ज्येष्ठ पत्रकार-लेखक शफी पठाण यांनी आय.ए.एस. अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर लिहिलेले आणि न्यू ईरा पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले ‘तुकाराम’ हे पुस्तक 17 जुलै 2026 रोजी प्रकाशित झाले असून 216 पानी पुस्तकाने नव्या पिढीसाठी एक दिशादर्शक दीप पेटवला आहे.आजचा तरुण दिशाहीन आणि अस्वस्थ झाला आहे. संधींची उणीव नाही, पण ध्येयाची स्पष्टता आणि सातत्याने प्रयत्न करण्याची तयारी मात्र दुर्मीळ होत चालली आहे. मोबाईल आणि नवमाध्यमांच्या अतिवापरामुळे तरुणांचे मन अस्वस्थ व विचलित झाले आहे समाजमाध्यमांच्या रेट्यात असंख्य तरुण दिशाहीन वाहत आहेत. अशा वेळी एखाद्या व्यक्तीचा संघर्ष, त्याची जिद्द आणि ध्येयासाठीची अथक तपस्या तरुणांसमोर आदर्श म्हणून उभी राहते. तुकाराम मुंढे हे नाव महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती, गाव, शहर, नगरात परिचित झाले आहे ते त्यांच्या धाडसी निर्णय क्षमता , स्पष्टवक्तेपणा, निडरपणा, शिस्त, पारदर्शकता आणि लोकहिताला प्राधान्य देणाऱ्या कार्यशैलीमुळे. त्यांच्या जीवनप्रवासाचा वस्तुनिष्ठ मागोवा घेत लेखकाने बालपणापासून आय.ए.एस. होईपर्यंतचा प्रवास, त्यातील संघर्ष आणि सत्यनिष्ठेमुळे सोसाव्या लागलेल्या वारंवार बदल्यांचे अत्यंत समर्पक विश्लेषण केले आहे. हे पुस्तक केवळ चरित्र राहत नाही, तर संघर्षातून उभे राहण्याचा आणि ध्येय गाठण्याचा जीवनमंत्र देणारे असे हे पुस्तक आहे .
बीड जिल्ह्यातील ताडसोना या छोट्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या तुकाराम मुंढे यांचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेपासून सुरू झाले.निसर्गाचा लहरीपणा, शेतीतील तुटपुंजे उत्पन्न आणि मोठे कुटुंब यामुळे त्यांच्या कुटुंबात आर्थिक ओढाताण सतत होती.दोन मोठ्या अपघातातून बाहेर पडुन त्यांचा जणु पुनर्जन्मच झाला होता. प्रतिकूलतेशी झुंजण्याच बळ तुकाराम मुंढे यांना जन्मजातच मिळाले होते. मोठे बंधू अशोक मुंढे यांची शिक्षणाची आस आणि लहान भाऊ तुकाराम यास कलेक्टर बनवण्याचे स्वप्न यातूनच घडलेला प्रेरणादायी प्रवास या पुस्तकात मांडले आहे . डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून पदवी आणि राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेताना त्यांनी सोसलेल्या प्रतिकूल परिस्थितीचे वर्णन वाचताना मन गलबलून येते. घरची अत्यंत प्रतिकूल आर्थिक स्थिती, शेतीवरचे अवलंबून असलेले कुटुंब,चिमणीच्या प्रकाशातला अभ्यास आणि मूलभूत सुविधांचा अभाव या सगळ्यांनी त्यांचे आयुष्य संघर्षमय बनवले. पण त्यांनी कधीही परिस्थितीला दोष दिला नाही. ‘हे मिळाले नाही’, ‘आपली परिस्थिती अशी होती’ असे बहाणे त्यांच्या शब्दकोशातच नव्हते. उलट, परिस्थितीला आव्हान देत मार्ग काढणे हाच त्यांचा स्वभाव बनला.त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत त्यांच्या आई वडिलांचे संस्कार व मोठे भाऊ अशोक मुंढे यांचे योगदान खूप महत्वाचे आहे .वडील हरिभाऊ मुंढे यांची कठोर कर्तव्यनिष्ठा आणि चुकीला माफी नाही हा जीवन दृष्टिकोन आणि वारकरी संप्रदायातील आई आसराबाई यांचा प्रेमळ, धार्मिक स्वभाव या दोन्हींचा ठसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर उमटला. मोठे बंधू अशोक मुंढे यांनी तर स्वतःच्या सुखाचा त्याग करत औरंगाबादमध्ये शिकवण्या घेत दोघांचेही शिक्षण सुरू ठेवले . हा या पुस्तकातील सर्वाधिक भावस्पर्शी भाग आहे. शेतीचा संबंध पोटाशी असतो, तर शिक्षणाचा संबंध मेंदूशी असतो ही त्यांच्या जीवनप्रवासातून स्पष्ट होणारी बाब आहे. शेतीने त्यांना श्रमाची किंमत शिकवली आणि शिक्षणाने विचार करण्याची शक्ती दिली. दहावीपर्यंत पायात चप्पल नाही, रात्री चिमणीच्या उजेडात अभ्यास, औरंगाबादमध्ये शेव-केळी खाऊन दिवस काढणे, अशा प्रसंगांतून त्यांच्या संघर्षाची तीव्रता जाणवते. पण या परिस्थितीने ते खचले नाहीत. उलट संघर्षानेच त्यांची जिद्द अधिक मजबूत केली. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, नेल्सन मंडेला, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना त्यांनी आदर्श मानतात .मोठे ध्येय गाठायचे असेल तर त्यासाठी मोठा संघर्ष करायची तयारी ठेवावी लागते हा डॉ कलाम यांच्या विचारातून मिळालेली प्रेरणा त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसते . आईने दिलेली शिकवण ‘कोणतेही संकट कायमचे नसते’ हाच त्यांच्या जगण्याचा आधार बनला.
