एम सी आर
Uncategorized

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहपूर्वक संपन्न*

गणितीयशास्त्र संकुलांतर्गत ‘अनंत क्लब’चे आयोजन

नांदेड:
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या गणितीयशास्त्र संकुल व त्यांच्याशी संलग्न ‘अनंत क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माजी विद्यार्थी स्नेहमेळावा दि.१४ जून, २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या मेळाव्यास प्रथम बॅच (२००९-१०) विविध बॅचमधील एकूण ७८ माजी विद्यार्थी उपस्थित होते. त्यापैकी बहुतांश माजी विद्यार्थी जुन्या बॅचमधील होते. उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी हा स्नेहमेळावा आपल्यासाठी अत्यंत अविस्मरणीय व आनंददायी असल्याचे मत व्यक्त केले. दीर्घकाळानंतर एकत्र आलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील सुखद आठवणींना जिवंत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर उपस्थित होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, तर आयक्यूएसीचे संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी व संकुलाच्या संचालिका डॉ. रुपाली जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
संकुलाच्या संचालिका डॉ. रुपाली जैन यांनी स्कूल ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेसच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा घेतला. संकुलाची शैक्षणिक परंपरा, संशोधनातील यश, तसेच विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करताना त्यांनी या समृद्ध परंपरेवर अभिमान व्यक्त केला. माजी विद्यार्थ्यांचे योगदान संकुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी असून, त्यांचा संकुलाशी असलेला संवाद अधिक दृढ राहावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
विविध बॅचमधील माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रातील अनुभव व कामगिरीची माहिती उपस्थितांसमोर मांडली. विशेष म्हणजे, संकुलाच्या पहिल्या बॅच (२००९-१०) मधील माजी विद्यार्थीही या मेळाव्याला उपस्थित होते, तसेच २०२१-२२ पर्यंतच्या नवीन बॅचमधील विद्यार्थीही सहभागी झाले होते. अनेक वर्षांनंतर जुन्या मित्र-मैत्रिणी परस्परांना भेटल्याने संपूर्ण संकुल परिसर आनंद व आपुलकीने भरून गेला होता.
यामध्ये डॉ. जे.डी .माशाळे ( पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ) निखिल बासटवार (सांख्यिकी अधिकारी, नियोजन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड), अफजल शेख (सांख्यिकी अधिकारी, आरोग्य विभाग, लातूर), रोहिणी मोरे (संशोधिका, व्हीआयटी विद्यापीठ, आंध्र प्रदेश), सय्यद जलील (सहायक प्राध्यापक, हिमायतनगर), सुनील क्षीरसागर (संशोधक, व्हीआयटी विद्यापीठ, आंध्र प्रदेश), संदीप जाधव (उद्योजक, पुणे), कपिल भद्रे (एसएएस, आदित्य बिर्ला, मुंबई), संभाजी शिंदे (प्रशिक्षण केंद्र, धर्माबाद), दिव्या शिंदे (मॅनेजर, जनरल इन्शुरन्स कंपनी, गव्हर्मेंट ऑफ इंडिया), अजय कदम (सांख्यिकी अधिकारी, आरोग्य विभाग, हिंगोली), प्रतिमा घनसावद, शितल कौर (शिक्षक, जिल्हा परिषद नांदेड) यांचा समावेश होता. त्यांनी संकुलातील आपले दिवस, आत्मीय मैत्री व येथून मिळालेली संस्कारांची शिदोरी यांच्या आठवणी भावपूर्ण रीतीने व्यक्त केल्या.
त्यानंतर आयक्यूएसीचे संचालक व सहयोगी प्राध्यापक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी माजी विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन आठवणींवर आधारित विशेष चित्रफीत (ॲल्युमनी मेमरीज व्हिडिओ) सादर केली. जुन्या क्षणचित्रांमुळे सर्व आठवणी पुन्हा सजीव झाल्याने अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले.
