नांदेड: प्रतिनिधी
नांदेड शहरातील अतिक्रमणांविरोधात सातत्यपूर्ण आणि प्रभावी कारवाई करत कर्तव्य बजावणारे अतिक्रमण विभागाचे पथक प्रमुख श्री.दत्ता कल्याणकर यांना ऑगस्ट 2026 चा Employee Of The Month पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला असून,त्यांच्या कार्याचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.अतिक्रमण विभागात पथक प्रमुख म्हणून पदस्थापना झाल्यापासून दत्ता कल्याणकर यांनी शहरातील सार्वजनिक रस्ते, चौक,फुटपाथ तसेच नागरिकांच्या वापरातील सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात सातत्याने कारवाई केली. अतिक्रमणामुळे निर्माण होणाऱ्या वाहतुकीच्या समस्या तसेच नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी त्यांनी विभागाच्या पथकासोबत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईवर भर दिला.
कर्तव्य बजावताना शिस्त, तत्परता, नियमांचे पालन आणि प्रामाणिकपणा या बाबींना त्यांनी प्राधान्य दिले.शहरातील सार्वजनिक जागा नागरिकांसाठी मोकळ्या राहाव्यात,वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ नयेत आणि शहरातील सार्वजनिक व्यवस्थेला शिस्त लागावी,यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली.अतिक्रमण हटविण्याची कारवाई ही केवळ अतिक्रमण निर्मूलनापुरती मर्यादित न राहता शहरातील वाहतूक व्यवस्था, स्वच्छता आणि सार्वजनिक जागांच्या वापराशी संबंधित असल्याने या कामात पथक प्रमुख म्हणून कल्याणकर यांनी बजावलेली भूमिका महत्त्वपूर्ण ठरली आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अतिक्रमण विभागाच्या कामकाजाला गती मिळाल्याचे सांगण्यात येते.
Employee Of The Month – August 2026 हा पुरस्कार मिळाल्याने दत्ता कल्याणकर यांच्या कर्तव्यनिष्ठ सेवेचा गौरव झाला आहे. पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर त्यांच्यावर विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील काळातही शहरहिताच्या दृष्टीने अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.दत्ता कल्याणकर यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.
