नांदेड : (दि ८ ऑगस्ट २०२६))
प्राणीशास्त्र हा केवळ अभ्यासाचा विषय नसून सजीवसृष्टी, जैवविविधता आणि पर्यावरण समजून घेण्यासाठी संशोधनाचा भक्कम पाया आहे. पर्यावरणीय बदल, जैवविविधतेचे संवर्धन आणि परिसंस्थेच्या संरक्षणासाठी या क्षेत्रातील संशोधनाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन प्रख्यात प्राणीशास्त्रज्ञ डॉ. रणजितसिंग निंबाळकर यांनी केले.
यशवंत महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागात नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी आयोजित इंडक्शन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते.
छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय न्यायवैद्यक विज्ञान संस्थेतील न्यायवैद्यक जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, आधुनिक प्रयोगशाळा, क्षेत्रभेटी आणि निसर्ग अभ्यासाच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन, निरीक्षण क्षमता व संशोधनवृत्ती विकसित करण्याचे आवाहन केले. शिक्षणादरम्यान जिज्ञासा, शिस्त, सातत्य आणि कौशल्यविकासावर भर दिल्यास राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी प्रास्ताविकात प्राणिशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय नंनवरे यांनी, नव्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची रचना, संशोधनाच्या संधी, प्रयोगशाळेतील कार्यपद्धती, परीक्षा प्रणाली आणि विभागातील विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली.राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विद्यार्थी-केंद्रित आणि रोजगाराभिमुख शिक्षणावर भर देण्यात आला असून, अभ्यासक्रमात व्हॅल्यू ॲडेड, स्किल एन्हान्समेंट, व्होकेशनल स्किल, जेनरिक इलेक्टिव्ह आणि को-क्युरिक्युलर अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आल्याची माहिती डॉ. नंनवरे यांनी दिली. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान, कौशल्ये आणि रोजगारक्षमता वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी ज्ञान, संस्कार, गुणवत्ता आणि संशोधन यांचा समन्वय साधत समाजोपयोगी शिक्षण घेण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. प्राणीशास्त्रातील संशोधनामुळे पर्यावरण, जैवविविधता संवर्धन आणि आरोग्यविषयक आव्हानांवर उपाय शोधण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी ई-बुक्स, संशोधन नियतकालिके आणि डिजिटल शैक्षणिक साधनांचा प्रभावी वापर करून स्व-अध्ययन, चिकित्सक विचारसरणी आणि संशोधनवृत्ती विकसित करावी, असेही त्यांनी नमूद केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रमांच्या माध्यमातून सक्षम व जबाबदार नागरिक घडविण्यासाठी महाविद्यालय कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी पालक श्री. सुरेश निवृत्तीराव देशमुख, शेख महेविश यांनी मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांनी संशोधनाभिमुख व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा ध्यास घ्यावा, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन व प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. धनराज भुरे यांनी करून दिला. आभार डॉ. मंगल कदम यांनी मानले.
कार्यक्रमास डॉ. शैलेंद्र शेलार, डॉ. हनुमंतलू तमलूरकर, डॉ. नीताराणी जैस्वाल, डॉ. बी. बालाजीराव, प्रा. नारायण गव्हाणे, प्रा. साहेबराव माने, डॉ. दीप्ती तोटावार, डॉ. रोहिणी चव्हाण, यांच्यासह प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार, गजानन पाटील,जगन्नाथ महामुने, राजू भोसले, शंकर मिरेवाड, परमेश्वर राठोड आणि जगदीश उमरीकर यांनी सहकार्य केले.
