हरवत चाललेली माणुसकी रासेयो स्वयंसेवकांनी जिवंत ठेवावी:डॉ.चंद्रकांत एकलारे

*
नांदेड: समाजातून हरवत चाललेली माणुसकी राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी जिवंत ठरवावी असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या समारोप प्रसंगी डॉ.चंद्रकांत एकलारे यांनी केले. पुढे बोलताना ते म्हणाले की, मोठ्या माणसांकडे अनुभवांची शिदोरी असते ही संस्कारांची शिदोरी विद्यार्थ्यांनी सतत आपल्या सोबत ठेवावी. दुसऱ्याच्या सुखात जो स्वतःचे समाधान शोधतो तोच खरा माणूस असतो. समाजाचा एक नियम आहे. सन्मान घ्या आणि सन्मान घ्या. राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात आपणास हेच संस्कार शिकवले जातात तेव्हा विद्यार्थ्यांनी ही संस्कारांची शिदोरी कायम आपल्या सोबत ठेवावी असे आवाहन त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभिनव भारत शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष मा.कैलासचंदजी काला होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये अभिनव भारत शिक्षण संस्थेच्या सचिव ऍड. सौ. वनिता जोशी होत्या.त्यांनीही याप्रसंगी विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमाधिकारी डॉ. आशा मेश्राम यांनीही सात दिवशीय अनुभवांचे कथन केले. त्याबरोबरच यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरातील सहभागी विद्यार्थ्यांपैकी कु. सायली सोनटक्के, अभिषेक पळसकर, गजानन राजरवाड, कु.मयुरी कुडाळे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विचार मंचावर राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ.चंद्रशेखर एंगडे, डॉ.अतिष राठोड आणि गोपाळचाडी देवस्थानचे व्यवस्थापक श्री. दत्तराम रसाळ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यासीर शेख यांनी केले तर आभार अभिषेक पळसकर याने मानले. या सातदिवसीय शिबिराच्या यशस्वीतेकरिता शिबिरातील सर्व स्वयंसेवक त्याचबरोबर श्री. माणिक निलेवाड, सौ.सुनंदा चौडेकर ताई, लिंबगावचे सरपंच सौ.कमलबाई संजयराव कदम या सर्वांचे सहकार्य लाभले.