नांदेड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ऐतिहासिक महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी स्मृती वर्षानिमित्त समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने जिल्हास्तरीय शालेय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘महाड सत्याग्रह : सामाजिक क्रांतीची नांदी’ या विषयावर आयोजित वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यातील समाजकल्याण विभागाच्या अनुदानित वसतिगृहांतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समाज कल्याण अधिकारी रेखा शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि प्रभावी वक्तृत्वातून सामाजिक समता, मानवी प्रतिष्ठा, स्वाभिमान आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना उजाळा दिला.
शनिवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सहाय्यक आयुक्त कार्यालय, नांदेड येथे ही स्पर्धा पार पडली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यालयीन अधीक्षक एस. एम. पंडित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक बालाजी मानकरी, लेखाधिकारी एस. आर. केंद्रे, सहाय्यक कक्ष अधिकारी व्ही. के. कुरलू, आदित्य देवडे, आर. जी. सोनटक्के आणि एम. एस. दवणे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक लेखाधिकारी एस. आर. केंद्रे यांनी केले. त्यांनी महाड सत्याग्रहाची ऐतिहासिक पार्श्वभूमी विशद करताना हा लढा केवळ सार्वजनिक पाणवठ्यावर पाणी पिण्याच्या अधिकारापुरता मर्यादित नसून मानवी प्रतिष्ठा, समान हक्क आणि सामाजिक स्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी झालेली महत्त्वपूर्ण सामाजिक क्रांती असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून समाजाला दिलेला समता आणि स्वाभिमानाचा संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
या स्पर्धेत समाजकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतिगृहांतील इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी महाड चवदार तळे सत्याग्रहाचा इतिहास, अस्पृश्यतेविरुद्धचा संघर्ष, सार्वजनिक पाणवठ्यावर समान हक्क, सामाजिक विषमता, मानवी प्रतिष्ठा आणि संविधानिक मूल्ये अशा विविध पैलूंवर आपले विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली उभारलेल्या या ऐतिहासिक लढ्याचे महत्त्व विशद करताना विद्यार्थ्यांनी समताधिष्ठित समाजनिर्मितीचा विचार प्रभावीपणे मांडला.
स्पर्धेचे परीक्षण बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत येथील प्रा. डॉ. नागराज मगरे आणि लोहबंदे मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांच्या भाषणातील आशय, विषयाची समज, विचारांची मांडणी, वक्तृत्वशैली आणि सादरीकरण या निकषांवर परीक्षण करण्यात आले.
महाड सत्याग्रहाच्या शताब्दी स्मृती वर्षाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना इतिहासाची जाणीव करून देणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचा परिचय करून देणे तसेच संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवण करणे हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश होता. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक प्रगल्भता, सामाजिक जाणीव आणि अभिव्यक्ती कौशल्य विकसित होण्यास मदत होत असल्याचे यावेळी अधोरेखित झाले.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. डॉ. भगवान सूर्यवंशी यांनी केले, तर आर. जी. सोनटक्के यांनी आभार मानले. यावेळी यशवंत मोरे, संदीप घोडजकर यांच्यासह जिल्हाभरातील विविध वसतिगृहांचे संचालक उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जी. पी. ठोके, साहेबराव गुंडेकर, संजय स्वामी, एस. बी. ढवळे, एस. पी. डोंगरे, विनोद नुगुरवार, राहुल गजभारे, माधव यमलवाड, सुभाष जाधव आदी कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांच्या प्रभावी अभिव्यक्तीमुळे ही जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. महाड सत्याग्रहाच्या इतिहासातून समतेचा विचार आत्मसात करून तो नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
