नांदेडच्या भुमिपुत्राचा छ. संभाजीनगरात गौरव सोहळा संपन्न

नांदेडः महसुल सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्ह्याचे भुमिपूत्र सारंग चव्हाण यांना छत्रपती संभाजीनगर येथे उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पालकमंत्री अब्दुल सत्तार, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी गौरविण्यात आले.
कष्टकरी कुटूंबात जन्मलेले सारंग चव्हाण हे किनवट तालुक्यातील मांडवी येथील रहिवासी असून प्रतिकूल परिस्थीतीत शिक्षण पूर्ण करुन त्यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षक पदाला गवसणी घातली. दरम्यान, पुन्हा राज्यसेवा परीक्षा देवून नायब तहसीलदार पदी त्यांची निवड
झाली. हिंगोली, कळमनुरी, औंढा नागनाथ, सेनगाव, नांदेड, कंधार येथे कार्यरत असताना महसुल विभागासोबतच कंधार न. पा. चे प्रभारी मुख्याधिकारी म्हणूनही त्यांनी उत्कृष्ट सेवा दिली. तद्नंतर तहसीलदारपदी पदोन्नती झाल्यावर परभणी जिल्ह्यातील सोनपेठ येथील कार्यकाळ पूर्ण करून गत वर्षभरापासून पैठण येथे कार्यरत आहेत. शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, अधिनस्त अधिकारी- कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय ठेवून लोकसभा निवडणूकीतही उत्कृष्ट कार्य केले. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी झटणाऱ्या भुमिपुत्राचा विभागीय पातळीवर सन्मान झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.