नांदेड जिल्हा परिषद व स्वारातीम विद्यापीठात सामंजस्य करार*
नांदेड: प्रतिनिधी
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीय शास्त्र संकुल व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) यांच्या पुढाकाराने तसेच नांदेड जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या “प्रोजेक्ट एआय-सारथी : कॅपॅसिटी बिल्डिंग इन डिजिटल पेडॅगॉजी अँड एक्सपिरिएन्शियल लर्निंग फॉर झेडपी एज्युकेटर्स” या दोन दिवसीय कार्यकारी विकास कार्यक्रमास (Executive Development Program – EDP) आज उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला.
विद्यापीठाच्या प्रशिक्षण केंद्रात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली(IAS) यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, शिक्षण अधिकारी वंदना फुटाणे, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. शैलेश वडेर, आयक्यूएसी संचालक डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी तसेच गणितीय शास्त्र संकुलाच्या संचालिका डॉ. रुपाली जैन यांची प्रमुख उपस्थिती होती.
दि. ५ व ६ जून २०२६ रोजी आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल अध्यापन पद्धती आणि अनुभवाधारित शिक्षण याबाबत अद्ययावत ज्ञान व कौशल्ये प्रदान करणे हा आहे. या उपक्रमाद्वारे शिक्षकांच्या अध्यापन क्षमतांमध्ये वाढ होऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर शिक्षण प्रक्रियेत करता येईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. तसा सामंजस्य करार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नांदेड जिल्हा परिषद यांच्यात आज करण्यात आला.
यावेळी मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर म्हणाले की, “प्रोजेक्ट एआय-सारथी हा उपक्रम शालेय शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित नवकल्पनांना चालना देणारा आणि शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना लहान वयातच कृत्रिम बुद्धिमत्तेचे ज्ञान मिळण्यास मदत होईल. महाराष्ट्रात अशा प्रकारचा स्थानिक जिल्हा परिषदेसोबत सामंजस्य करार करून अशा प्रकारचे उपक्रम राबविणारे स्वारातीम विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ असून, या उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन समाज, विद्यार्थी आणि शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी भविष्यात अशा अनेक प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.”
मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी सांगितले की, “संपूर्ण जिल्ह्यातून निवडक ५० शिक्षकांची या प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. या शिक्षकांनी दोन दिवसांच्या प्रशिक्षणातून कृत्रिम बुद्धिमत्तेचे अद्ययावत ज्ञान आत्मसात करून ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे, अशी अपेक्षा आहे.”
कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी यांनी केली, तर आभार प्रदर्शन डॉ. रुपाली जैन यांनी केले.
डिजिटल शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित अध्यापन साधने, विद्यार्थीकेंद्रित शिक्षण आणि अनुभवाधारित शिक्षणाच्या विविध पैलूंवर या प्रशिक्षणादरम्यान तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून, हा उपक्रम जिल्ह्यातील शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावृद्धीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
