एम सी आर

प्रचंड परिश्रम आणि प्रामाणिकपणाची कहाणी म्हणजे पांडुरंग वाघमारे यांचे ,’नावाडी’ आत्मकथा.

Uncategorized

परिश्रमाचे शिलालेख कोरलं की जीवनात आनंद निर्माण होते. अशा परिश्रमाच्या बळावर अनेक व्यक्तिमत्वांनी आपल्या पाऊल खुणा उजागर करत समाज मनाला प्रेरणा आणि नवी दिशा दिली आहे आणि अशी माणसंच आज समाजाला दिशादर्शक ठरत आहेत. ही अत्यंत आनंदाची बाब म्हणावी लागेल. प्रचंड परिश्रम आणि प्रामाणिकपणाची कहाणी म्हणजे पांडुरंग वाघमारे गुरुजी यांचे ‘नावाडी’ नावाचे आत्मकथन समाजाला दिशादर्शक ठरणारे आहे.
मराठी साहित्यात आत्मकथनाचे सामाजिक वास्तव मांडण्याचे प्रभावी माध्यम म्हणून आत्मकथनाकडे पाहिले जाते. विशेषतः दलित, वंचित, श्रमिक आणि उपेक्षित समाजातील लेखकांनी आपल्या अनुभवांतून समाजातील विषमता, अपमान, अगतिकता, शोषण आणि संघर्ष यांचे वास्तवदर्शी चित्रण अशा आत्मकथनांच्या माध्यमातून प्रगट होताना दिसते. आत्मकथनामुळे समाजातील दुर्लक्षित घटकांचे जीवन त्यांच्या वेदना, स्वाभिमान, संघर्ष आणि परिवर्तनाची आकांक्षा वाचकांसमोर येत असते. आत्मकथन हा केवळ वैयक्तिक जीवनाचा दस्तऐवज राहत नाही, तर तो सामाजिक आणि संस्कृतीक इतिहासाचा स्त्रोतही ठरत असतो. आत्मकथन म्हणजे व्यक्तीच्या जीवनानुभवांतून साकारलेले स्वतःच्या जीवनाचे हे कथन असते. ‘नावाडी’ या पांडुरंग वाघमारे यांच्या जीवनानुभवाची एकूणच संघर्षमय कहानी ‘नावाडी’ या आत्मकथनाच्या माध्यमातून पत्रकार, कथालेखक आणि साहित्यिक भारत दाढेल यांनी शब्दबद्ध केली आहे.

