एम सी आर
Uncategorized

अभ्यासू, सुसंस्कृत आणि मूल्यनिष्ठ राजकारणी : श्री डी. पी. सावंत

राजकारण हा केवळ सत्तेचा खेळ नसतो तर तो समाजसेवेचा, मूल्यांचा आणि जनविश्वासाचा प्रवास असतो. या प्रवासात काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की, त्यांची ओळख केवळ राजकारणी म्हणून मर्यादित राहत नाही,तर ती सुसंस्कृत व्यक्ती, शिक्षणप्रेमी, संवेदनशील प्रशासक, अभ्यासू विचारवंत आणि निरलस समाजसेवक म्हणून निर्माण होते. नांदेड जिल्ह्याचे माजी आमदार व महाराष्ट्राचे माजी वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री श्री डी. पी. सावंत हे अशाच दुर्मीळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. त्यांचा आज दिनांक 1 जुलै रोजी वाढदिवस.

मूळचे कोकणातील असलेले श्री. डी.पी.सावंत सर शिक्षणासाठी मुंबईत गेले परंतु कर्मभूमी म्हणून त्यांनी नांदेडची निवड केली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार आदरणीय श्री अशोक चव्हाण साहेब यांच्याशी असलेल्या जिव्हाळ्याच्या मैत्रीमुळे ते नांदेडशी जोडले गेले व पुढे त्यांनी या भूमीला आपली कर्मभूमी मानत तिच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला पूर्णतः समर्पित केले.

सावंत सरांच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वांत मोठा गुण म्हणजे त्यांचा प्रेमळ व विनयशील स्वभाव. अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य करूनही त्यांच्या वागण्या-बोलण्यात अहंकाराचा किंचितही स्पर्श जाणवत नाही. समोरची व्यक्ती कोणत्या जातीची, धर्माची, पंथाची, पक्षाची किंवा सामाजिक स्तरातील आहे, याचा विचार न करता प्रत्येकाशी स्नेहाने, आदराने आणि आत्मीयतेने संवाद साधणे हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा स्थायीभाव आहे. म्हणूनच त्यांच्याशी एकदा भेटलेली व्यक्ती कायमची त्यांची चाहती बनते.

राजकारणात अनेकदा कटुता, संघर्ष आणि वैयक्तिक टीका पाहायला मिळते,आज तर त्याला सीमाच राहिली नाही. परंतु सावंत सरांच्या बाबतीत याउलट अनुभव येतो. त्यांनी कधीही कोणाविषयी द्वेषाने किंवा सूडबुद्धीने बोलल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्न हास्य आणि संयमी संवादशैली हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री अशोक चव्हाण यांच्याशी असलेली त्यांची मैत्री ही आजच्या काळातील आदर्श मैत्रीचे उत्तम उदाहरण आहे. दोघे जणू एका नाण्याच्या दोन बाजू, पण या निकटच्या संबंधांचाही गर्व त्यांनी कधी बाळगला नाही. आदरणीय श्री अशोक चव्हाण आणि सौ. अमिता भाभी चव्हाण यांच्याविषयी त्यांना असलेला आदर आणि आत्मीयता त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. मराठवाड्या च्या राजकारणातील भीष्मपितामह, जलपुरुष,विकासद्रष्टे नेते कै. डॉ. शंकरराव जी चव्हाण यांना ते आपला आदर्श मानतात आणि त्यांच्या विकासदृष्टीचा वारसा पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.

सुप्रसिद्ध भागवताचार्य पूज्य रमेशभाई ओझा यांचे एक विचारप्रवर्तक वाक्य आहे, “सज्जनों की निष्क्रियता और दुर्जनों की सक्रियता राजनीति में समाज के लिए घातक है.” या वाक्याचा अर्थ जणू सावंत सरांच्या सार्वजनिक जीवनात साकार झालेला दिसतो. सज्जन, सुसंस्कृत आणि अभ्यासू व्यक्ती राजकारणात सक्रिय राहिली तरच समाजाला योग्य दिशा मिळते, याचे ते जिवंत उदाहरण आहेत.

नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा प्रचंड मताधिक्याने निवडून आल्यानंतर त्यांनी विकासाची अनेक उल्लेखनीय कामे केली. पावडेवाडी नाका येथे उभारलेला भव्य राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा, महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकांचे उभारणीतील त्यांचा पुढाकार हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. कै. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी शंभर कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले.

