यशवंत ‘ मध्ये हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आणि विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त विशेष व्याख्यान संपन्न.

नांदेड ( दि.१५ सप्टेंबर २०२५)
श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय हे शैक्षणिक बाबतीत नवनवीन प्रयोग करण्यात आघाडीवर असलेले महाविद्यालय आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना इतिहासाची जाणीव असावी, वर्तमानाचे भान यावे आणि भविष्याकडे जाण्यासाठी निरनिराळ्या दिशा कळाव्यात; या हेतूने महाविद्यालय विविध कार्यक्रमांचे आयोजन करत असते. महाविद्यालयाच्या या उपक्रमशीलतेची दखल घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आणि विद्यापीठाच्या वर्धापन दिना’च्या निमित्ताने आयोजित सप्ताहात विशेष व्याख्यानाच्या आयोजनाची संधी यशवंत महाविद्यालयाला दिली होती.
त्यानुसार इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.सतीश कदम, तुळजापूर यांचे ‘हैदराबाद मुक्तिसंग्राम समजून घेताना’ या विषयावरील विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे होते तर याप्रसंगी हिमायतनगर येथील इतिहास अभ्यासक डॉ.वसंत कदम यांची उपस्थिती होती.
डॉ. सतीश कदम यांनी तीन टप्प्यांत आपली विषयमांडणी केली.पहिल्या टप्प्यात निजामशाही म्हणजे काय? याच्या विवेचनात निजामाच्या भोगवादी जीवनशैलीचे वर्णन करत या अमर्याद भोगवादातून ही राजवट कशी अन्यायी बनत गेली, हे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या टप्प्यात रझाकार संघटना आणि या संघटनेने हैदराबाद संस्थानातील प्रजेवर केलेल्या अनन्वित अत्याचाराची आकडेवारीसह नोंद घेतली तर तिसऱ्या टप्प्यात हैदराबाद मुक्तिसाठी भारत सरकारच्या वतीने अतिशय कल्पकतेने केलेली पोलीस ॲक्शनची कार्यवाही उलगडून दाखवली. हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या या रोमहर्षक इतिहासाचे मराठवाड्यातील तरुण पिढीने स्मरण ठेवून या लढ्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाविषयी सदैव कृतज्ञ राहायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी, तरुण पिढीपर्यंत आपला ऐतिहासिक वारसा पोहोचविण्यासाठी अशी व्याख्याने महत्त्वाची भूमिका पार पाडत असल्याचे सांगून या विषयाच्या सखोल अभ्यासासाठी विद्यार्थ्यांनी पुढे यायला हवे,असे आवाहन केले.
याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते इतिहास अभ्यास मंडळ तसेच नंदगिरी भित्तीपत्रकाचे अनावरण करुन विद्यार्थी पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रारंभी प्रास्ताविकात इतिहास विभागप्रमुख डॉ.शिवराज बोकडे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करुन वक्त्यांचा परिचय करून दिला. डॉ.साईनाथ बिंदगे यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले तर डॉ.विश्वाधार देशमुख यांनी आभार मानले.
कार्यक्रमास डॉ.संगीता शिंदे (ढेंगळे), प्रा.राजश्री भोपाळे,प्रा.शीतल सावंत या प्राध्यापकवृंदांसह पदवी आणि पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
व्याख्यानाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.डी. एन.मोरे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, कार्यालयीन प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी सहकार्य केले.