कंधार तालुक्यातील शेकापूर या गावात वडील माणिकराव वाघमारे आणि आई गिरजाबाई वाघमारे यांच्या पोटी जन्मलेले पांडुरंग वाघमारे यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर आणि काटेरी वाटेचा होता‌. वयाच्या १२ व्या वर्षापासून सुरू झालेला हा संघर्षमय प्रवास त्यांच्या जीवनाला नवा आकार देत राहिला. १९६१ साली दलित मित्र धनाजीराव घोडजकर यांच्या सहवासात आले. पुढे त्यांना तत्कालीन समाजकल्याण मंत्री मधुकररावजी घाटे आणि बाबुराव भारस्कर यांच्या सुगंधी सहवासाने त्यांच्या जीवनाला नवा आकार प्राप्त झाला. आणि पांडुरंग वाघमारे यांच्या परिश्रमाचे आणि प्रामाणिकपणाचे फळ मिळत गेले. प्रचंड हालापेष्ठा आणि निष्ठा ठेवून काम करणारा हा कार्यकर्ता कायम घोडजकर आणि त्यांच्या वस्तीगृहातील लेकरांप्रती असलेली त्यांची तळमळ आणि कळकळ आज पांडुरंग गुरुजी वाघमारे यांना वैभव प्राप्त झाले,हे त्यांच्या निष्ठेचे आणि प्रामाणिकपणाचे फळ म्हणावे लागेल. पांडुरंग गुरुजी यांनी आपले आई-वडील, दलित मित्र धनाजीराव घोडजकर आणि माजी मंत्री मधुकरराव घाटे यांना गुरुस्थानी कायम मानले आहे. पांडुरंग गुरुजी यांनी धनाजीराव घोडजकर यांच्यासोबत अत्यंत हलाखीच्या पडत्या काळापासून म्हणजेच १९६१ पासून १९८६ पर्यंत अत्यंत विश्वासू सहकार्य म्हणून त्यांच्यासोबत आपलेपणाचा अछि ममत्वभावाचा स्नेहबंध जपला आहे.
पांडुरंग वाघमारे यांच्या जीवनाची खरी कलाटणी मिळाली ती बारूळच्या धरणापासून आणि तिथूनच त्यांच्या जीवनाचे खऱ्या अर्थाने सोने झाले. प्रचंड परिश्रम, शेवटच्या घटकापर्यंत प्रामाणिकपणा आणि प्रचंड जिद्द ही या आत्मकथ्राची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. माणूस परिश्रमाच्या बळावर काय करू शकतो, हे पांडुरंग वाघमारे यांनी सिद्ध करून दाखविले आहे. राजकारणातील आणि समाजकारणातील अनेक आठवणींचा उजाळा या आत्मकथनात पांडुरंग वाघमारे यांनी कथन केला आहे. हाताला मिळेल ते काम करणे हे पांडुरंग गुरुजी वाघमारे यांचे वैशिष्ट्ये होती.अनेक वेळा त्यांनी बंड खोदणे,पऊळ रचने, निंदने- खुरपणे, ज्वारी पाडणे, गुत्ते घेणे, आंबे विकणे यासह अनेक लहान मोठी कामे त्यांनी केले आहेत. अशी लहान मोठमोठी काम करताना त्यांनी कधी लाजरे बुजरेपणा केला नाही.
१९०३ सालच्या दुष्काळाचे अनेक विदारक अनुभव पांडुरंग वाघमारे यांनी या आत्मकथनाच्या माध्यमातून उजागर केले आहेत. प्लेगची साथ आणि घराघरात मरण यातना भोगणाऱ्या अनेक प्रसंगाचे मन पिळवटून टाकणारे चित्रण त्यांनी यात मांडले आहेत. पुढे त्यांना भजनाची आवड निर्माण झाली आणि ते भजनात रमू लागले. अभंग, भारुड, गवळणी हा त्यांच्या वैश्विक जीवनाचा भाग झाला. राम जन्मला, घालितो पिंगा,आई गाई अंगणी,नका करा कंगा..
म्हशीच्या दुधाचा वास येतो, धन्याच्या मनाची भ्रांत जाते.. अशी भारुड पांडुरंग वाघमारे गुरुजी भजनाच्या आवडी रमत खेले. पुढे त्यांना अक्षराची ओळख झाली.एकदा पानशेवडी गावात गाडगेबाबांचे कीर्तन पांडुरंग वाघमारे यांनी ऐकले आणि त्यांच्या वडिलांना मी गाडगेबाबा सोबत जातो असे म्हणू लागले, वडिलांनी समजूत काढली, तुझं वय अजून लहान आहे. पुढे पाहू असं म्हणाल्यामुळे ते गावातच रमले. पुढे ते कुस्तीच्या फडात रमू लागले.गावोगावी आजूबाजूच्या खेड्यात यात्रेच्या निमित्ताने कुस्तीचे फडही त्यांनी अनेक वेळा गाजवली आहेत.
माणसाच्या जीवनात काही व्यक्तिमत्व भेटतात आणि पार त्या माणसाचं जीवनच बदलून जातं. तसंच पांडुरंग वाघमारे गुरुजी यांच्या जीवनात त्यांच्या गावातीलच शेकापुरातील गणपती नावाचे पाटील भेटले आणि पांडुरंग गुरुजी यांना नांदेडला जाण्याची संधी मिळाली आणि तिथूनच पांडुरंग गुरुजी यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली, झाले असे की ,गणपती पाटील यांच्याकडे मोठी आमराई होती ,ती आमराई पांडुरंग गुरुजी वाघमारे यांनी विकत घेतली. आंबे तोडून कंधारला आणले, कंधार मध्ये त्याची विक्री जास्त झाली नाही मग करायचे काय? असा विचार करत ते आंबे नांदेडलाही घेऊन जावेत असा विचार करून दोन गाड्या भरून ते आंबे नांदेड मध्ये इतवारा भागात दोन खोल्या घेऊन तिथे टाकले. आंब्याचा धंदा चांगला चालू लागला आणि तिथे दलित मित्र धनाजीराव घोडजकर यांची ओळख झाली. राहायला जागा आणि खायला भाकर ह्या दोन गोष्टी मिळाल्या की समाजातील मुलं नक्कीच शिकतील असं त्यांना वाटू लागलं आणि मातंग समाजातील मुलांसाठी वस्तीगृह काढण्याचा विचार धनाजीराव घोडजकर आणि पांडुरंग वाघमारे यांनी केला आणि आंब्यासाठी घेतलेल्या पांडुरंग वाघमारे यांच्या दोन खोल्या आणि बाचोटी करांच्या दोन खोल्यात वस्तीग्रह चालू केले. पहिल्या