एम सी आर

ज्ञानतीर्थ–२०२६’ मध्ये आंबेडकरी जलशातून समतेचा जागर; सोशल मीडियावरील वादविवादातून तरुणाईचे वैचारिक मंथन! शाहिरीच्या दमदार सादरीकरणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर; विविध सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन

Uncategorized

नांदेड डॉ प्रवीणकुमार सेलूकर
‘ज्ञानतीर्थ–२०२६’ मध्ये आंबेडकरी जलशातून समतेचा जागर; सोशल मीडियावरील वादविवादातून तरुणाईचे वैचारिक मंथन!
शाहिरीच्या दमदार सादरीकरणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा जागर; विविध सांस्कृतिक स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीचे सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ–२०२६’ आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सांस्कृतिक कलाविष्कारांसह वैचारिक स्पर्धांनी रंगत आणली. साने गुरुजी मंचावर सादर झालेल्या आंबेडकरी जलशातून सामाजिक समता, शिक्षण, बंधुता आणि परिवर्तनाचा जागर करण्यात आला, तर पंकज उदास मंचावर रंगलेल्या वादविवाद स्पर्धेत सोशल मीडियाच्या सकारात्मक आणि नकारात्मक परिणामांवर विद्यार्थ्यांनी परखड मते मांडत वैचारिक मंथन घडवून आणले. यासोबतच समूहगायन, मृदमुर्तिकला, रांगोळी आणि भारतीय शास्त्रीय नृत्याच्या सादरीकरणांनी महोत्सवाच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली.
साने गुरुजी मंचावर सादर झालेल्या आंबेडकरी जलशाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. ‘वंदन भीमरायाला’ आणि ‘काव्यसुमने उधळीत आलो भीमरायावरी’ यांसारख्या गीतांतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्याचा गौरव करण्यात आला. पारंपरिक शाहिरी बाणा, ढोलकीची दमदार थाप आणि प्रभावी आवाजाच्या साथीने सादर झालेल्या या जलशातून समता, शिक्षण, बंधुता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला. शाहिरीच्या ओजस्वी सादरीकरणामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
पंकज उदास मंचावर ‘सोशल मीडिया : ज्ञानाचे वैश्विक भांडार की गुलामगिरीचे साधन?’ या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाच्या उपयुक्ततेसह त्याच्या अतिवापरातून निर्माण होणाऱ्या समस्यांवरही प्रभावीपणे भाष्य केले.
सोशल मीडिया हे ज्ञानप्राप्ती, संशोधन, ई-लर्निंग, कौशल्यविकास आणि जागतिक घडामोडींची माहिती मिळविण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे मत अनुकूल बाजूच्या वक्त्यांनी मांडले. सामाजिक चळवळींना व्यापक स्वरूप देणे, जनजागृती करणे आणि जगभरातील माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणे, ही सोशल मीडियाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दुसरीकडे, सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे व्यसनाधीनता, वेळेचा अपव्यय, खोट्या बातम्यांचा प्रसार, सायबर गुन्हे, नैराश्य आणि प्रत्यक्ष मानवी संवादातील घट यांसारख्या गंभीर समस्यांकडे प्रतिकूल बाजूच्या वक्त्यांनी लक्ष वेधले. तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर केल्यास ते प्रगतीचे प्रभावी साधन ठरू शकते; मात्र त्याच्या आहारी गेल्यास व्यक्तीच्या विचारस्वातंत्र्यावर आणि मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असा महत्त्वपूर्ण मुद्दाही या चर्चेतून पुढे आला.
या स्पर्धेत एमआयटी महाविद्यालय, वसमत येथील गंगाप्रसाद चव्हाण व गायत्री लालपोतू, महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूर येथील वैष्णवी मोरे व आरती मंडाळे, बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत येथील सम्राट सरोदे व प्रगती जाखणका यांनी सहभाग घेतला. तसेच सायन्स कॉलेज, नांदेड येथील शिवराज काळे व शेजल नरवाडे, केकेएम महाविद्यालय, मानवत येथील अपेक्षा बी. निर्वळ व महेश जी. लांडगे, तसेच दयानंद इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, लातूर येथील कल्पना कवळे व ऋतुजा लाडके यांनीही आपापली मते प्रभावीपणे मांडली. श्रीराम लागू मंचावर आयोजित भारतीय समूहगायन स्पर्धेत विविध महाविद्यालयांच्या संघांनी सुरेल सादरीकरणातून उपस्थितांची दाद मिळवली. समूहगायनातील स्वरांचा मेळ, सादरीकरणातील समन्वय आणि संगीताविष्कारातून विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची प्रचिती दिली.
