एम सी आर
Uncategorized

निरोगी जीवनाचा मंत्र : योग

“योग म्हणजे केवळ व्यायाम नव्हे, तर शरीर, मन आणि आत्म्या याचा समतोल साधणारी जीवनपद्धती.”
दरवर्षी 21 जून हा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय संस्कृतीने जगाला दिलेल्या अमूल्य देणग्यांपैकी योग ही सर्वश्रेष्ठ देणगी मानली जाते. आजच्या धावपळीच्या, तणावग्रस्त आणि स्पर्धात्मक जीवनात योगाचे महत्त्व अधिकाधिक वाढत आहे. शरीर निरोगी ठेवणे, मन प्रसन्न ठेवणे आणि जीवनात सकारात्मकता निर्माण करणे यासाठी योग हा अत्यंत प्रभावी मार्ग आहे.योगाचा इतिहास हजारो वर्षांपूर्वीचा आहे. भारतातील ऋषी-मुनींनी आत्मज्ञान आणि आरोग्यप्राप्तीसाठी योगसाधनेचा मार्ग विकसित केला. महर्षी पतंजली यांनी आपल्या योगसूत्रांद्वारे योगशास्त्राची मांडणी केली. “योगश्चित्तवृत्तिनिरोधः” म्हणजे मनातील चंचल वृत्तींचा निरोध करणे, ही योगाची मूलभूत संकल्पना आहे.योगाचा उगम भारतात सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी झाला. सिंधू-सरस्वती संस्कृतीतील उत्खननात सापडलेल्या मुद्रांवर योगासने करणाऱ्या आकृती आढळतात. महर्षी पतंजलींनी इ.स.पू. सुमारे दुसऱ्या शतकात ‘योगसूत्रे’ लिहून योगाच्या तत्त्वज्ञानाला शास्त्रशुद्ध रूप दिले.

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनला आहे. ‘युज्’ म्हणजे जोडणे,संयोग किंवा एकरूप होणे असा होतो. आपले मन आणि शरीर एकत्र येतात, तेव्हा त्याला योग म्हणतात. योग म्हणजे जीव व ईश्वर यांचा संयोग.योग ही मुळात एक आध्यात्मिक शिस्त आहे, जी मन आणि शरीर यांच्यात सुसंवाद साधण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या अत्यंत सूक्ष्म विज्ञानावर आधारित आहे. हे निरोगी आणि सुदृढ जीवन जगण्याचे एक विज्ञान असून ती एक कला आहे. महर्षी पतंजली यांनी योगशास्त्राची मुख्य आठ अंगे सांगितली आहेत. याला अष्टांग योग असे म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या अष्टांग योगाच्या माध्यमातून व्यक्तीच्या सर्वांगीण विकास.होतो . योग आणि आयुर्वेद हे ऐतिहासिकदृष्ट्या एकमेकांशी घनिष्ठपणे संबंधित आहेत आणि प्राचीन काळापासून एकमेकांच्या सोबतीने विकसित झाले आहेत. योगिक पवित्र ग्रंथांनुसार, योगाभ्यासामुळे वैयक्तिक चेतनेचे वैश्विक चेतनेशी मिलन होते.

“मी फिट तर कुटुंब फिट, कुटुंब फिट तर समाज फिट आणि समाज फिट तर माझा देश फिट ” फक्त एक दिवस फोटो पूरता कोणताही उपक्रम करणे म्हणजे ते साध्य करणे नाही . प्रत्येकाची शरीर-रचना ही वेगवेगळी असते.त्यात दिनचर्या, जीवनपद्धती ,आहार,आजूबाजूचे वातावरण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात.बाह्य शरीर व अंतर्मन या विशिष्ट घटनांमूळे आपण आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.

