एम सी आर
Uncategorized

ज्ञान, संस्कार आणि साधेपणाचा संगम : सौ. निर्मला आनंदराव कदम -खुळे

नांदेड:

शिक्षक हा समाजाचा शिल्पकार असतो, असे म्हटले जाते. आपल्या ज्ञानाने, संस्कारांनी आणि आचरणाने विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविणारा शिक्षक हा समाजाच्या प्रगतीचा आधारस्तंभ असतो. अशाच एका आदर्श शिक्षिकेचा प्रदीर्घ आणि प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास आज एका नव्या टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथील गणित विषयाच्या ज्येष्ठ अध्यापिका तथा उपमुख्याध्यापिका सौ. निर्मला आनंदराव कदम खुळे मॅडम या 30 जून 2026 रोजी 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत.

नांदेड जिल्ह्यातील गणपूर या छोट्याशा खेडेगावात श्री सखाराम खुळे व सौ सरस्वती सखाराम खुळे यांच्या पोटी एका वारकरी संप्रदायातील मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. सहा बहिणी आणि दोन भावांच्या मोठ्या कुटुंबातील त्या ज्येष्ठ अपत्य. लहानपणापासूनच अभ्यासाची आवड, जबाबदारीची जाणीव आणि कुटुंबाविषयीची आत्मीयता त्यांना होती. त्यांनी आपले माध्यमिक शिक्षण महात्मा फुले हायस्कूल, विजयनगर येथे पूर्ण केले. त्यानंतर अकरावी, बारावी चे शिक्षण यशवंत महाविद्यालय आणि बी.एस्सी.चे शिक्षण सायन्स महाविद्यालय, नांदेड येथे घेतले. गणित विषयातील विशेष आवड लक्षात घेऊन त्यांनी तिथेच एम. एस्सी. प्रथम वर्षात प्रवेश घेतला. विवाहानंतरही शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी बी.एड. पदवी संपादन केली.

त्यांच्या या यशामागे त्यांचे पती,आमचे मामा श्री. आनंदराव संभाजीराव कदम यांचे प्रोत्साहन आणि पाठबळ मोलाचे ठरले. पत्नीने उच्च शिक्षण घ्यावे, स्वतःच्या गुणवत्तेचा विकास करावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रेरणा दिली. या परस्पर सहकार्यामुळेच सौ. निर्मला कदम यांनी शिक्षण क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटविला.

सन 1992 मध्ये त्या राजर्षी शाहू विद्यालय, नांदेड येथे गणित विषयाच्या अध्यापिका म्हणून रुजू झाल्या. त्यानंतरची जवळपास 34 वर्षांची त्यांची सेवा ही केवळ अध्यापनाची नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाची अखंड साधना ठरली. गणितासारखा विषय अनेक विद्यार्थ्यांना कठीण वाटतो.परंतु, सौ खुळे मॅडम यांनी आपल्या सोप्या अध्यापनशैलीने आणि संयमी मार्गदर्शनाने हा विषय विद्यार्थ्यांचा आवडता बनविला. कालानुरूप बदलत असलेल्या शिक्षणातील तसेच विद्यार्थ्यांमधील बदलाप्रमाणे त्यांनी आपली शिक्षण सेवा विकसित केली. विद्यार्थ्यांप्रती असलेले प्रेम, आत्मीयता आणि समर्पण यामुळे त्या अल्पावधीतच विद्यार्थ्यांच्या अत्यंत लाडक्या शिक्षिका बनल्या . याचकाळात त्यांनी आलेल्या अनेक शैक्षणिक जबाबदाऱ्या अतिशय यशस्वीरिते पार पाडल्या.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची आध्यात्मिक जडणघडण. त्या आणि त्यांचे पती यांनी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माध्यमातून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला. अध्यात्मामुळे त्यांच्या जीवनात साधेपणा, शिस्त, संयम आणि अलिप्तता अधिक दृढ झाली. बाह्य दिखावा, अनावश्यक भोगवादी प्रवृत्ती यांपासून दूर राहून त्यांनी शांत, संतुलित आणि मूल्याधिष्ठित जीवन जगले.त्या कधीही कुणाही बद्दल कधीही वाईट बोलत नाहीत व त्यांनी कुणाबद्दल वाईट विचारही केला नसेल असे मला वाटते.अत्यंत सात्विक व संयमी वृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसते. शिक्षिका म्हणून शाळेत काम करत असताना त्यांनी कधीही आपल्या कर्तव्याकडे दुर्लक्ष केले नाही. घर, समाज आणि शाळा या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी अत्यंत यशस्वीपणे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या.

शाळेमध्ये त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना घडविले. सहकारी शिक्षक, कर्मचारी, संस्थाचालक आणि विद्यार्थी यांच्याशी त्यांनी नेहमीच सुसंवाद आणि सौहार्दाचे संबंध ठेवले. कोणताही वाद, कलह, गटबाजी किंवा भेदभाव यापासून त्या नेहमी दूर राहिल्या. प्रामाणिकपणा, निष्ठा आणि कर्तव्यपरायणता हीच त्यांची खरी ओळख राहिली.

