इंडिया मेगा कंपनी विरोधात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न
नांदेड:
दि.14/08/23.
कुष्णूर एमआयडीसी येथील इंडिया मेगा ऍग्रो कंपनी विरोधात आपल्या हक्काच्या रकमेसाठी शेतकऱ्यांनी नांदेड शहरात रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली एल्गार पुकारला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेतकऱ्यांनी रॅली काढली, घोषणा देत रॅली निघाली होती, छ.शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून शेतकऱ्याची रॅली जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघाली होती, जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर शेतकऱ्यांना पोलिसांनी अडवले त्यानंतर शेतकरी रस्त्यावर बसून कंपनी आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत होते, थोड्यावेळाने त्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्याची आणि पोलिसांची बाचा – बाची झाली त्यावेळी सुद्धा शेतकरी मोठ्या प्रमाणात घोषणा देत होते.
पोलिसांनी रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे आणि सर्व शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आणि वजीराबाद पोलीस स्टेशनमध्ये नेले.
*या आंदोलनामध्ये शेतकऱ्याने खालील मागण्या केल्या-*
शेतकऱ्याची शेतमालाची एकरकमी रक्कम आरबीआयच्या व्याजदरानुसार देण्यात यावी.
शेतकऱ्याची फसवणूक केल्याबद्दल कंपनीच्या सर्व संचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा.
केंद्र सरकार व राज्य सरकार कडून कंपनीच्या जी सबसिडीची रक्कम येणार आहे ती प्रशासनाने ताब्यात घेऊन अन्यायग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी.
कंपनीचे सर्व परवाने/ कर हे नियमानुसार आहेत का ते तपासून योग्य ती कारवाई करावी.
कंपनी आणि संचालकाची संपूर्ण मालमत्ता ताब्यात घेऊन शेतकऱ्याची रक्कम सरकारने द्यावी.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद वंजारे, रयत क्रांती पक्षाचे उत्तम वडजे, संघटनेचे वाहतूक जिल्हाध्यक्ष नितीन आबादार, धर्माबाद तालुकाध्यक्ष व्यंकट कदम,संभाजी पाटील, शरद पाटील, अमोल डोणगावकर, तसेच या आंदोलनामध्ये कर्नाटक व तेलंगणा यातील आणि नांदेड जिल्हा व परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.