वर्षीच ३५ मुलं वसतिगृहासाठी मिळाली. घोडजकर कार्यालयीन काम पाहायचे आणि पांडुरंग वाघमारे हे धान्य, पाणी, लाकडं, दळण आणणे हे काम करायचे पुढे अनेक अडचणींचा सामना करत एक एक कागदपत्र जमा करायला लागले. समाजातील उच्चशिक्षित एडवोकेट गोविंदराव बराळीकरांनी त्यांना नियमावली तयार करून दिली. आणि महात्मा गांधी समाज सुधारक विद्यार्थी वसतिगृह असे नाव वस्तीगृहाला देण्यात आले. औरंगाबादला जाऊन संस्थेची नोंदणी केली. संस्थेचे अध्यक्ष सदबा पांगरीकर, उपाध्यक्ष पांडुरंग वाघमारे आणि सचिव धनाजीराव खोडसकर १९६२ साली सात माणसाची कार्यकारणी तयार करून संस्थेची उभारणी केली आणि त्या संस्थेचा आज वटवृक्ष होताना आपण पाहतो आहोत.
१९६२ साली शंकरराव चव्हाण देशाचे गृहमंत्री झाले. त्यांचा नांदेडला सत्कार करण्यात आला. त्यावेळी शामराव कदम हे नांदेड जिल्हा बँकेचे चेअरमन होते. यांच्यासोबत शंकरराव चव्हाण यांना धनाजीराव घोडजकर आणि पांडुरंग वाघमारे यांची भेट झाली. शामराव कदम यांनी या दोन कार्यकर्त्यांनी वस्तीगृह काढले आहेत. त्यांना शासनाची मान्यता नाही. आपण त्यांना सहकार्य करावे असे सांगितले.पुढे शंकरराव चव्हाण साहेबांनी रीतसर अर्ज करायला सांगितले आणि काही दिवसातच त्यांच्या वस्तीगृहाला शासनाची मान्यता मिळवून दिली.
पुढे धनाजीराव घोडजकर यांना बाबुराव भारस्कर यांनी चेनापूर येथे आश्रम शाळेला मान्यता दिली. तिथेही पांडुरंग गुरुजी यांनी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम केले. त्या शाळेत आठव्या वर्गाच्या मान्यतेसाठी पांडुरंग वाघमारे यांनी केलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. पुढे त्यांनी वीट भट्टीचा कारखाना आणि वीट भट्टी संस्थेची नोंदणी केली. अनुदान मिळाले,तोही धंदा पांडुरंग वाघमारे यांनी अत्यंत निष्ठेने आणि परिश्रमपूर्वक यशस्वी केला,परंतु सोबतच्या मंडळींची त्यांना साथ मिळाली नाही. त्यामुळे त्या धंद्यातही ते फार काळ रमले नाहीत.१९९२ साली पांडुरंग वाघमारे गुरुजी यांना महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार मिळाला आणि तिथूनच त्यांच्या खऱ्या शैक्षणिक कार्याला सुरुवात झाली. पुढे त्यांनी एक वस्तीगृह आणि आज तीन शाळा त्यांच्या संस्थेच्या नावावर आहेत. त्यांच्या वस्तीगृहात आणि शाळेत अनेक गोरगरीब, उपेक्षित, वंचितांची लेकरं आज शिक्षण घेत आहेत. ‘शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही’ हा बाबासाहेबांचा विचार खऱ्या अर्थाने पांडुरंग वाघमारे गुरुजी यांनी कृतीत उतरवून शेकडो विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या पायावर उभं करून आज वेगवेगळ्या पदांवर त्यांचे विद्यार्थी काम करतात ही त्यांच्या कर्मयोगाची खरी पावती म्हणावी लागेल. प्रचंड परिश्रम, जिद्द, त्याग आणि प्रामाणिकपणाची जोड असली की माणसाचं कल्याण होते. हे पांडुरंग वाघमारे गुरुजी यांनी आपल्या सबंध आयुष्यात दाखवून दिलं आहे.
आज वयाची ८९ वर्ष चालू असतानाही पांडुरंग वाघमारे गुरुजी कायम सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात कायम अग्रेसर राहत असतात. शिक्षणाविषयीची तळमळ आणि कळकळ असणारे ते एक समाजशील व्यक्तिमत्व म्हणून नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुपरिचित आहेत. गोरगरीब, उपेक्षित, वंचित, आणि सामान्यातल्या सामान्य लेकरांना आणि माणसांना आपल्या परीने कायम मदतीचा हात पुढे करत अनेकांची संसार उभी करण्यात पांडुरंग वाघमारे गुरुजी यांचा मोठा पुढाकार राहिला आहे. अशा समाजशील व्यक्तिमत्त्वाची ओळख समाजाला व्हावी आणि समाजात काही मूल्य, तत्व रुजावीत या दृष्टीने पत्रकार आणि कथा लेखक भारत दाढेल यांनी या ‘नावाडी’ आत्मकथनाचे शब्दांकन करून वाचकांसाठी ते खुले केले आहे. याचा मनस्वी आनंद आहे. अशा ध्येयवेढ्या आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठी कायम तत्पर असणाऱ्या समाजशील व्यक्तिमत्त्वाच्या शब्द सामर्थ्यास आणि त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा आणि शुभकामना…

शिवा कांबळे
राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक
तथा
सदस्य सचिव
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, महाराष्ट्र शासन.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विद्यापीठात अभिवादन

Chief Editor

युवक हा राष्ट्र क्रांति घडवून आणणारा बलवान हत्यार:मा.श्री.नारायण चौधरी”

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

यशवंत ‘चे जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये घवघवीत यश

Chief Editor

Leave a Comment