आजचे अनेक विद्यार्थी वेळेच्या अभावाची तक्रार करतात, पण मुंढे यांचा प्रवास वेळेचे नियोजन आणि अभ्यासातील सातत्य शिकवतो. श्रवण, वाचन, लेखन, स्मरण आणि नियोजित उजळणी ही त्यांची अभ्यासपद्धत होती. स्पर्धा परीक्षार्थींसाठी त्यांचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहे . आधी प्रश्नपत्रिका समजून घ्या, अभ्यासक्रमाची दिशा निश्चित करा, मगच तयारी सुरू करावासा त्यांचा दृष्टिकोन आहे .हे सर्व करतानाच राज्यशास्रातील नेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे मिळालेली वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकाची नोकरी करतानाही त्यांनी मोठे स्वप्न सोडले नाही.प्राध्यापक म्हणून आलेले अनुभव आणि विविध शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला बौद्धिक अधिष्ठान मिळाले. यूपीएससी उत्तीर्ण होणे हे हजारो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते, पण त्यासाठी लागणारी चिकाटी फार थोड्यांकडे असते. तब्बल तीन वेळा ते या परीक्षेत अयशस्वी झाले .शेवटी एम पी एस सी परीक्षा दिली व त्यात उत्तीर्ण झाले .भाऊ अशोक मुंढे यांचे तुकारामाने कलेक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण न करता एम पी एस सी परीक्षा दिल्यामुळे केलेला कायमचा अबोला आणि हे सर्व सहन करत, 2004 साली शेवटच्या प्रयत्नात यूपीएससीत देशात 20 वा क्रमांक मिळवत त्यांनी 2005 मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. लेखकाने हा प्रत्येक प्रसंग जिवंतपणे डोळ्यासमोर उभा केला आहे. यु पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होणे हा क्षण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वोच्च विजय असला, तरी तो केवळ एका व्यक्तीचा विजय नव्हता. तो ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या, अत्यंत सामान्य परिस्थितीतून शिकलेल्या तरुणाच्या जिद्दीचा विजय होता.आई-वडिलांच्या संस्कारांचा व सर्वात महत्वाचे मोठा भाऊ अशोक मुंढे यांच्या धडपडीचा, भाऊ कलेक्टर व्हावा हे पाहिलेल्या स्वप्नाचा व त्यासाठी केलेल्या अपार कष्टाचा होता .यामुळे ‘तुकाराम’ हे पुस्तक तरुणांसाठी विशेष महत्त्वाचे वाटते .
