विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वात वाडी बुद्रुक च्या नागरिकांची. जिल्हाकार्यालयावर धडक
सोमवारी पाणीपुरवठा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन
नांदेड : शहरालगत असलेल्या पावडेवाडी येथे गेल्या 26 दिवसापासून पाणीपुरवठा नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना पाणी मिळावे यासाठी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वात आज दिनांक 18 मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मारण्यात आली. यावेळी तातडीने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली. वाडी बुद्रुक येथे सोमवारी पाणीपुरवठा करण्यात येईल असा विश्वास जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पावडेवाडी येथे गेल्या 26 दिवसापासून पाणीपुरवठा बंद आहे . विष्णुपुरी धरणातून येणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आल्यामुळे वाडीकरांवर पाणीटंचाईचे संकट वाढवले आहे . नांदेड महानगरालगत असलेल्या पावडेवाडी ग्रामपंचायतमध्ये वस्त्यांचा विस्तार वाढत आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाणीपुरवठा नियमितपणे करणे प्रशासनाला कठीण जात आहे. शिवाय वाडी बुद्रुक ला होणारा पाणीपुरवठा महानगरपालिकेने अचानकच खंडित केला आहे . त्यामुळे तब्बल 26 दिवसपासून पावडेवाडीत पाणी उपलब्ध झाले नाही. या भागातील नागरिक नियमितपणे पाणीपट्टी भरत असतात परंतु ग्रामपंचायत पाणीपुरवठा करण्यात असक्षम ठरली आहे. 27 एप्रिल नंतर आजपर्यंत या भागात पाण्याचा एकही थेंब नळाला आला नसल्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाणी विकत घेण्याची आर्थिक परिस्थिती सर्वसामान्य नागरिकांमध्ये नसल्यामुळे पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे . त्यामुळे वाडी बुद्रुक येथील पाणीपुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. वाडी बुद्रुक ग्रामपंचायतकडे थकीत असलेली पानपट्टी कशी वसूल करायची हे महानगरपालिकेशी आपण चर्चा करून त्याविषयी तोडगा काढू .तूर्तास कोणत्याही परिस्थितीत सोमवारी वाडी मध्ये पाणीपुरवठा होईल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला दिला आहे.
यावेळी डॉक्टर विठ्ठल पावडे यांच्यासह एस.एम. भांगे , सागर मेदकर, प्राचार्य राम जाधव , डॉ. दिलीप शिंदे , उषा जाधव, डॉ. भारती मढवई, अशिविनी मैराळ, शिवशंकर गव्हाणे, मधुकर धर्मापुरीकर, शुभम हडसंकर, गणेश तिवाडी, एल. जी. तेलंग, भांगे एस. एन., रणजित चव्हाण, माधव भालेराव, संजय पावडे, संतोष मुळे, मधूकर धर्मापुरीकर, मुकेश पटणे, पिंटू पाटील आलेगावकर, गणेश कोकाटे, गणेश भोसले, आनंद वंजारे, राजकुमार पावडे, यशवंत बनवसकर, साईनाथ पावडे, प्रदीप पवार, गणेश तिडके, आदीसह शेकडो नागरिक उपस्थित होते.
चौकट
… तर तीव्र आंदोलन छडू : विठ्ठल पावडे
नांदेड शहरा लगत असलेल्या सर्वात मोठ्या नागरी वस्तीत म्हणजेच पावडेवाडी येथे गेल्या 26 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे . निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईला जबाबदार असणाऱ्या प्रशासनाला २६ दिवसानंतरही जाग येऊ नये याहून मोठे दुर्दैव नाही. शिवाय सत्ताधारी लोकप्रतिनिधी याकडे लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली असल्याने आज जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सोमवारी पाणीपुरवठा करण्याचा शब्द दिला आहे.त्यामुळे सोमवारी पाणी येईल अशी आम्हाला आशा. परंतु सोमवार नंतर पाणी आले नाही तर शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल आणि त्याहून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विठ्ठल पावडे यांनी दिला आहे.