ताज्या घडामोडी

निवडणुकीकरिता पोलीस यंत्रणा सज्ज : पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार

नांदेड/सु
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. इतर राज्याचे जोडत असलेल्या मार्गावर तब्बल 17 ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले असून चार बीएसएफ आणि सीआरपीएफ च्या तुकड्या दाखल झाल्या आहेत अशी माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी दिली.
लोकसभा व विधानसभा निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा पोलीस दलाकडून कारवाई सुरू आहे. जिल्ह्यात एकूण 3 हजारच्या जवळपास बुथ असून प्रत्येक बुथवर एक पोलीस कर्मचारी व एक होमगार्ड असा बंदोबस्त असणार आहे. शिवाय जिल्ह्याला जोडणार्‍या इतर राज्याच्या सिमा मार्गावर 17 ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. शिवाय प्रत्येक विधानसभा निहाय 3 एफएसटी पथक, 32 एसएसटी पथक असणार आहेत, 27 व्हिडीओ पथक यांच्या माध्यमातून सभा, बैठका यांचे व्हिडीओ चित्रीकरण केले जाणार आहेत. दरम्यान निवडणूक काळामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी जिल्हा पोलीस यंत्रणा सज्ज असून सीआरपीएफ व बीएसएफ च्या तब्बल 12 तुकड्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यापैकी चार तुकड्या नांदेडमध्ये दाखल झाल्या आहेत उर्वरीत आठ तुकड्या लवकरच दाखल होतील. त्यामुळे कुणीही कायदा बिगडविण्याचा प्रयत्न करू नये असे सांगत वारंवार गुन्हे करणार्‍या तब्बल 2 हजार आरोपीं विरूध्द आतापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 100 जणांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. निवडणूक काळात परवाना धारक बंदूक जमा करण्यात आले असून 1 हजार 200 पैकी 900 च्या जवळपास बंदूक जमा करण्यात आले आहेत.
अवैद्य धंद्याच्या विरोधातही पोलिसांकडून सातत्याने कारवाई होत असून मास रेड व कोम्बिंग ऑपरेशनही राबविले जाणार आहेत. पोलीस स्टेशनच्या अंतर्गत नियमीत पोलिसांकडून पेट्रोलिंग सुरू आहे. पोलिसांसाठी बारकोडींगही राबविले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणूक शांततेत पार पडेल असेही ते म्हणाले.
लोकसभा व सहा विधानसभेची
मतमोजणी विद्यापीठात
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभेसाठी निवडणूक एकत्र होणार आहे. विधानसभेची मतमोजणी त्या-त्या विधानसभा क्षेत्रात असते परंतू यावेळेस प्रशासनाकडून बदल करण्यात आले असून नांदेड लोकसभा मतदारसंघातील नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, भोकर, नायगांव, देगलूर व मुखेड या विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी व नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी स्वामी रामांनद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी होणार असल्याचेही पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.