकारात्मक विचारांचे नेतृत्व असल्यास काय होऊ शकते, हे देशाच्या नकाशावर विकासमय नांदेडचे अढळ स्थान निर्माण झाल्यानंतर सर्वांच्या लक्षात येते.
नकारात्मकतेचा त्याग करून जनसामान्यांसाठी सदैव धडपडत राहते ते नेतृत्व. गौरवास्पद नेतृत्व, विकासमय नेतृत्व, जनतेप्रती कमालाची आस्था असणारे नेतृत्व. नेतृत्वाच्या या तीनही कसोटीस खा.अशोकरावजी चव्हाण तंतोतंत उतरले आहेत. त्यांची प्रबळ इच्छाशक्ती, दूरदृष्टी, स्थितप्रज्ञता वेळोवेळी आपणास प्रतिबिंबित होते.समन्यायी तत्व हे त्यांच्या विकासमय कार्याचा अविभाज्य भाग आहे. सार्वजनिक हिताची कामे करण्याकडे त्यांचा नेहमी कल राहिलेला आहे.
‘ घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’ या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील सर्वात चांगली गोष्ट प्रथम नांदेडमध्ये घडली पाहिजे, या त्यांच्या भावनेमुळे नांदेडकर धन्य झाले आहेत.
शैक्षणिक क्षेत्र स्वच्छ आणि शुद्ध करण्याच्या त्यांच्या तत्त्वाचे सर्व क्षेत्रातून मन भरून स्वागत झाले. आम्ही चहा पाजून प्राध्यापकांची भरती करतो. हे उभ्या महाराष्ट्राने महाराष्ट्रातील अग्रगण्य दैनिक लोकसत्तामध्ये जेव्हा वाचले; तेव्हा आधुनिक शिक्षणक्षेत्र स्वच्छ करण्याचा एक रोडमॅपच जणू त्यांनी शिक्षण क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकाला दिलेला आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना कोणताही स्पीड ब्रेकर येऊ नये, हा जिल्ह्यातील धुरीनांचा हेतू असला पाहिजे; अन्यथा प्रशासकीय अधिकारी हतबल असतात. प्रशासकांची उंची त्यांना स्वातंत्र्य आणि योग्य सहकार्यात्मक वातावरण देऊन त्यांनी वेळोवेळी वाढविली आहे.
नांदेडला नजर लागावी तशी झालेली प्रगती खा.अशोकरावजींच्या तात्विकतेमुळे झालेली आहे; हे नजरअंदाज करून चालणार नाही.सार्वजनिक हिताची कामे करीत असताना जनसामान्यांना पुरेपूर सहभागाची संधी असल्यामुळे खऱ्या अर्थाने लोकशाहीला बळ प्राप्त होत आहे.
महाराष्ट्राच्या समग्र प्रश्नांची जाण असल्यामुळे विकासाचा व्हिजन असलेले नेतृत्व म्हणून त्यांचा दबदबा आहे. जनाधार असलेले दूरदृष्टीचे अभ्यासू नेतृत्व म्हणून खा.अशोकरावजी चव्हाण हे जनसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत, हे प्रस्तुत लेखकाने राजकारणाचा अभ्यासक विद्यार्थी म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची काही निरीक्षणे नोंदविण्याचा अल्पसा प्रयत्न केलेला आहे.
-डॉ.अजय गव्हाणे,
राज्यशास्त्र विभागप्रमुख,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.



