नवी दिल्ली : बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर भारतासमोर आरोग्यविषयक आव्हाने वाढण्याची शक्यता आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आपल्या ‘Global Public Health Situation Analysis – El Niño 2026’ अहवालातून भारतासह दक्षिण आशियातील काही भागांसाठी आरोग्यविषयक जोखमीबाबत इशारा दिला आहे.
‘अल निनो’च्या प्रभावामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान काही भागांत सामान्यापेक्षा कमी पाऊस आणि अधिक उष्णता राहण्याची शक्यता आहे. बदलत्या तापमान आणि पावसाच्या परिस्थितीचा परिणाम डेंग्यू, मलेरिया यांसारख्या डासांमार्फत पसरणाऱ्या आजारांवर होऊ शकतो. देशातील काही भागांत डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचेही अहवालांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
उष्णतेचा वाढता परिणाम झाल्यास हीट एक्झॉशन, उष्माघात, हृदयविकार, श्वसनाचे आजार आणि मूत्रपिंडाशी संबंधित समस्या वाढण्याचा धोका असल्याचे WHOने नमूद केले आहे. पावसातील बदल, पाण्याची उपलब्धता आणि पूरस्थिती यामुळे संसर्गजन्य आजारांसह अन्न व पोषण सुरक्षेवरही परिणाम होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर नागरिकांनी घराच्या आणि परिसराच्या आसपास पाणी साचू न देणे, डासांची उत्पत्ती रोखणे, उन्हाच्या काळात पुरेसे पाणी पिणे आणि ताप, अंगदुखी, डोकेदुखी यांसारखी लक्षणे आढळल्यास वेळेत वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, भारतातील आरोग्य यंत्रणेलाही अल निनोच्या संभाव्य परिणामांसाठी सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या (NCDC) संकेतस्थळावर अल निनो 2026 संदर्भातील आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचना उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
