https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
आरोग्य व शिक्षण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार : प्राचार्य डॉ. सुधीर जगताप

————————————
उदगीर प्रतिनिधी:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सर्वगुण संपन्न, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे महामानव होते. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक, धार्मिक, कायदे, पत्रकारिता, कृषी अशा विविध क्षेत्रात आपल्या अमोघ वकृत्वाने व कुशल नेतृत्वाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दीन- दलितांच्या, श्रमिकांच्या, विस्थापितांच्या, शोषितांच्या अंधारमय जीवनाला प्रज्ञेचा संदेश दिला. त्यांचे विचार व कार्य हे मनुष्याच्या जीवनातील दुःख, दारिद्रय, आणि क्लेश दूर करण्यासाठी महत्वाचे ठरतात. आणि हेच विचार डॉ.आंबेडकरांनी संविधानात नमूद केले. त्यांनी अपर कष्ट करून आपल्याला संविधान दिले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार आहेत.असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांनी केले.
येथील स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर या संस्थेच्या विविध शाळा आणि महाविद्यालय यांच्या संयुक्तरित्या आयोजित ‘ डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती सोहळा’ कार्यक्रमात अध्यक्षीय समारोप मध्ये ते बोलत होते. यावेळी जय हिंद पब्लिक स्कूल चे प्राचार्य संजय हट्टे, स्वामी विवेकानंद अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.गोपाळ पवार, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या ज्योती तारे, फ्लॉरेन्स कॉलेज ऑफ नर्सिंग लातूर येथील प्राचार्य नागसेन तारे, जय हिंद पब्लिक स्कूलच्या न्याबेट समन्वयक मनोरमा शास्त्री, परीक्षा नियंत्रक डॉ. शेषनारायण जाधव, उपप्राचार्य डॉ.धनंजय गोंड, उपप्राचार्य सतीश वाघमारे, पत्रकारिता विभागाचे प्रमुख प्रा. राहुल पुंडगे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी पुढे बोलताना प्राचार्य डॉ. सुधीर जगताप म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्त्री वर्गाच्या, शेतकऱ्याच्या, मजूर वर्गाच्या, पददलितांच्या उद्धारार्थ त्यांनी सतत कार्य केले. यांचे शैक्षणिक विचार हे समाज परिवर्तनासाठी दिशा दर्शक होते. माणसाला आपल्या हक्काची व कर्तव्याची जाणिव ही शिक्षणामुळे होते. त्यामुळे शिक्षण हे सक्तीचे व मोफत असावे असे ते म्हणत. त्यांनी समाजातील जातीव्यवस्था, वर्णव्यवस्था, अनिष्ठ रूढी परंपरा, याचा कडाडून विरोध केला व समतेचा पुरस्कार करून समानता, बंधुता, न्याय ही मूल्ये रुजवली. डॉ.आंबेडकर स्त्रीमुक्तीचे समर्थक होते.त्यांच्या मते, कोणत्याही समाजाचे मूल्यमापन त्या समाजातल्या स्त्रियांची परिस्थिती कशी आहे, यावरून करता येते तसेच स्त्रीला प्रसूती रजा मिळवून देणारे डॉ.आंबेडकर हे जगातील पहिले व्यक्ती होते. नागरिकांना मूलभूत अधिकार देऊन डॉ.आंबेडकरांनी समृद्ध जगण्याची संधी सर्वांना दिली.असे ही ते म्हणाले.
यावेळी डॉ. शेषनारायण जाधव, मनोरमा शास्त्री, ज्योती तारे, सतीश वाघमारे, प्रा.राहुल पुंडगे यांनी आपल्या मनोगतात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन व कार्य विषयी मत व्यक्त केले.
या जयंती सोहळ्याचे प्रास्तविक प्राचार्य संजय हट्टे यांनी तर सूत्रसंचालन प्रा. अमर तांदळे यांनी केले व आभार प्रा. राहुल पुंडगे यांनी मानले. यावेळी स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

RAJ GAIKWAD

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704