नांदेड, दि. २८ सप्टेंबर : श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय, नांदेड येथे हिंदी विभागाच्या वतीने १४ ते २८ सप्टेंबरदरम्यान आयोजित हिंदी पंधरवड्याचा समारोप सोमवारी उत्साहपूर्ण वातावरणात झाला. यावेळी शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी हिंदी साहित्य परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात कोमल कागदेवाड व वैष्णवी मंदेवाड यांच्या स्वागतगीताने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विद्या सावते यांनी केले. हिंदी पंधरवडा हा केवळ औपचारिक उपक्रम नसून विद्यार्थ्यांमध्ये हिंदी भाषेविषयी आस्था, आत्मीयता आणि जागरूकता निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्त निबंधलेखन, सुलेखन, अनुवाद, स्वरचित काव्यवाचन, रांगोळी आणि रील अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. अंजली मद्रेवार यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी हिंदी विभागाच्या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या भाषिक कौशल्याबरोबरच सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्यास अशा उपक्रमांची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रसिद्ध हास्य-व्यंग्य कवी मा. बजरंग पारीक यांनी आपल्या मिश्कील व ओघवत्या शैलीतील काव्यवाचनातून उपस्थितांचे मनोरंजन केले. विद्यार्थी जीवन, मोबाईलचा वाढता वापर, सामाजिक विसंगती आणि आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजजागृतीचे प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या काव्यवाचनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
हिंदी पंधरवड्यानिमित्त आयोजित सहा विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांचा प्रमुख पाहुणे बजरंग पारीक, कार्यक्रमाचे अध्यक्ष हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. संदीप पाईकराव तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय मनोगतात प्रो. डॉ. संदीप पाईकराव यांनी हिंदी भाषेच्या वाढत्या जागतिक व्याप्तीचा उल्लेख केला. साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी भाषिक व साहित्यिक उपक्रम आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेतील वाचन, लेखन आणि चिंतन दैनंदिन जीवनाचा भाग बनवावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कोमल कागदेवाड हिने केले. दिव्या थोंबाळे हिने आभार मानले. यावेळी इंग्रजी विभागाचे डॉ. कैलास इंगोले, डॉ. रत्नमाला मस्के, मराठी विभागाचे डॉ. शिवाजी सूर्यवंशी, डॉ. कदम, इतिहास विभागाचे डॉ. साईनाथ बिंदगे, हिंदी विभागाचे डॉ. साईनाथ शाहू, डॉ. विद्या सावते, प्रा. मनीषा वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील, जगन्नाथ महामुने यांनी सहकार्य केले.
