यशवंत ‘ मध्ये गणितीय प्रश्नमंजुषा व प्रतिकृती स्पर्धांचे आयोजन

नांदेड:( दि.२६ डिसेंबर २०२४)
केंद्र सरकार, नॅशनल काऊंसिल फ़ॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी कम्युनिकेशन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, नवी दिल्ली, महाराष्ट्र सरकार, राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिशन संस्था आणि गणित व संख्याशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय गणित दिवसाच्या निमित्ताने नांदेड जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी दि. २८ डिसेंबर, शनिवार रोजी सकाळी दहा वाजता गणित व संख्याशास्त्र विभागात दोन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
इयत्ता दहावी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा असून यात प्रत्येक शाळेच्या ४ विद्यार्थ्यांचा एक संघ सहभागी होऊ शकतो. इयत्ता सहावी ते दहावी या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी गणितीय प्रतिकृती (मॅथ मॉडल मेकिंग) स्पर्धा असून यासाठी एका शाळेतून ५ विद्यार्थी ५ गणितीय प्रतिकृतींसह सहभाग घेऊ शकणार आहेत.
सहभागासाठी ऑनलाईन नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे (प्रश्नमंजुषा स्पर्धा : https://forms.gle/6G3qJfgkvs44EjGR9 आणि प्रतिकृती स्पर्धा : https://forms.gle/c73CcZDbp1ibdtEh6). ह्या दोन्ही स्पर्धा जिल्हास्तरीय असून यातील प्रश्नमंजुषा स्पर्धेतील पहिले २ संघ व गणितीय प्रतिकृती स्पर्धेतील पहिल्या ५ प्रतिकृती या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दि. ३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणार आहेत.
विद्यार्थ्यांचा गणिताकडे कल वाढावा आणि स्वतंत्रपणे व वेगळ्या प्रकारे विचार करण्यास वाव मिळावा तसेच समकक्ष अभ्यासार्थींसोबत बुद्धिमत्तेचा कस तपासायचा मंच मिळावा, हे स्पर्धांमागील उद्देश असून त्यात शाळांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन स्पर्धा समन्वयक माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, गणित विभागप्रमुख डॉ. एन. ए. पांडे, डॉ. व्ही. सी. बोरकर, प्रा.सचिन वडजे, प्रा.नागेश पवार, प्रा.कोमल देशमुख, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील आणि प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे यांनी केले आहे.