गणेश कोंडेकर, राजू द्याडे व रमेश गंडले यांना सेवापूर्तीनिमित्त सन्मानपूर्वक निरोप
नांदेड: प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये प्रदीर्घ काळ सेवा बजावलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव समारंभ शुक्रवार, दि.३१ जुलै, २०२६ रोजी विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी अधीक्षक गणेश मारोतीराव कोंडेकर, सांख्यिक राजू काशिनाथराव द्याडे आणि वरिष्ठ लिपिक रमेश दत्तोबा गंडले यांना सेवापूर्तीनिमित्त सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन होते. यावेळी कुलसचिव प्रा. डॉ. ज्ञानेश्वर पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सेवानिवृत्त होत असलेले गणेश कोंडेकर, राजू द्याडे आणि रमेश गंडले हे सपत्नीक व्यासपीठावर उपस्थित होते.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ.अशोक महाजन यांनी तिन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विद्यापीठाच्या सेवेत प्रदीर्घ काळ केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. विद्यापीठाच्या जडणघडणीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असून, तिन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करून डॉ. महाजन यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांना पुढील निवृत्ती जीवनासाठी आरोग्यदायी, आनंदी व सुखी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
परीक्षा विभागातील अधीक्षक गणेश कोंडेकर यांनी विद्यापीठाच्या सेवेत तब्बल ३० वर्षे ७ महिने सेवा बजावली. त्यांनी दि. १ जानेवारी १९९६ रोजी कनिष्ठ लिपिक म्हणून विद्यापीठ सेवेत प्रवेश केला. त्यानंतर वरिष्ठ लिपिक, सहायक अधीक्षक आणि अधीक्षक अशा विविध पदांवर त्यांनी जबाबदारी सांभाळली. विशेष कक्ष, परीक्षा विभाग, आस्थापना विभाग तसेच शैक्षणिक विभागात त्यांनी विविध जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेनिमित्त विद्यापीठाच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला.
राजू द्याडे यांनी दि. २८ फेब्रुवारी २००६ रोजी सांख्यिक पदावर विद्यापीठ सेवेत प्रवेश केला. त्यांनी २० वर्षे ५ महिने ८ दिवस सेवा बजावली. विद्यापीठातील विविध जबाबदाऱ्या त्यांनी समर्थपणे पार पाडल्या. त्यांच्या सेवापूर्तीनिमित्त विद्यापीठाच्या वतीने त्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला.
विद्यापीठाच्या लातूर उपपरिसरातील वरिष्ठ लिपिक रमेश गंडले यांनी दि. १३ सप्टेंबर २०१२ रोजी कनिष्ठ लिपिक म्हणून विद्यापीठ सेवेत प्रवेश केला. त्यांनी सुमारे १३ वर्षे १० महिने १८ दिवस सेवा बजावली. आपल्या सेवाकाळात त्यांनी विविध प्रशासकीय जबाबदाऱ्या पार पाडल्या. सेवापूर्तीनिमित्त त्यांचाही विद्यापीठाच्या वतीने सत्कार करून पुढील निवृत्ती जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तिन्ही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा विद्यापीठ प्रशासन तसेच कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट देऊन सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेसाठी कृतज्ञता व्यक्त करत उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या योगदानाचा गौरव केला.
यावेळी सेवानिवृत्त होत असलेल्या गणेश कोंडेकर, राजू द्याडे आणि रमेश गंडले यांनी विद्यापीठातील आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील विविध अनुभवांना उजाळा दिला. विद्यापीठाच्या सेवेत कार्यरत असताना मिळालेले सहकार्य, मार्गदर्शन आणि आपुलकीच्या आठवणी व्यक्त करत त्यांनी विद्यापीठ प्रशासन, अधिकारी, कर्मचारी व सहकाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. विद्यापीठाच्या सेवेत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून त्यांनी विद्यापीठाच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच कर्मचारी पतसंस्था व संघटनांचे पदाधिकारी यांचासह सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————–
