https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704 https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704
साहित्यिक

ग्रंथदिडींने चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे उद्धाटन

चंद्रपूर,प्रतिनिधी :-

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय चंद्रपूर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पुजन करून सदर ग्रंथदिंडी शहरातील आजाद बगीच्या-प्रियदर्शिनी इंदिरा गांधी चौक-डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयापर्यंत काढण्यात आली.

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी येथे ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला आमदार किशोर जोरगेवार, आमदार सुधाकर अडबाले, पद्मश्री डॉ. परशुराम खुणे, गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय, मुंबईचे माजी अध्यक्ष अनिल बोरगमवार, इरफान शेख, जिल्हा ग्रंथालय अधिकारी भीमराव जीवने तसेच साहित्य क्षेत्रातील व ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात बोलतांना गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित म्हणाले, अनेक वाचकवर्ग या जिल्ह्यात आहे. त्यामुळे आजच्या डिजीटल युगातही वाचनाचे महत्त्व कमी होऊ शकले नाही. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून साहित्य व वाचन संस्कृतीला चालना मिळेल. वर्षातून 12 ते 13 कार्यक्रम जिल्ह्याच्या ठिकाणी व्हावेत. चंद्रपूरमध्ये पुस्तक मेला आयोजित करावा जेणेकरून, वाचकांना कमी किमतीत पुस्तके उपलब्ध होतील व चांगली वस्तु, पुस्तके कमी किमतीत वाचकांपर्यंत पोहोचतील. तसेच साहित्याचा वारसा जपावा, असेही ते म्हणाले.

आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून ग्रंथचळवळ व वाचक वाढविण्यासाठी पाठबळ देण्याची आवश्यकता आहे. चंद्रपूरमध्ये 11 ठिकाणी अभ्यासिका निर्माण करण्याचे कार्य सुरू असून सात ठिकाणी अभ्यासिकेचे बांधकाम सुरू आहे. दीक्षाभूमी परीसरात एक लाख पुस्तक असलेली अभ्यासिका, वाचनालय उभे करण्याचा संकल्प आहे. यासाठी 1 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिला आहे व उर्वरित निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही ते म्हणाले.

आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी. विद्यार्थी व पालकांत वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथमहोत्सव कसा वाढविता येईल? शाळा तेथे ग्रंथालय कसे निर्माण करता येईल? याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. वाचनालयात अफाट विश्व आहे. सुसंस्कृत समाजाला व नव्या पिढीला वाचनालयाच्या माध्यमातून चांगले संस्कार देता येईल, असे पद्मश्री डॉ. परशुराम खुणे म्हणाले.

तत्पूर्वी, चंद्रपूर जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील निवडणूक साहित्यिकांचा व ग्रंथालय क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिल बोरगमवार, चंद्रकांत पानसे, सुभाष शेषकर, श्री. वानखेडे, विश्वास जनबंधू व नागोराव थुटे यांच्यासह गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. कीर्तीवर्धन दीक्षित यांचा शॉल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुस्तक देऊन सत्कार देखील करण्यात आला.

प्रारंभी, कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व डॉ. एस. आर. रंगनाथम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन मुक्ता बोझावार तर आभार इरफान शेख यांनी मानले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.
https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6348186984462704