नांदेड, दि. २८ सप्टेंबर : नांदेड शहरातून ग्रामीण भागात अवैध दारूची वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड परिक्षेत्र पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत देशी-विदेशी दारूसह एकूण ५ लाख ४७ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सौभद्र मंगल कार्यालयासमोर पोलिसांच्या पथकाने सापळा रचला. यावेळी देशी-विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारी टाटा टियागो कार पकडण्यात आली. कारमधून २ लाख ४७ हजार ५३० रुपयांची देशी-विदेशी दारू, तसेच सुमारे ३ लाख रुपयांचे वाहन, असा एकूण ५ लाख ४७ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी विशाल दिलीप राठोड, रा. कोंडापूर तांडा, ता. कळमनुरी, जि. हिंगोली याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याविरुद्ध भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५५४/२०२६, कलम ६५(ई), महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांच्यासह पोहेकॉ प्रदीप खानसोळे, गणेश राठोड, संदीप वाघाडे आणि गजानन डवरे यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले.
दरम्यान, अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांपर्यंत थेट पोहोचविण्यासाठी नांदेड परिक्षेत्र पोलीस कार्यालयाने ‘खबर’ हेल्पलाइन सुरू केली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील अवैध व्यवसायांची माहिती ९१५०१००१०० या क्रमांकावर कळवावी, असे आवाहन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी केले आहे.
