नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर

नांदेड दि. 5 नोव्हेंबर :- नांदेड जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या 269 सदस्यांसाठी मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान तर बुधवार 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण 13 स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीचा कार्यक्रम काल 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला असून या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे, याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
नांदेड जिल्ह्यात नगरपरिषद देगलूर, नगरपरिषद भोकर, नगर परिषद धर्माबाद, नगरपरिषद किनवट, नगरपरिषद उमरी, नगरपरिषद हदगांव, नगरपरिषद मुखेड, नगरपरिषद कंधार, नगरपरिषद बिलोली, नगरपरिषद कुंडलवाडी, नगरपरिषद मुदखेड, नगरपरिषद लोहा, नगरपंचायत हिमायतनगर याठिकाणी सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 12 नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाच्या क्षेत्रात 1 लाख 47 हजार 165 पुरुष तर 1 लाख 50 हजार 858 स्त्री व इतर 20 असे एकूण 2 लाख 98 हजार 40 मतदार आपल्या मतदानाचा हक्क 351 संभाव्य मतदान केंद्रावर बजावतील.
12 नगरपरिषदांमध्ये नगरपरिषद देगलूर ही ब वर्गवारीची असून बाकी सर्व क वर्गवारीच्या नगरपरिषद व नगरपंचायत आहेत. या सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये एकूण प्रभाग संख्या 141 आहे. या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जारी करण्याची तारीख 6 नोव्हेंबर 2025 असून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास 10 नोव्हेंबर 2025 पासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर 2025 रोजी 3 वाजेपर्यत राहील. या कालावधीत येणाऱ्या रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी 18 नोव्हेंबर 2025 रोजी होईल.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी 21 नोव्हेंबर 2025 पर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी 25 नोव्हेंबर 2025 पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 26 नोव्हेंबर 2025 रोजी प्रसिध्द होईल.
मंगळवार 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी बुधवार 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.
*जात वैधता प्रमाणपत्राबाबत*
राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा आहे. तसेच नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवडून आल्याच्या दिनांकापासून 6 महिण्याच्या आत शासनाच्या 3 नोव्हेंबर 2025 च्या अध्यादेशाद्वारे तरतुद करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे तसेच उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून अधिनियमातील तरतुदीनुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल असे विहित केलेले हमीपत्र उमेदवारांने सादर करणे आवश्यक आहे.
*नामनिर्देशनाबाबत*
नामनिर्देशन स्विकारण्याची प्रक्रीया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत असल्याने नामनिर्देशन व शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाकडील सॉफ्टवेअर द्वारेच भरणे आवश्यक आहे. निवडणूक लढवू इच्छीत असणाऱ्या उमेदवारांनी https://mahasecelec.in संकेतस्थळावर स्वत: नोंदणी करावी व नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी. त्याची प्रिंट घेवून त्यावर स्वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकऱ्यांकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करावे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशनपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
*संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता*
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.
*आचारसंहिता*
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या संपूर्ण क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली असून ती निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यत अंमलात राहील. नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात ही आचारसंहिता लागू असली तरी अन्य ठिकाणीदेखील नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या मतदारांवर प्रभाव पाडणारी घोषणा किंवा कृती करता येणार नाही. नैसर्गिक आपत्तीबाबत करावयाच्या उपाययोजना किंवा मदतीसंदर्भात आचारसंहितेची आडकाठी असणार नाही. आचारसंहिता आणि कायदा व सुव्यवस्थेसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 दोन स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.
*महत्वाच्या तारखा*
• नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास सुरुवात- 10 नोव्हेंबर 2025
• नामनिर्देशनपत्रची दाखल करण्याची अंतिम मुदत- 17 नोव्हेंबर 2025
• नामनिर्देशनपत्रांची छाननी- 18 नोव्हेंबर 2025
• अपील नसलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत – 21 नोव्हेंबर 2025
• अपील असलेल्या ठिकाणी नामनिदेशनपत्र माघारीची अंतिम मुदत- 25 नोव्हेंबर 2025
• मतदानाचा दिवस- 02 डिसेंबर 2025
• मतमोजणीचा दिवस- 03 डिसेंबर 2025
0000