त्यांच्या कार्याची दखल घेत मागील वर्षी त्यांना राजर्षी शाहू विद्यालयाच्या मुख्याध्यापिका पदाची संधी मिळाली होती. परंतु स्वतःच्या असलेल्या जबाबदार्‍या व तब्येतीचा विचार करून त्यांनी अत्यंत नम्रपणे हा मान नाकारला. पदापेक्षा कर्तव्य मोठे मानणाऱ्या त्यांच्या स्वभावाचे हे उत्तम उदाहरण आहे. त्या उपमुख्याध्यापिका म्हणूनच सेवानिवृत्त होत असल्या तरी विद्यार्थ्यांच्या आणि सहकाऱ्यांच्या मनातील त्यांचे स्थान मात्र सदैव सर्वोच्च राहील.

सौ निर्मला कदम खुळे मॅडम यांचे कौटुंबिक जीवनही आदर्श राहिले आहे. सध्याच्या काळात लोप पावत चाललेल्या एकत्र कुटुंब पद्धती मध्ये म्हणजेच एका मोठ्या एकत्र कुटुंबात त्यांनी सर्व नणंद, दीर, भावजय आणि नातेवाईक यांच्याशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध जपले. त्यांच्या घरी राहून अनेक नातेवाईकांनी शिक्षण घेतले, मोठे झाले. आपापल्या संसारात यशस्वी झाले. त्या प्रत्येकाला त्यांनी प्रेम, माया आणि आपुलकी दिली. कधीही कुणालाही त्यांनी एका अपशब्दाने दुखावले असेल असे मला वाटत नाही. त्यांच्या घरी आलेला कोणताही पाहुणा किंवा मित्र नाष्टा किंवा जेवण केल्याशिवाय परत गेला नाही, ही त्यांची खास ओळख आहे.

त्यांचे घर म्हणजे खऱ्या अर्थाने एक ‘गोकुळ’ आहे. दरवर्षी दिवाळीतील भाऊबीज, कौटुंबिक मेळावे, स्नेहभोजन आणि विविध कौटुंबिक कार्यक्रम यांच्या माध्यमातून त्यांनी नात्यांमध्ये जिव्हाळा,आत्मीयता टिकवून ठेवली आहे. यासाठी आमचे मामा श्री आनंदरावजी कदम व मामी सौ निर्मला आनंदराव कदम यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. आजच्या धावपळीच्या युगातही त्यांनी कुटुंबसंस्थेचे मूल्य जपले आहे याचा सर्वांना सार्थ अभिमान वाटतो.

हे कार्य करतानाच त्यांनी आपली दोन्ही मुले घडवली. त्यांचा मोठा मुलगा डॉ. अनिकेत आनंदराव कदम व स्नुषा यांनी आयुर्वेद शाखेत एम.डी. पदवी प्राप्त केली असून ते वैद्यकीय सेवेद्वारे समाजसेवा करीत आहेत. शांत, संयमी आणि सेवाभावी स्वभाव त्यांनी आपल्या आई वडिलांकडूनच घेतला आहे.तर मुलगी सौ अंकिता विशाल बंडाळे हि रसायनशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून त्या शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचे जावई श्री. विशाल बंडाळे हे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्यरत आहेत. अशा प्रकारे सौ. निर्मला आनंदराव कदम खुळे यांनी आपल्या मुलांनाही उत्तम संस्कार आणि मूल्यांची शिदोरी दिली.

सौ. निर्मला कदम खुळे यांचे संपूर्ण आयुष्य हे कर्तव्यनिष्ठा, साधेपणा, अध्यात्म, प्रेम आणि सेवाभाव यांचे सुंदर मिश्रण आहे. त्यांनी आपल्या कार्यातून असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन उजळविले, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवले आणि समाजासमोर आदर्श जीवनाचा वस्तुपाठ ठेवला.

आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांच्या आयुष्याचा पुढील प्रवास उत्तम निरोगी आरोग्य, आनंद, समाधान आणि आध्यात्मिक उन्नतीने परिपूर्ण होत जावो हीच त्या जगत विधात्या पांडुरंग चरणी प्रार्थना प्रार्थना.🙏🙏

प्रा डॉ विजय नागोराव भोसले, रसायनशास्त्र विभाग,
यशवंत महाविद्यालय, नांदेड.
मो क्र 9403067252

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

विद्यापीठ आणि महाविद्यालयांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करूया* – कुलगुरू डॉ. मनोहर चासकर

Chief Editor

यशवंत ‘मधील एनसीसी कॅडेट्सचे खडतर प्रशिक्षण यशस्वी

Chief Editor

बोधिसत्त्व नगर वाडी बुद्रुक येथे माता रमाईच्या जयंतीच्या निमित्ताने अजय वसंतराव गव्हाणे यांच्या व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

नांदेड SBI सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकरचा राजस्थानमध्ये गूढ मृत्यू

Chief Editor

सहस्रकुंड धबधबा विकासासाठी ४३ कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांच्या उपसचिवांची पाहणी

Chief Editor

Leave a Comment