नांदेड : आजच्या स्पर्धात्मक आणि रोजगाराभिमुख युगात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी इंग्रजी भाषा व संवादकौशल्ये अत्यंत महत्त्वाची आहेत. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने आपले विचार मांडणे, प्रभावीपणे संवाद साधणे आणि विविध व्यावसायिक परिस्थितींमध्ये सक्षमपणे स्वतःला व्यक्त करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. एम. वाय. कुलकर्णी यांनी केले.
नेताजी सुभाषचंद्र बोस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदेड येथील इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित ‘Certificate Course in Professional English and Communication Skills’ या प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या या पंधरा दिवसीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल त्यांनी समन्वयक डॉ. संदीप काळे यांचे विशेष अभिनंदन केले. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. कुलकर्णी म्हणाले, “संवादकौशल्य हे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातील अत्यंत महत्त्वाचे कौशल्य आहे. प्रभावी संवादामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शैक्षणिक, सामाजिक तसेच व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता विकसित होते. अशा अभ्यासक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला निश्चितच चालना मिळते.” भविष्यातही अशा कौशल्याधारित अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेऊन सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
उद्घाटन कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा. डॉ. के. एम. कदम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी इंग्रजी विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी इंग्रजी भाषेतील प्रावीण्यासोबतच प्रभावी संवादकौशल्य, सादरीकरण कौशल्य आणि आत्मविश्वास विकसित करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक व व्यावसायिक संधींचा अधिक सक्षमपणे सामना करता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभागप्रमुख प्रा. डॉ. जे. एस. मसुरे यांनी केले. त्यांनी प्रमाणपत्र अभ्यासक्रमाची उद्दिष्टे, स्वरूप आणि विद्यार्थ्यांसाठीची उपयुक्तता स्पष्ट केली. या अभ्यासक्रमात संवादात्मक आणि प्रात्यक्षिक अध्यापन पद्धतींवर विशेष भर देण्यात आला. संभाषण सराव, गटचर्चा, सादरीकरण, मुलाखत कौशल्य, सार्वजनिक वक्तृत्व तसेच दैनंदिन आणि व्यावसायिक प्रसंगांवर आधारित विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा व संवादकौशल्यांचा विकास करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
आजच्या रोजगाराभिमुख आणि स्पर्धात्मक वातावरणात केवळ पदवी किंवा शैक्षणिक ज्ञान पुरेसे नसून प्रभावी संवाद, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व, सादरीकरण कौशल्य, मुलाखत कौशल्य आणि व्यावसायिक इंग्रजीचा योग्य वापर या बाबी विद्यार्थ्यांच्या यशासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर सदर प्रमाणपत्र अभ्यासक्रम विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढविण्यासोबतच उच्च शिक्षण, नोकरीच्या मुलाखती, स्पर्धा परीक्षा आणि विविध व्यावसायिक संधींसाठी त्यांना अधिक सक्षम करणारा ठरला.
‘Learn – Communicate – Succeed’ या व्यापक उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषेवरील आत्मविश्वासात वाढ झाली. विविध कृतीप्रधान आणि अनुभवाधारित उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचा दैनंदिन तसेच व्यावसायिक जीवनात प्रभावी वापर करण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अभ्यासक्रम समन्वयक डॉ. संदीप काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. डॉ. एस. जी. कुलकर्णी, डॉ. जी. एम. भोजने, अभिनय पाटील, दीपक, मोहन आणि अमानज्योत यांनी विशेष परिश्रम घेतले. समारोप समारंभास प्रमाणपत्र अभ्यासक्रमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
