नांदेड: जिल्हा प्रतिनिधी नरसिंग पेठकर
दिनांक 7 सप्टेंबर 2026
कंधार तालुक्यातील बहा दरपुरा येथील नदीवरील नवीन पुलाचे काम अद्याप अपूर्ण असतानाच, सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. प्रशासनाच्या या अचानक आणि नियोजनशून्य निर्णयामुळे स्थानिक शेतकरी तसेच ग्रामस्थांची मोठी तारांबळ उडाली असून परिसरातील शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
ना पर्यायी रस्ता, ना पुलाचे काम पूर्ण!
बहादरपुरा व लगतच्या गावांतील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी, तसेच कृषी उत्पन्न बाजारात पोहोचवण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या शेतात मशागत, खते-बियाणे वाहून नेणे आणि दैनंदिन शेतीकामांचा महत्त्वाचा काळ सुरू आहे. अशा स्थितीत प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता जुना पूल बंद केल्याने शेतकऱ्यांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. पर्यायी रस्ता (डायव्हर्शन) तयार न करताच घेतलेल्या या निर्णयामुळे वाहने व बैलगाड्या नेणे अशक्य झाले आहे.
शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा
अपूर्ण नियोजनामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “नवीन पुलाचे काम कधी पूर्ण होणार याचा पत्ता नाही आणि जुना रस्ता बंद करून आम्हाला शेतात जाण्यापासून रोखले जात आहे,” असा आक्रोश शेतकऱ्यांनी व्यक्त केला. तात्काळ सुरक्षित पर्यायी रस्ता तयार केला नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
प्रमुख मागण्या:
तात्पुरता रस्ता (डायव्हर्शन): वाहतुकीसाठी तातडीने सुरक्षित आणि पक्का पर्यायी रस्ता तयार करून द्यावा.
कामात गती: नवीन पुलाचे काम वेगाने आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यात यावे.
जबाबदारांवर कारवाई: पूर्वनियोजन न करता जुना पूल बंद करणाऱ्या निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी.
प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तोडगा काढावा, अशी जोरदार मागणी बहादरपुरा परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
