नांदेड, दि. २६ : राष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी युवकांनी स्वदेशी आणि स्वावलंबनाचा विचार अंगीकारणे ही काळाची गरज आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेला स्वावलंबन, स्वदेशी, अंत्योदय आणि एकात्म मानवतावादाचा विचार आजही समाजाला दिशा देणारा आहे. समाजातील शेवटच्या घटकाचा विकास झाल्याशिवाय खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास साध्य होऊ शकत नाही. त्यामुळे युवकांनी त्यांचा स्वदेशी व स्वावलंबनाचा महामंत्र जोपासावा, असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदेड येथील समाजशास्त्र विभागाच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांच्या हस्ते पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले की, पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी भारतीय समाजव्यवस्था आणि संस्कृतीच्या मूलभूत मूल्यांवर आधारित एकात्म मानवतावादाचा विचार मांडला. व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा विकास परस्परपूरक असला पाहिजे. वैश्विक एकता, सामाजिक समरसता आणि परस्पर सहकार्यातूनच समाजाचे व्यापक कल्याण साध्य होऊ शकते. युवकांनी केवळ स्वतःच्या प्रगतीपुरता विचार न करता समाजातील गरीब, वंचित आणि दुर्बल घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सक्रिय योगदान दिले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विकासाची फळे पोहोचविण्याची अंत्योदयाची संकल्पना प्रत्यक्षात आणणे ही आजच्या काळाची आवश्यकता आहे. स्वदेशीचा स्वीकार, स्वावलंबनाची वृत्ती आणि सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव युवकांमध्ये निर्माण झाल्यास सक्षम व समताधिष्ठित समाजनिर्मितीला बळ मिळेल, असे मतही डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. कल्पना कदम आणि समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. बिभीषण करे यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनकार्याचे तसेच त्यांच्या सामाजिक व आर्थिक विचारांचे स्मरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सय्यद जमीर यांनी केले, तर प्रा. स्नेहा आहेर यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कु. राधिका नरहिरे, वेदांत जोशी, निखिल हैबते, दुर्गा डहाळे, गीता डुकरे, दीपक काटकर आणि रणवीर वाघमारे आदी विद्यार्थ्यांनी विशेष सहकार्य केले.
या कार्यक्रमास महाविद्यालयातील विविध विभागांचे विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
