*’किस्ना’ : स्त्रीमनाचा संवेदनशील वेध घेणारा कथासंग्रह*
दोन-तीन दिवसांपूर्वी भारत दाढेल यांची भेट झाली. पहिल्याच भेटीची आठवण म्हणून त्यांनी त्यांचे ‘किस्ना’ आणि ‘नावाडी’ हे दोन कथासंग्रह मला भेट दिले.
घरी आल्यानंतर सासूबाईंची नजर ‘नावाडी’वर पडली आणि वाचनाची आवड असल्याने त्यांनी त्यावर लगेचच कब्जा केला. त्यामुळे माझ्या वाट्याला ‘किस्ना’ आला. कथासंग्रहाची सुरुवातच मारुती कसाबसान यांच्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी प्रस्तावनेने होते. लेखकाच्या लेखनप्रवासाचा वेध घेणारी ही प्रस्तावना वाचकाला कथाविश्वात सहज घेऊन जाते.
भारत दाढेल यांच्या लेखनशैलीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे चित्रदर्शी वर्णन. कथा वाचताना जणू एखादा दिग्दर्शक पटकथा आपल्या डोळ्यांसमोर उभी करत आहे, असा भास होतो. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक पात्र आणि प्रत्येक वातावरण इतके जिवंत वाटते की वाचक नकळत त्या कथेत समरस होतो.
‘पऱ्याग’ ही कथा जुन्या रूढी-परंपरांमुळे स्त्रीला मिळणारी दुय्यम वागणूक आणि तिच्या आयुष्यातील वेदना प्रभावीपणे उलगडते.
‘गवळण’ या कथेत सुखी संसारावर पैशाचा मोह कसा घाला घालतो आणि त्यातून अनेकांचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होते, याचे वास्तववादी चित्रण आहे.
‘सुकबीर’ ही कथा जुन्या काळातील चित्रपटवेड, नायकांप्रती असलेले आकर्षण आणि काल्पनिक प्रेमविश्व यांचे अत्यंत हळवे चित्र रंगवते. ‘बबीता’ या प्रत्यक्षात नसलेल्या पात्रावर सुकबीरचे जडलेले प्रेम, तिच्या भेटीची ओढ आणि अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांचा विरह मनाला स्पर्श करून जातो.
‘श्यामर’ या कथेत पाल टाकून राहणाऱ्या समाजातील श्यामरच्या मनात फुललेले प्रेम, अंजूची प्रेमस्वीकृती आणि अनेक वर्षांनंतर मित्राशी झालेला संवाद अत्यंत हृदयस्पर्शी वाटतो.
‘आणि मी हिरो झालो’ या कथेत चित्रपटसृष्टीचे आकर्षण, मोठी स्वप्ने पाहणाऱ्या एका शालेय मुलाची धडपड, मुंबई गाठण्याचा प्रयत्न आणि आर्थिक परिस्थितीमुळे अपूर्ण राहिलेले स्वप्न यांचे अत्यंत वास्तव चित्रण आहे.
‘पारूबाई’ ही कथा मन हेलावून टाकणारी आहे. बालवयापासून सुरू झालेला संघर्ष, नात्यांतील विश्वासघात, मामाच्या वासनांध वृत्तीमुळे झालेली घुसमट, तमाशातील जीवन, समाजाची उपेक्षा आणि अखेरीस आलेले बेवारस एकाकी मरण – या सर्वांचा अत्यंत संवेदनशील वेध लेखकाने घेतला आहे.
‘रम्या’ या कथेत दुष्काळ, गरिबी, आर्थिक विवंचना, रक्ताच्या नात्यांतील स्वार्थ, आईची झालेली अवहेलना आणि शिक्षणाच्या जोरावर उभे राहण्याचा संघर्ष प्रभावीपणे मांडला आहे.
‘किस्ना’ ही या संग्रहातील अत्यंत हृदयस्पर्शी कथा आहे. कर्तव्यदक्ष, स्वाभिमानी आणि संस्कारी स्त्रीच्या आयुष्यातील संघर्ष, सासू-सुनेतील गैरसमज, संसार टिकवण्यासाठी केलेली धडपड, गाव सोडण्याची वेळ, पायी केलेला प्रवास, उपासमार, नवऱ्याची साथ आणि नव्या उमेदीने पुन्हा जीवनाला सामोरे जाण्याचा निर्धार या कथेत प्रभावीपणे व्यक्त झाला आहे.
एकूणच ‘किस्ना’ हा कथासंग्रह स्त्रीजीवनातील संघर्ष, शोषण, रूढी-परंपरांचे ओझे, नात्यांतील गुंतागुंत, तमाशा कलावंत स्त्रियांचे जीवन, वृद्धापकाळातील एकाकीपण, स्वाभिमान आणि जगण्याची जिद्द यांचे अत्यंत संवेदनशील चित्रण करणारा आहे.
प्रत्येक कथा स्त्रीमनाचा वेध घेते. स्त्रीच्या भावविश्वात शिरून तिच्या मनातील वेदना, स्वप्ने, आशा आणि संघर्ष यांचे सूक्ष्म चित्रण लेखकाने केले आहे. शोषित, वंचित आणि पीडित स्त्रियांच्या जीवनगाथेला कथारूप देण्याचे मोलाचे कार्य भारत दाढेल यांनी केले आहे. त्यांची प्रभावी, चित्रदर्शी आणि वास्तववादी लेखनशैली निश्चितच वाचकांच्या मनात घर करते.
लेखक भारत दाढेल यांना त्यांच्या पुढील साहित्यप्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
— सौ. सुचिता वडजे (जोगदंड)