सार्वजनिक जीवनात अनेकांना सत्तेचा मोह होतो. परंतु सावंत सरांनी सत्ता ही सेवेचे साधन मानली. मंत्री आणि आमदार म्हणून दीर्घकाळ कार्य करूनही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही. चिखलात उमललेल्या कमळाप्रमाणे त्यांनी राजकारणात राहूनही आपले चारित्र्य, प्रामाणिकपणा आणि स्वच्छ प्रतिमा जपली. आजच्या काळात अशी मूल्यनिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्वे दुर्मीळ होत चालली आहेत.

शिक्षणक्षेत्रातही त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. आदरणीय श्री अशोक चव्हाण अध्यक्ष आणि सौ. अमिता चव्हाण उपाध्यक्ष असलेल्या श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे ते गेली पंचवीस वर्षांहून अधिक काळ यशस्वी सचिव म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या दूरदृष्टीमुळे यशवंत महाविद्यालयाने केवळ नांदेडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळी शैक्षणिक ओळख निर्माण केली आहे.

सन 2003 मध्ये त्यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘जीनियस बॅच’ या उपक्रमाने हजारो गुणवंत विद्यार्थ्यांना घडवले. नांदेडला मराठवाड्यातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र बनविण्यामध्ये त्यांच्या दूरदृष्टीचा सिंहाचा वाटा आहे. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्याशी ते अत्यंत आत्मीयतेने वागतात. प्रत्येकाची अडचण समजून घेऊन शक्य तितके सहकार्य करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. म्हणूनच संस्थेतील प्रत्येक घटक त्यांच्याविषयी आदर आणि आपुलकीची भावना बाळगतो.

शिक्षणाबरोबरच संगीत, साहित्य, क्रीडा, समाजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांची वेगळी ओळख आहे. कै. डॉ. शंकरराव चव्हाण आणि कै. कुसुमताई चव्हाण यांच्या स्मरणार्थ आयोजित होणाऱ्या ‘संगीत शंकर दरबार’ या मराठवाड्याच्या सांस्कृतिक वैभव ठरलेल्या कार्यक्रमाचे नियोजन ते सौ. अमिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत नेटकेपणाने आणि आत्मीयतेने करतात.

याशिवाय श्री साई सेवाभावी ट्रस्ट, नांदेड जिल्हा क्रिकेट संघटना, नांदेड जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन, लायन्स क्लब, चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज अशा अनेक प्रतिष्ठित संस्थांमध्ये त्यांनी यशस्वी नेतृत्व केले आहे.काही काळ त्यांनी शिर्डी येथील साईबाबा संस्थानचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी खुप चांगले काम केले आहे.

श्री सावंत सर हे एक उत्तम वाचक आणि अभ्यासू वक्ते आहेत. कोणताही विषय असो, त्यांचा अभ्यास, संदर्भ मांडणी आणि विचारांची स्पष्टता श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकते. त्यांच्या उपस्थितीने कोणत्याही कार्यक्रमाचे महत्त्व आणि प्रतिष्ठा वाढते, अशी सर्वसामान्यांची भावना आहे.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची आध्यात्मिक वृत्ती. श्री साईबाबां वरील त्यांची अखंड श्रद्धा, साधेपणा आणि सात्त्विक जीवनशैली त्यांच्या सार्वजनिक जीवनालाही मूल्यांची दिशा देत आली आहे.

आज समाजाला श्री डी. पी. सावंत यांच्या सारख्या विद्वत्ता, प्रामाणिकपणा, संयम, संवेदनशीलता आणि विकासदृष्टी यांचा सुंदर मिलाफ असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. श्री डी. पी. सावंत त्यांच्या हातून भविष्यातही शिक्षण, समाजकारण, क्रीडा, संस्कृती आणि राजकारण या सर्व क्षेत्रांत जनसेवेचे कार्य अधिक व्यापक स्वरूपात घडत राहो, त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच त्या जगत विधात्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना.🙏🙏

प्रा. डॉ. विजय नागोराव भोसले
रसायनशास्त्र विभाग,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो नं 9403067252

Share

Related posts

स्वामी विवेकानंद महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलनास उत्स्फूर्त सुरुवात

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Chief Editor

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरू *(परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यरत

Chief Editor

यशवंत ‘मध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत विशेष व्याख्यान संपन्न

Chief Editor

बंजारा आणि शीख गुरूंचे नाते: व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

Chief Editor

डिजिटल युगात हिंदीतून रोजगाराच्या अमर्याद संधी -डॉ. कोमलकुमार परदेशी

Chief Editor

Leave a Comment