नांदेड : निर्मल प्रकाशन आणि बालाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बिजूर, ता. बिलोली, जि. नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने भारत दाढेल लिखित ‘नावाडी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, २५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता हॉटेल सूर्या प्राईड, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. केशव सखाराम देशमुख यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अविनाश घाटे राहणार आहेत.

‘नावाडी’ हे पुस्तक पांडुरंग वाघमारे यांच्या जीवनप्रवासावर आधारित असून, त्यांच्या संघर्षमय आयुष्याचा आणि अनुभवविश्वाचा वेध घेणारे आत्मकथनात्मक लेखन आहे. माणसाच्या जगण्यातील संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करताना त्याने केलेली वाटचाल, जीवनात आलेले चढ-उतार आणि अनुभवांतून घडत गेलेले व्यक्तिमत्त्व यांचे चित्रण आत्मकथनाच्या माध्यमातून साहित्यात उमटत असते. अशा साहित्यकृतींमधून केवळ एका व्यक्तीचा जीवनप्रवास उलगडत नाही, तर त्या व्यक्तीच्या जगण्याशी संबंधित सामाजिक परिस्थिती, मानवी नातेसंबंध आणि समाजवास्तवाचेही दर्शन घडते. या दृष्टीने ‘नावाडी’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला साहित्यप्रेमींच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे.
या प्रकाशन सोहळ्यास उदगीर येथील प्रा. डॉ. मारुती कसाब, अँड. सुरेंद्र घोडजकर, अँड. एन. एम. रानवळकर, बालाजी नागेश्वर आणि केशव शेकापूरकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
लेखक भारत दाढेल हे पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असून, सामाजिक वास्तवाचे भान ठेवून लेखन करणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे. पांडुरंग वाघमारे यांच्या जीवनप्रवासाचे शब्दांकन करताना त्यांनी अनुभवविश्वाला साहित्यिक अभिव्यक्ती देण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तीच्या आयुष्यातील संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी जगण्याची उमेद यांचे दर्शन या पुस्तकातून होते.
या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, लेखक, कवी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. डॉ. भगवान सूर्यवंशी आणि निर्मल प्रकाशनचे निर्मल कुमार सूर्यवंशी यांनी केले आहे.
प्रकाशन सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पोलीस उपनिरीक्षक मुरली गायकवाड, डॉ. अजय सूर्यवंशी, प्रा. शरद वाघमारे, सचिन मोहिते, प्रशांत कराळे, सोनू दरेगावकर, श्रीरत्न, रामेश्वर, आनंद वाघमारे, बालाजी वाघमारे, वंदना कलवले, संतोष वाघमारे आदी परिश्रम घेत आहेत.
