नांदेड:
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील मान्यवरांना जाहीर झाला आहे.
सन २०२४-२५ या वर्षाकरिता शिक्षक संवर्गातून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर दादाजी पवार यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

तसेच सन २०२५-२६ या वर्षाकरिता प्राचार्य संवर्गातून राजर्षी शाहू महाराज महाविद्यालय, लातूरचे प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. महादेव हरिदास गव्हाणे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक संवर्गातून स्वारातीम विद्यापीठातील नवोपक्रम, नवसंशोधन व सहकार्य मंडळाचे संचालक डॉ. शैलेश जयंतीलाल वाढेर आणि दयानंद कला महाविद्यालय, लातूरच्या डॉ. अंजली बालमुकुंद जोशी


यांना हा पुरस्कार विभागून जाहीर करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे स्वरूप २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्यासह विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्व पुरस्कारप्राप्तांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
——————————