स्मिता पाटील मंचावर आयोजित मृदमुर्तिकला स्पर्धेत ‘कुटुंब’ ही संकल्पना देण्यात आली होती. या विषयावर आधारित कलाकृती साकारण्यासाठी ३२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. मातीच्या माध्यमातून कुटुंबातील नातेसंबंध आणि भावविश्व साकारण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.
यानंतर ‘भारतीय उत्सव’ या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. भारतीय संस्कृती, विविध सण आणि परंपरा यांचे दर्शन घडविणाऱ्या आकर्षक रांगोळ्यांमधून विद्यार्थ्यांची कल्पकता आणि कलात्मकता खुलून आली. रंगांच्या सुरेख मांडणीतून भारतीय संस्कृतीचे वैविध्य आणि परंपरांचे सौंदर्य उलगडले.
नाना पाटेकर मंचावर आयोजित भारतीय शास्त्रीय नृत्य स्पर्धेत ताल, लय, मुद्राभिनय आणि पदन्यास यांच्या सुरेख संगमातून भारतीय नृत्यपरंपरेचे दर्शन घडले. यशवंत महाविद्यालयाची रुद्रानी मोरे हिने ‘शंकर वंदना’ या शास्त्रीय नृत्यप्रकाराचे प्रभावी सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. तिच्या सादरीकरणामुळे युवक महोत्सवाच्या सांस्कृतिक वातावरणात अधिकच रंगत आली.
युवक महोत्सवाच्या विविध मंचांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सूर्यकांत जोगदंड, डॉ. डी. एन. मोरे, युवक महोत्सवाचे संयोजक तथा स्वागताध्यक्ष डॉ. प्रवीण पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष प्रफुल्ल अग्रवाल, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. राजपालसिंह चिखलीकर, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मारुती गायकवाड, अधिसभा सदस्य डॉ. महेश मगर, डॉ. ए. टी. शिंदे, युवराज पाटील, प्राचार्य एल. पी. शिंदे, संयोजक सहसचिव डॉ. प्रशांत सुतकर, शशिमोहन नंदा, डॉ. डी. आर. मुंढे, डॉ. अविनाश घाडगे, आकाश करंडे यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य डॉ. ज्ञानदेव राऊत, डॉ. गणेश जोशी, डॉ. शंकर विभुते, महाविद्यालयांतील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट : कुलगुरूंनी केले विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी युवक महोत्सवातील विविध मंचांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या कलाविष्कारांचा आस्वाद घेतला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कलाप्रकारांचे त्यांनी कौतुक केले. युवक महोत्सव हे केवळ स्पर्धेचे व्यासपीठ नसून विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देणारे, सर्जनशीलतेला प्रोत्साहन देणारे आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला दिशा देणारे प्रभावी माध्यम असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

Share

Related posts

जिल्हास्तरीय अविष्कार 2026-27 संशोधन स्पर्धेचे आयोजन

Chief Editor

स्वच्छ यशवंत परिसर अभियान उत्साहात संपन्न

Chief Editor

ज्ञानतीर्थ २०२६ युवक महोत्सवात वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या लावणीला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख दत्ता कल्याणकर Employee Of The Month पुरस्काराने सन्मानित

Chief Editor

दिनांक 07 जानेवारी 2026 रोजी बी.सी.ए. विभागाकडून Data Science व AI या विषयावर एक दिवसीय विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

Chief Editor

अभ्यासू, सुसंस्कृत आणि मूल्यनिष्ठ राजकारणी : श्री डी. पी. सावंत

Chief Editor

Leave a Comment