एम सी आर

युवा कल्पकतेने केले मुक्या मातीला बोलके! ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात मृदमूर्तीकलेतून तरुणाईने जोडले मातीशी नाते रांगोळीतून रंगांची उधळण; कलात्मक जुळवणीतून टाकाऊ वस्तूंना नवे रूप

Uncategorized

युवा कल्पकतेने केले मुक्या मातीला बोलके!

ज्ञानतीर्थ युवक महोत्सवात मृदमूर्तीकलेतून तरुणाईने जोडले मातीशी नाते

रांगोळीतून रंगांची उधळण; कलात्मक जुळवणीतून टाकाऊ वस्तूंना नवे रूप
नांदेड,: डॉ प्रवीणकुमार सेलूकर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि नांदेड एज्युकेशन सोसायटीच्या सायन्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ज्ञानतीर्थ-२०२६’ आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात रविवारी तरुणाईच्या कल्पकतेचा अनोखा आविष्कार पाहायला मिळाला. मृदमूर्तीकला स्पर्धेत नव्या पिढीतील युवा कलावंतांनी मातीशी नाते जोडत आपल्या सर्जनशीलतेतून मुक्या मातीला जणू बोलके केले. रांगोळीतून रंगांची मुक्त उधळण, तर कलात्मक जुळवणीतून टाकाऊ वस्तूंना नवे रूप देत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांची प्रभावी छाप पाडली.
सायन्स कॉलेजच्या विस्तीर्ण प्रांगणात सुरू असलेल्या या युवक महोत्सवात स्मिता पाटील मंचावर रविवारी मृदमूर्तीकला, रांगोळी आणि कलात्मक जुळवणी या तीन स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांची कल्पनाशक्ती, कलात्मक दृष्टी आणि सर्जनशीलतेचे प्रभावी दर्शन घडले.
मातीच्या कणाकणातून साकारले कुटुंबाचे भावविश्व
मृदमूर्तीकला स्पर्धेत ३० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. स्पर्धकांना सव्वा किलो शाडू मातीचा गोळा, थोडी कोरडी शाडू माती, जाड पुठ्ठा आणि रद्दी कागद आदी साहित्य संयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात आले होते. या स्पर्धेसाठी ‘कुटुंब’ (Family) हा विषय देण्यात आला होता. मानव, पशू किंवा पक्ष्यांच्या कुटुंबातील दोनपेक्षा अधिक घटकांचा समावेश असलेली मृदमूर्ती साकारण्याचे आव्हान स्पर्धकांसमोर होते.
या विषयाला आपल्या कल्पकतेची जोड देत युवा कलावंतांनी मातीच्या गोळ्यातून कुटुंबातील जिव्हाळा, प्रेम, आपुलकी आणि नात्यांची वीण उलगडणाऱ्या आकर्षक कलाकृती साकारल्या. मातीला आकार देताना स्पर्धकांची एकाग्रता, हातातील कौशल्य आणि कलात्मक जाण विशेष लक्षवेधी ठरली. त्यांच्या कल्पकतेच्या परिसस्पर्शाने निर्जीव मातीला जणू भावभावनांचे जिवंत रूप प्राप्त झाले. मातीच्या प्रत्येक कणातून व्यक्त होणाऱ्या या कलाविष्काराने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात रांगोळी स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेत ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेत रंगांच्या माध्यमातून आपल्या कल्पनाविश्वाला मुक्त वाट करून दिली. विविध रंगछटा, आकर्षक रचना आणि नाजूक रंगरेषांच्या साहाय्याने स्पर्धकांनी मनोहारी रांगोळ्या साकारल्या.
कलावंतांच्या बोटांची जादू आणि रंगरेषांची जुगलबंदी यामुळे संपूर्ण परिसर रंगमय झाला होता. प्रत्येक रांगोळीतून तरुणाईच्या मनातील भावना, कल्पकता आणि सौंदर्यदृष्टीचे दर्शन घडत होते. रंगांच्या माध्यमातून व्यक्त झालेला हा कलात्मक आविष्कार म्हणजे जणू तरुणाईच्या सर्जनशीलतेचा रंगोत्सवच ठरला.
कलात्मक जुळवणी स्पर्धेलाही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत ३३ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. कल्पकता, निरीक्षणशक्ती आणि कृतीकौशल्याचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून आकर्षक कलाकृती साकारल्या.
निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या वस्तूंमध्येही सौंदर्य आणि उपयुक्तता दडलेली असते, हे स्पर्धकांनी आपल्या कलाविष्कारातून दाखवून दिले. टाकाऊ साहित्याची कलात्मक मांडणी करत त्यांनी साध्या वस्तूंनाही नवा अर्थ आणि आकार दिला. त्यांच्या या कल्पकतेमुळे ‘वेस्ट टू बेस्ट’ ही संकल्पना प्रत्यक्षात साकार झाल्याचे पाहायला मिळाले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांबरोबरच पुनर्वापर आणि पर्यावरणपूरक विचारांनाही चालना मिळाली.

या तिन्ही स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. माधव हळदीकर, डॉ. सिद्धार्थ नागठाणकर, डॉ. पंढरीनाथ धोंडगे, डॉ. राजश्री जाधव, डॉ. प्रकाश शिंदे, डॉ. विजया साखरे, प्रा. सुनील कदम, डॉ. विजयकिरण नरवाडे, प्रा. प्रवीण मुळे, उत्तम पावडे, श्रीकृष्ण हंबर्डे, डॉ. शैलजा वडजे, डॉ. स्मिता चालीकवार, प्रा. अनुजा पाटील आदींनी विशेष परिश्रम घेतले.
‘ज्ञानतीर्थ-२०२६’ युवक महोत्सवातील या कलास्पर्धांनी तरुणाईच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. माती, रंग आणि टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींमुळे महोत्सवात सर्जनशीलतेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.

Share

Related posts

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड.ज्ञानेश्वर रामलिंग धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाच्या भाषा संकुलात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस साजरा;

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवा गौरव समारंभ

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील साळवे यांना संगणक शास्त्रात पीएच.डी.

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स:आरोग्य सल्लागार- मीरा धूळगुंडे

Chief Editor

प्रा. ज्योत्स्ना गायकवाड वाघमारे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड राज्यशास्त्र विषयात पीएचडी पदवी प्रदान

Chief Editor

Leave a Comment