सौ. पार्वतीबाई बासरे स्मृती आरोग्य व्याख्यानमाला *दीर्घायु सेवा प्रतिष्ठानने आरोग्य प्रबोधनाची उत्कृष्ट परंपरा स्थापन केली- खा. अशोकराव चव्हाण*

मधुमेहाला उपचार नाही, आयुष्य आहे तोपर्यंत मधुमेहाची औषधे खावीच लागतात, असं मनामनात बिंबवल्या गेलेल्या वैद्यकीय प्रवाहामध्ये, डायबेटिस रिव्हर्सलच्या या अत्यंत गरजेच्या विषयावर ‘होलिस्टिक’ दृष्टिकोन घेऊन दीर्घायु सेवा प्रतिष्ठानने आयोजित केलेली ही आरोग्य व्याख्यानमाला दर्जेदार आहे आणि कौतुकास पात्र आहे. त्यातही, सलग ११ वर्षे नांदेडकरांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहता, दीर्घायु सेवा प्रतिष्ठानने प्रबोधनाची उत्कृष्ट परंपरा नांदेडमध्ये स्थापन केली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकरावजी चव्हाण यांनी स्व. सौ. पार्वतीबाई बासरे आरोग्य व्याख्यानमालेत बोलताना केले.
‘मधुमेहाचे गौडबंगाल’ या विषयावर नुकतेच कुसुम सभागृहात या आरोग्य व्याख्यानमालेचे ११वे पुष्प पार पडले. माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या सोहळ्यात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी, व्यासपीठावर माजी पालकमंत्री डी पी सावंत, माजी आमदार अमर राजूरकर, भगवती हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ. व्यंकटेश डुब्बे, ज्येष्ठ समाजसेवक आर. के. दाभडकर, दीर्घायु सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवानंद बासरे, सचिव श्रीनिवास भोसले, प्रमुख वक्ते डॉ. भाग्येश कुलकर्णी आणि आयुर्वेदाचार्य डॉ. ऋषिकेश म्हेत्रे यांची उपस्थिती होती. तत्पूर्वी खा. चव्हाण यांच्या हस्ते मधुमेहाचे गौडबंगाल या विषयावरील भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन पार पडले.
यावेळी पहिल्या व्याख्यानात बोलताना, मधुमेहापासून कायमची मुक्ती मिळविण्यासाठी निसर्गचक्रानुसार चालणारी जीवनशैली अंगीकारून जिभेवर संयम ठेवणे आवश्यक आहे, असे मत पुणे येथील डायबेटिक रिव्हर्सल सुपरस्पेशालिस्ट डॉ. भाग्येश कुलकर्णी यांनी व्यक्त केले. दुसऱ्या व्याख्यानात नाशिक येथील डॉ. ऋषिकेश मैत्री यांनी मधुमेह-मुक्तीचा डायट प्लॅन विशद केला. तत्पूर्वी, माजी पालकमंत्री डी पी सावंत यांनी, २०१३ मध्ये त्यांच्याच हस्ते उद्घाटन झालेल्या आरोग्य व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पास मिळालेल्या भरघोस प्रतिसादाच्या आठवणी जागृत केल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘मधुमेहाचे गौडबंगाल’ या विषयावरील दीर्घायु स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन झाले. ही स्मरणिका उपस्थितांना विनामूल्य वितरित करण्यात आली. खा. अशोकराव चव्हाण, मनपा आयुक्त डॉ. महेश डोईफोडे व इतर मान्यवरांनी सलग ३ तास थांबून संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घेतला. यावेळी कुसुम सभागृह क्षमतेपेक्षा अधिक भरलेले दिसले. सूत्रसंचालन ज्येष्ठ नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सुजाता जोशी पाटोदेकर यांनी केले. प्रास्ताविक डॉ. शिवानंद बासरे यांनी, तर श्रीनिवास भोसले यांनी आभार व्यक्त केले.