विद्यापीठाचे कुलसचिव व संकुलाचे माजी संचालक डॉ. ज्ञानेश्वर पवार यांनी आपल्या मनोगतात संकुलाशी असलेले ऋणानुबंध व्यक्त केले. संकुलाचे सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टदायक होते; संचालक म्हणून सुमारे दहा वर्षांचा प्रवास तसेच व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून पार पाडलेली जबाबदारी त्यांनी विशद केली. एकेकाळी व्याख्यानासाठी एलसीडी प्रोजेक्टरही बाहेरून आणावा लागत अशा प्रतिकूल परिस्थितीतून संकुलाने सेट, नेट व गेट परीक्षांमध्ये उल्लेखनीय प्रगती साधली. संध्याकाळच्या नेट-सेट कोचिंग व विविध कार्यशाळांमुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता उंचावल्याचे त्यांनी विशेष नमूद केले. स्नेहमेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी ‘अनंत क्लब’चे आभार मानले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी माजी विद्यार्थी ही कोणत्याही शैक्षणिक संस्थेची खरी ओळख व बलस्थान असल्याचे प्रतिपादन केले. संस्थेच्या विकास व प्रतिष्ठेत माजी विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे असून, त्यांनी आपल्या मातृसंस्थेशी असलेले ऋणानुबंध कायम जपावेत, असे आवाहन त्यांनी केले. ज्ञान, संशोधन व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या जोरावर विद्यापीठ नव्या उंची गाठत असून, या प्रवासात माजी विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांनी आपल्या अनुभवांचे मार्गदर्शन विद्यमान विद्यार्थ्यांना द्यावे व त्यांना प्रोत्साहित करून उज्ज्वल भविष्यासाठी पाठबळ उभे करावे, असेही ते म्हणाले. गणितीय शास्त्र संकुलाच्या समृद्ध परंपरेवर अभिमान व्यक्त करताना त्यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कार्यक्रम सचिव डॉ. उषा सांगळे यांनी स्नेहमेळाव्याची उद्दिष्टे स्पष्ट केली. माजी विद्यार्थ्यांचे संकुलाशी असलेले नाते अधिक दृढ करणे, त्यांच्या अनुभव व मार्गदर्शनाचा लाभ विद्यमान विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे तसेच परस्पर स्नेह व ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. आयोजनासाठी करण्यात आलेल्या परिश्रमांचाही आढावा त्यांनी यावेळी घेतला.
“एकट्याने आपण थोडे साध्य करू शकतो; परंतु एकत्रितपणे आपण मोठी कामे करू शकतो” या विचाराचा प्रत्यय देणारा हा स्नेहमेळावा सर्व उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन गोविंद सूर्यवंशी व कल्याणी कळसकर यांनी केले. या यशस्वी कार्यक्रमासाठी संकुलातील प्राध्यापक, कर्मचारी, संशोधक विद्यार्थी व अनंत क्लबच्या विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी कार्यक्रम सचिव डॉ. उषा सांगळे , डॉ. अनिकेत मुळे, डॉ. नितीन दारकुंडे व श्री. उदय दिव्यवीर यांच्यासह प्राध्यापकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
———————–

Share

Related posts

आर्यनचे जीवन क्षेत्र पुनर्संचयित करणाऱ्या प्रकल्पावर संशोधन

Chief Editor

मालेगावात दिवसाढवळ्या चोरी; शिवशक्ती ज्वेलर्स मालकाची बॅग लंपास

Chief Editor

आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री कोनिडला पवन कल्याण यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन

Chief Editor

कै सौ कमलताई जामकर महाविद्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती व सामाजिक समता सप्ताह समारोप कार्यक्रमाचे आयोजन 

Chief Editor

नांदेडमध्ये भरदिवसा खून; इंदिरानगर परिसरात खळबळ

Chief Editor

धर्माबाद येथे ग्रंथदान उपक्रम : १६,७३९ रुपयांचे ९० ग्रंथ महाविद्यालयाला भेट

Chief Editor

Leave a Comment