तुकाराम मुंढे यांच्या कार्यशैलीचा केंद्रबिंदू लोकसेवा आहे. ‘IAS’ या शब्दाकडे ते ‘I Am for Society’ या दृष्टीने पाहतात .ही भूमिका त्यांच्या प्रशासकीय दृष्टिकोनाचा सार सांगणारी आहे. अधिकारी म्हणजे अधिकार गाजवणारी व्यक्ती नव्हे, तर समाजाच्या समस्या समजून त्यावर उपाय करणारा सेवक, ही त्यांची धारणा. सोलापुरातील धाडसी निर्णय, बार्शीतील अतिक्रमणविरोधी कारवाई, प्रशासनातील अनियमिततेविरुद्धची ठाम भूमिका या साऱ्यातून तडजोड न करण्याची त्यांची शैली सतत चर्चेत राहिली. आजही ते अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदावर कार्यरत असून अन्नसुरक्षा आणि नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये कारवाई करत असल्याचे आपण समाजमाध्यमातून रोजच पाहत व एकत आहोत . सर्व जनता कित्येक वर्षांपासून अन्नाच्या माध्यमातून जे विष खात व पित आहे ,त्यावर जबरदस्त चपराक बसली आहे . अनेकांचे धाबे दनालले आहेत. लोक खुश झाले आहेत . कुणालाही न घाबरता व भ्रष्टाचार न करता केलेले कार्य समाजासाठी अतिशय आनंद व नवी उमेद देणारे आहे . हे सर्व करत असताना त्यांच्या राजकीय लोकांच्या हस्तक्षेपामुळे वारंवार होणाऱ्या बदल्या हा एक स्वतंत्र विषय ठरावा इतका महत्त्वाचा आहे. तुकाराम मुंढे यांच्या प्रशासकीय जीवनातील बदल्या त्यांच्या पारदर्शक आणि कठोर कार्यपद्धतीमुळे वारंवार झालेल्या असूनही त्यांनी आपले पुण्य कर्म सोडले नाही हे विशेष अभिनंदनीय आहे . त्यांच्या 20 वर्षांच्या सेवेत तब्बल 25 वेळा त्यांची बदली झाली आहे.परंतु या प्रकारच्या बादलीने ते डगमगले नाहीत . एका ठिकाणचा शेवट म्हणजे दुसऱ्या ठिकाणी नव्या अध्यायाची सुरुवात, हाच त्यांचा दृष्टिकोन राहिला. पद बदलले तरी निष्ठा बदलू नये, परिस्थिती बदलली तरी मूल्ये बदलू नयेत हाच संदेश त्यांची कारकीर्द देते. जॉईन होण्याआधीच त्यांची तीन वेळा बदली झाली होती. देशाच्या ईतिहासातील बहुदा हि एकमेव घटना असावी. लेखक शफी पठाण यांनी हा प्रवास अत्यंत ओघवत्या, ओजस्वी आणि सर्वसामान्यांना भिडणाऱ्या भाषेत मांडला आहे. मुंढे यांचे व्यक्तिमत्त्व पाहताना ‘कर्मयोगी’ हा शब्दच सहज आठवतो . त्यांच्यासाठी काम म्हणजे नोकरी नव्हे, कर्तव्य आहे.परिणामाची चिंता न करता योग्य ते काम करत राहणे, हा त्यांच्या विचारांचा गाभा आहे.त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग एक गोष्ट सांगतात कि, परिस्थिती तुमच्या हातात नसते, पण परिस्थितीला दिलेला प्रतिसाद तुमच्या हातात असतो.
शफी पठाण यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी मुंढे यांना केवळ ‘धडाडीचे अधिकारी’ म्हणून न रंगवता, बालपण, कौटुंबिक संस्कार, यूपीएससीची तयारी आणि प्रशासकीय संघर्ष यांतील परस्परसंबंध समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. पत्रकारितेच्या अनुभवामुळे त्यांची चिकित्सक दृष्टी पुस्तकाला निव्वळ गौरवगाथेपासून दूर ठेवते.पुस्तकाचे आणखी एक बलस्थान म्हणजे ते वाचकाला ‘मुंढे किती कर्तृत्ववान आहेत’ एवढेच सांगत नाही, तर ‘आपण आपल्या आयुष्यात काय करू शकतो’ हा प्रश्न समोर उभा करते. आजच्या तरुणांसमोर माहितीचा महासागर आहे, पण दिशेचा अभाव आहे. अशा वेळी ‘तुकाराम’ हे पुस्तक थांबून स्वतःकडे पाहायला भाग पाडते. गरिबी ही अपयशाची अपरिहार्यता नाही, परिस्थिती हा प्रगतीतील कायमचा अडथळा नाही आणि अपयश हे अंतिम सत्य नाही हाच संदेश मुंढे यांचे जीवन देते. स्वाभिमान जपून, प्रामाणिकपणे आणि शिस्तीने काम केले, तर सामान्य परिस्थितीतून जन्मलेला माणूसही असामान्य उंची गाठू शकतो.म्हणूनच ‘तुकाराम’ हे केवळ चरित्र नाही ते संघर्षाचे तत्त्वज्ञान, ध्येयाचा मार्ग आणि कर्तव्याची प्रेरणा देणारे पुस्तक आहे. यूपीएससी-एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते निश्चितच प्रेरणादायी आहे, पण त्याचे महत्त्व त्याहून व्यापक आहे. जीवनात काही मोठे करण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक तरुणाने हे पुस्तक वाचावे, आत्मसात करावे आणि त्यातील विचार आपल्या जगण्याशी जोडून पाहावेत.
लेखक शफी पठाण यांनी अतिशय आत्मीयतेने लिहिलेले तुकाराम मुंढे यांच्या जीवनावरील हे पुस्तक हे वाचनीय तर आहेच, पण त्याहून अधिक चिंतनीय आणि अनुकरणीय आहे.
शफी पठाण यांचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा .
प्रा डॉ विजय नागोराव भोसले,
रसायनशास्त्र विभाग, येशवंत महाविद्यालय , नांदेड .मो .नंबर 9403067252.