योगगुरू स्वामी रामदेव बाबा यांनी संपूर्ण जगभर योगाचा प्रसार आणि प्रचार केला आहे .संपूर्ण भारतभर फिरून त्यांनी योगाचे कार्यक्रम आयोजित करून लोकांना योगाचे महत्व सांगितले आहे. रामदेव बाबा मुळे योग घराघरात पोहोचला आहे. पूर्वी योग ठराविक लोकांनाच ज्ञात होता. योग सुरुवातीला तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनाखालीच केला पाहिजेत. तो करण्याची पद्धत लोकांना माहिती नव्हती .यापूर्वी स्वामी शिवानंद, श्री टी. कृष्णमाचार्य, जग्गी वासुदेव, स्वामी कुवलयानंद, श्री योगेंद्र, स्वामी रामकृष्ण , श्री अरविंद, महर्षी महेश योगी, आचार्य रजनीश, पट्टाभिजोईस, बी. के. एस. अय्यंगार, स्वामी सत्यानंद सरस्वती इत्यादींसारख्या महान व्यक्तींच्या शिकवणीमुळे योग सर्वत्र पसरला आहे.1893मध्ये शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांनी भारतीय योग आणि वेदान्त तत्त्वज्ञानाचा पाश्चात्य जगात प्रसार केला. त्यांनी योगाला एका सर्वसमावेशक जीवनशैलीच्या रूपात मांडून ज्ञान, भक्ती, कर्म आणि राजयोग यांचा त्यांनी समन्वय साधला.

27 सप्टेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला. या प्रस्तावाला 177 देशांनी सहप्रायोजकत्व दिले. त्यानंतर 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस “आंतरराष्ट्रीय योग दिवस” म्हणून घोषित केला.21 जून हा वर्षातील सर्वात मोठा दिवस असल्यामुळे त्याला विशेष महत्त्व आहे. 2015 पासून जगभरात हा दिवस उत्साहात साजरा केला जात आहे.

योगामुळे शरीर सुदृढ, लवचिक आणि ऊर्जावान बनते. नियमित योगाभ्यासामुळे अनेक शारीरिक समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. शरीराची लवचिकता वाढते,योगासने स्नायूंना ताण देतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढवतात. त्यामुळे शरीर अधिक लवचिक बनते तसेच हृदयाचे आरोग्य सुधारते.योगामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, रक्ताभिसरण सुधारते आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो. योग आणि प्राणायामामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती मजबूत होते. त्यामुळे विविध आजारांशी लढण्याची क्षमता वाढते, चयापचय प्रक्रिया सुधारते. नियमित योगाभ्यास वजन कमी करण्यास आणि नियंत्रित ठेवण्यास मदत करतो.

अनुलोम-विलोम, कपालभाती, भ्रामरी यांसारख्या प्राणायामांमुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते आणि श्वसनसंस्थेचे कार्य सुधारते. मानसिक आरोग्यासाठी योग फार महत्वाचा आहे .आजच्या युगात तणाव, चिंता आणि नैराश्य या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. योगाने मन शांत आणि स्थिर राहते.एकाग्रता वाढते.सकारात्मक विचारसरणी वाढते ,आत्मविश्वास वाढतो.चिंता आणि नैराश्य कमी होते.ध्यान आणि प्राणायामामुळे मनातील नकारात्मकता दूर होऊन अंतर्मनाला शांती मिळते.आताच्या स्पर्धेच्या काळात विद्यार्थी जीवनात अभ्यासाचा ताण, स्पर्धा आणि करिअरची चिंता यामुळे मानसिक दबाव वाढतआहे. अशा परिस्थितीत योग विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतो.सूर्यनमस्कार, भुजंगासन, तडासन, पवनमुक्तासन यांसारखी आसने विद्यार्थ्यांसाठी विशेष महत्त्वाची आहेत. हि असने शरीराला लवचिकता आणि ताकद देतात.मानसिक आरोग्याच्या दृष्टीने योग अतिशय प्रभावी आहे. आजच्या धावपळीच्या जगात ताणतणाव, चिंता, नैराश्य यांसारख्या समस्या प्रचंड प्रमाणात वाढत आहेत. स्मरणशक्ती वाढते.एकाग्रता सुधारते.अभ्यासातील कार्यक्षमता वाढते.आत्मविश्वास निर्माण होतो.मानसिक संतुलन राखण्यास मदत होते.आज अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योग शिक्षणाला प्रोत्साहन दिले जात आहे.

महिलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी सुद्धा योग विशेष उपयुक्त आहे. हार्मोनल असंतुलन, तणाव, पाठदुखी, लठ्ठपणा यांसारख्या समस्यांवर योग लाभदायक ठरतो. गर्भावस्थेत योग्य मार्गदर्शनाखाली केलेला योग आई आणि बाळाच्या आरोग्यासाठी उपयुक्त मानला जातो.वाढत्या वयाबरोबर शरीरातील लवचिकता कमी होते आणि विविध आरोग्य समस्या निर्माण होतात. नियमित योगाभ्यासामुळे सांधेदुखी, पाठदुखी, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. वृद्धावस्थेत मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवण्यास योग मदत करतो.सध्या मोबाईल, संगणक आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे लोकांचे शारीरिक श्रम कमी झाले आहेत. चुकीच्या आहारपद्धती,वाढलेला स्क्रीन टाइम, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे अनेक जीवनशैलीजन्य आजार वाढत आहेत. अशा परिस्थितीत योग ही काळाची गरज बनली आहे.दररोज केवळ 30 ते 45 मिनिटे योगाभ्यास केल्यास शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहू शकतात.

आज जगभरात ३० कोटींहून अधिक लोक नियमितपणे योग करतात. अमेरिका, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया प्रत्येक खंडात योग केंद्रे उभी राहिली आहेत. ‘योगा’ या शब्दाला आता ऑक्सफर्ड डिक्शनरीत अधिकृतपणे स्थान मिळाले आहे. ही बाब भारतासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. आपल्या ऋषी-मुनींनी हजारो वर्षांपूर्वी जे ज्ञान साधनेने मिळवले, ते आज जगाच्या कल्याणासाठी वापरले जात आहे यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. विविध संशोधनांमधूनही योगाचे आरोग्यदायी फायदे सिद्ध झाले आहेत.योगामुळे भारताची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर अधिक दृढ झाली आहे. योग हा आज जागतिक आरोग्य चळवळीचा महत्त्वाचा भाग बनला आहे.थोडक्यात काय तर आरोग्य, आनंद आणि आत्मोन्नतीचा मार्ग म्हणजे योग.योग आपल्याला केवळ निरोगी शरीर देत नाही, तर जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोनही देतो. आधुनिक युगातील अनेक समस्यांवर योग हा प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे. अनेक संशोधनांनी हे सिद्ध केले आहे की योग केल्याने कॉर्टिसॉल (ताणाचे संप्रेरक) कमी होते आणि सेरोटोनिन वाढते. अनेक तज्ञ डॉक्टर सुद्धा अनेक पेशंटला योग करण्याचा सल्ला देताना सध्या सर्वत्र दिसतात.

 

 

 

 

 

 

 

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचा संकल्प करावा. योग ही केवळ एक दिवस साजरी करण्याची बाब नसून आयुष्यभर अनुसरण्याची जीवनशैली आहे.21 जूनचा आंतरराष्ट्रीय योग दिवस हा भारताच्या प्राचीन ज्ञानपरंपरेचा जागतिक गौरव आहे. निरोगी शरीर, शांत मन आणि समृद्ध जीवन यांचा मार्ग योगातूनच सापडतो. आजच्या तणावपूर्ण आणि वेगवान जगात योग हा मानवजातीसाठी एक आशेचा किरण ठरत आहे. त्यामुळे “करू योग, राहू निरोग” हा मंत्र स्वीकारून प्रत्येकाने योगाचा अंगीकार करणे ही काळाची गरज आहे.

सर्वांना आंतरराष्ट्रीय योग्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा .
|| सर्वे भवन्तु सुखिनः । सर्वे सन्तु निरामयाः ॥🙏🙏

प्रा डॉ विजय नागोराव भोसले, रसायनशास्त्र विभाग, यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो क्र 9403067252

Share

Related posts

महाराष्ट्रात 3 दिवस दुखवटा…. सुट्टी जाहीर

Chief Editor

सुदृढ शरीर व आनंदी जीवनासाठी दररोज व्यायाम आवश्यक : मनीषा जायभाये”

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

माता रमाई यांच्या त्यागामुळे कोटी कोटी कुळांचा उद्धार -डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

बालकलाकारांच्या अदाकारीने रंगले स्नेहसंमेलन

Chief Editor

निवडणूक अधिकारी, कर्मचारी याचे पहिले प्रशिक्षण संपन्न

Chief Editor

Leave a Comment