एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये वाणिज्य व व्यवस्थापनातील विविध अभ्यास मंडळाचे उद्घाटन उत्साहात संपन्न

नांदेड :(दि. २२ ऑगस्ट २०२६)
यशवंत महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन विभागाच्या वतीने विविध विद्यार्थी अभ्यास मंडळाचा उद्घाटन सोहळा दि. २१ ऑगस्ट रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी प्र- कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. प्रमुख अतिथी व उद्घाटक पीपल्स कॉलेज येथील डॉ. सचिन पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे प्रभारी अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
भारताचे माजी गृहमंत्री श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण जन्मशताब्दी वर्षापासून वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना संधी प्राप्त होण्यासाठी किंवा त्यांना सामावून घेण्यासाठी केवळ एका वाणिज्य अभ्यास मंडळाऐवजी विविध चार अभ्यास मंडळांची स्थापना करण्यात येते. वाणिज्य अभ्यास मंडळ, व्यवस्थापन अभ्यास मंडळ, कर अभ्यास मंडळ आणि बँकिंग अभ्यास मंडळ. या चार विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, संघभावना, सर्जनशीलता, उपक्रमशीलता व व्यवस्थापकीय कौशल्य विकसित करण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. ही अभ्यास मंडळे विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतात.
उद्घाटक डॉ. सचिन पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करताना, ज्ञानाबरोबरच अनुभव, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील विद्यार्थी समाजातील विविध समस्या कशा पद्धतीने सोडवू शकतात, याबाबतीत उपाय सुचविण्याची भूमिका पार पाडत असतात. या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काय करता येते; यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्तेला आपण काय व कसे काम द्यावयाचे याचा विचार विद्यार्थ्यांनी केला पाहिजे, असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसोबतच आपल्या सुप्त क्षमतांचा विकास करून नेतृत्वगुण विकसित करण्याचे आवाहन केले. या बदलत्या काळातील आव्हाने ओळखून त्याचे संधीत कसे रूपांतर करावयाचे, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्या शाखेतील विद्यार्थी नोकरीची संधी शोधण्यापेक्षा इतरांना नोकरीच्या संधी निर्माण करून देण्याचे काम करतात, असेही प्रतिपादन केले.
प्रारंभी डॉ. हरिश्चंद्र पतंगे यांनी प्रास्ताविकात विविध विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या स्थापनेची भूमिका स्पष्ट केली.
गेल्या शैक्षणिक वर्षांमध्ये विविध विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून झालेल्या कार्यक्रमाचा अनुभव काही निवडक विद्यार्थी प्रतिनिधींनी मांडला व त्यांच्यातील आत्मविश्वास व विविध कौशल्य विकसित होण्यासाठी कशी मदत झाली, याबद्दल मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, यशाचा आणि कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या वॉल ऑफ फेमचे अनावरण करण्यात आले.
यावेळी डॉ. राजरत्न सोनटक्के, प्रा.प्रियंका सिसोदिया, प्रा. भारती सुवर्णकार व प्रा. सोनाली वाकोडे आणि सर्व विद्यार्थी अभ्यास मंडळाचे विद्यार्थी, पदाधिकारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन किरपाल सिंघ यांनी केले तर शेवटी अश्विनी निलेवाड यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, चंद्रकांत मोरे यांनी सहकार्य केले.

Share

Related posts

आरआरसी प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढविण्याची: डॉ. महेश मगर यांची मागणी

Chief Editor

कै सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन

Chief Editor

राष्ट्रीय स्तरावर ऐतिहासिक यश! डॉ. संदीप काळे यांचा गौरव संपन्न!

Chief Editor

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सेवानिवृत्त हिंदी विभागप्रमुख डॉ.अनीता दिगंबरसिंह रावत यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

आज शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीतसरीचा लाभ घ्यावा – आयोजन विठ्ठल पावडे.

Chief Editor

Leave a Comment