मुखेड, जि.नांदेड (दि.१० जुलै २०२६)
ग्रामीण महाविद्यालय, कोडग्याळ, वसंतनगर, मुखेड येथील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.एस.के. कळीमठ यांनी शिक्षण क्षेत्राची मनोभावे सेवा केली. मूळ कर्नाटकचे कानडी मातृभाषा असतानाही मराठीवर प्रभुत्व प्रस्थापित करून एम.फिल. आणि पीएच.डी. ही पदवी देखील प्राप्त केली. डॉ.एस.के. कळीमठ हे शांत, संयमी, सुसंस्कृत व्यक्तिमत्व असून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील परीक्षा विभागातील त्यांचे योगदान संस्मरणीय आहे, असे प्रतिपादन यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे यांनी केले.
ग्रामीण महाविद्यालय, मुखेड येथे डॉ. एस.के.कळीमठ सेवापूर्ती गौरव सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी विचारमंचावर प्राचार्य डॉ.हरिदास राठोड, प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दिलीप स्वामी, सत्कारमूर्ती डॉ.एस.के. कळीमठ, सौ. कळीमठ, डॉ.देविदास पवार, श्री. करबसय्या स्वामी कळिमठ, सूत्रसंचालिका डॉ.कविता लोहाळे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी हरितक्रांतीचे जनक स्व.वसंतराव नाईक, मा.आ. कै. किसनराव राठोड आणि मा. आ. कै.गोविंदराव राठोड यांना अभिवादन करण्यात आले.
उपप्राचार्य डॉ.दिलीप स्वामी यांनी, डॉ.एस.के. कळीमठ यांनी कर्तव्यपूर्तता करून उत्कृष्ट प्राध्यापक हा बहुमान प्राप्त केलेला आहे. एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख सदैव राहील, असे विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.हरिदास राठोड यांनी, डॉ.एस.के. कळिमठ यांनी विविध उपक्रमात केलेल्या कर्तव्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. डॉ.एस.के.कळीमठ यांनी सकारात्मक दृष्टी ठेवून आपुलकीने प्रत्येक उपक्रमामध्ये जीव ओतून कार्य केल्याचा दाखला दिला. शेवटी डॉ. एस. के. कळिमठ यांनी सत्काराला सहृदय उत्तर दिले
याप्रसंगी मराठीचे साहित्यिक व सुप्रसिद्ध वक्ते डॉ.रामकृष्ण बदने, डॉ. देविदास केंद्रे आदींनी समायोचित मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास महात्मा फुले महाविद्यालयातील डॉ. संतोष शेंबाळे, प्रा. ए.बी.थोरवे, प्रा.क्षीरसागर, प्रा.चव्हाण, प्रा. पाटील, प्रा. हनमंगे, प्रा.शिल्पा शेंडगे, बँक व्यवस्थापक प्रफुल्ल हुंडगे, प्रा. मरकटवार, प्रा.सुभाष राठोड, प्रा. गंगनर, प्रा.गायकवाड, प्रा. एस.के.पवार, प्रा. सोमनाथ माने, आनंद राठोड, प्रा. मठपती, प्रा.विजय जाधव, प्रा. सुभाष कनकुटे, अनिकेत कळिमठ आदींसह प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होते.
